(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात
Aaditya Thackeray : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला आहे.
Aaditya Thackeray : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये आदित्य ठाकरे सुरक्षित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अचानक ब्रेक लावल्यामुळे दोन गाडीची टक्कर झाली अन् किरकोळ अपघात झाला. यामध्ये गाडीचं नुकसान झाले आहे. कुणालाही दुखापत झाल्याचं वृत्त नाही.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तीन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर आहेत. बुधवारी आदित्य ठाकरे मालवण येथील रॅलीला संबोधित करणार आहेत. येथून आदित्य ठाकरे यांनी आपला तीन दिवसाचा कोकण दौरा सुरु केला आहे. आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्याने शिवसेना कोकणातील आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. शिवसेनेची कोकणात आधीच मोठी ताकद आहे. ही ताकद आणखी वाढवण्याचा प्रयत्न शिवसेना करत आहे. कोकण शिवसेनाचा गढ मानला जातो. यावर राष्ट्रवादी आणि भाजपचा डोळा आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाणार रिफायनरी (Nanar Refinery) प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दौऱ्यावेळी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी बोलताना नाणार प्रकल्पासंदर्भात मोठं वक्तव्य केलं. यावेळी त्यांची सकारात्मक भूमिका दिसून आली आहे. प्रकल्पामुळे प्रदूषण होणार नाही, याची पूर्णपणे काळजी घेऊ, असं सांगितलं. त्याचप्रमाणे शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या डायरित आयकर विभागाला आढळलेल्या 'मातोश्री' उल्लेखावरही आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, "नाणारमध्ये रिफायनरीचा प्रस्ताव होता. नाणारमध्ये नको, या सातत्यानं होणाऱ्या मागणीमुळं आपण तिथून तो हलवला आहे. लोकवस्ती असल्यानं नाणारमधून बाहेर हलवण्यात आलं आहे. चांगला मोठा प्रकल्प येत असेल तर तेथील स्थानिकांसोबत, भुमीपुत्रांसोबत चर्चा करुन त्यांचे हक्क कसे अबाधित राहतील, त्यांचे हक्क कसे मिळतील हे पाहणं सरकारची प्राथमिकता आहे. त्यांचा विश्वास संपादित करुन पुढं जायचं आहे. विश्वासावर पाय देऊन पुढे जाणार नाही हे आश्वासित करतो. दोन्ही बाजूंच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करुन त्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपुढे मांडेन."
मंत्री आदित्य ठाकरेंच्या राजापूर दौऱ्याआधी जोरदार बॅनरबाजी -
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाणार रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नाणारमधील रिफायनरी राजापूर तालुक्यात अन्य ठिकाणी हलवण्याच्या हालचाली सुरु असताना आज आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजापूरमध्ये ठिकठिकाणी प्रकल्पाविरोधात आणि समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आहे. रिफायनरी समर्थक आणि विरोधकांनी आदित्य ठाकरे यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. आता आदित्य ठाकरे त्यांना भेटणार का? हे पाहावं लागणार आहे.