Maharashtra Mumbai Rains LIVE: मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत, पालघरसह नाशिक आणि पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट
सद्या राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत.
LIVE
Background
Maharashtra Rain Updates LIVE : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं काही ठिकाणी पूरससृश्य स्थिती निर्माण झाली आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील केलं आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या पावसानं धुमाकूळ घातला आहे.
आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
दरम्यान, राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणासह राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, पुणे शहर, गडचिरोली, या ठिकाणी पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शाळांना सुट्टी
ठाणे, पालघर, नवी मुंबई, पनवेल महापालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तर मुंबई विद्यापीठाच्या उद्या होणाऱ्या परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, अजूनही मुंबईच्या शाळांबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही, परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाणार आहे.
पालघर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांना रेड अलर्ट
पालघर, नाशिक, पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नंदूरबार, धुळे, जळगाव. अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, बुलढाणा, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. येत्या दोन दिवसामध्ये पावसाचा हा जोर कायम राहण्याची शक्यता असून अनेक ठिकाणच्या शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला
मुंबई महानगरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱया ७ तलावांपैकी तानसा तलाव आज (दिनांक १४ जुलै २०२२) रात्री ८.५० वाजता ओसंडून वाहू लागला आहे. या तलावाला एकूण ३८ दरवाजे आहेत, त्यापैकी रात्री ९.५० पर्यंत ९ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
यवतमाळ - वणी तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालय दोन दिवस बंद
वणी तालुक्यात पावसाची सततधार सुरु असुन तालुक्यातील सर्व नदी-नोले-ओढे दुथडी भरुन वाहत आहे. वणी शहरातील शाळा व महाविदयालयात शिकणारे विद्यार्थी ग्रामीण भागातून ये-जा करत असल्याने अनुचीत प्रकार घडू नये म्हणून वणी तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालय ४८ तास बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहे.
वसईत दरड कोसळून झालेल्या अपघाताप्रकरणी चाळ माफियांवर गुन्हे दाखल, अद्याप कुणालाही अटक नाही
सईच्या राजीवली येथील वागराळपाडा प्रकरणात आता वाळीव पोलीस ठाण्यात जमिन मालक आणि चाळी बनवणा-या चाळ माफियांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, एम.आर.टी.पी.एक्ट अंतर्गत कारवाई ही करण्यात आली आहे. काल बुधवारी अतिवृष्टीमुळे दरड कोसळून एकाच कुटुंबातील चार जण दबले गेले होते. त्यातील आई वंदना सिंग आणि ९ वर्षाचा मुलगा ओम सिंग यांना वाचवणयात आलं होतं. तर वडील अमित सिंग आणि १४ वर्षाची मुलगी रोशनी अमित सिंग ही मयत झाली होती. चाळ माफियांनी येथे डोंगर खोदून, महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता चाळी वसवल्या होत्या. याबाबत एबीपी माझाने वेळोवेळी बातमीच्या द्वारे प्रशासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला होता. माञ प्रशासनाने यासाठी कोणतीही कारवाई केली नव्हती. बुधवारच्या घटनेनंतर पालिकेने तेथील ३४ चाळी तोडल्या. तर पालिकेच्या प्रभारी सहाय्यक आयुक्त निलम निजाई यांच्या तक्रारी वरुन, नवीन सर्वे नंबर १४६ हिस्सा नंबर १ चे जमिन मालक मेरी फेलिक्स ग्रासीअस तसेच मितवा रियालिटी तर्फे अजीत रायसाहब सिंह उर्फ मन्टु सिंग तसेच अनधिकृत बांधकाम करणारे शैलेंद्र निषाद, रतनेश पांडे, अनिलकुमार दुबे यांच्या विरोधात भा.दं.वि कलम ३०४, आणि एम.आर.टी.पी. ५२,५३,५४ अन्वये दोन गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. अजूनतरी पोलिसांनी कुणालाही अटक केली नाही.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग बंद, पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे निर्णय गुजरातकडे जाण्याचा बेत करू नये, प्रशासनाचा आवाहन
मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नवसारी आणि चिखली या ठिकाणी पुराचे पाणी आल्यामुळे संपूर्ण महामार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील गुजरात हद्दीवर गुजरात कडे जाणारे सर्व गाड्या थांबवण्यात येत आहेत. सध्या तरी गुजरात कडे जाण्याचा बेत कुणीही आखू नये अशा सूचना पालघर जिल्हाधिकारी डॉक्टर माणिक गुरसळ यांनी दिल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यात गेल्या 48 तासात सरासरी 184 मि.मी. पाऊस,आता पर्यंत 575.40 मिलिमीटर पावसाची नोंद.
नांदेड जिल्ह्यात गेल्या 48 तासात सरासरी 184 मि.मी. पाऊस,आता पर्यंत 575.40 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे 34 प्रकल्प तुडुंब,विष्णुपुरी प्रकल्पाचे 6 दरवाज्यातून 56997 क्यूसेक पाण्याचा विसर्ग ,तर पुराच्या पाण्यात वाहून दोन जणांचा मृत्यू झालाय.
नांदेड जिल्ह्यात 13 व 14 जुलै रोजी गेल्या 48 तासात सरासरी 184 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 575.40 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर ह्या मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील 34 प्रकल्प तुडुंब भरले असून विष्णुपुरी प्रकल्पाचे 6 दरवाज्यातून 56997 क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. दरम्यान या अतिवृष्टीने हजारो हेक्टरा वरील पिके बाधित झाले असून पुराच्या पाण्यात वाहून जाऊन नांदेड व भोकर तालुक्यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात गुरुवार 14 जुलै 2022 रोजी सकाळी संपलेल्या गेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे आहे तर कंसात एकूण पाऊसाची तालुका निहाय नोंद आहे.
नांदेड- 48.20 (576.50), बिलोली-88.60 (602.40), मुखेड- 45.30(525.60), कंधार-44.50 (591.70), लोहा-43.40 (549.30), हदगाव-74.60 (534), भोकर- 109 (661.10), देगलूर-39.10 (493.80), किनवट-48.90 (552.30), मुदखेड- 107.10 (746.60), हिमायतनगर-112 (780.20), माहूर- 57.50 (482.60), धर्माबाद- 62 (572.80), उमरी- 107.90 (700.90), अर्धापूर- 78.50 (568.50), नायगाव- 83.70 (535.40) मिलीमीटर आहे.