VBA : गेल्या वेळी नऊ मतदारसंघात लाखोंच्यावर मतं घेतलेली वंचित लोकसभेत एका जागेवर समाधान मानणार का? महाविकास आघाडीचे कोडं सुटणार की अधिक गुंता होणार?
Maha Vikas Aghadi : पॅकेज महाविकास आघाडीच्या जागावाटप अंतिम टप्प्यात असून वंचित बहुजन आघाडीचा मविआमध्ये समावेश झाल्याने उर्वरित जागांचा तिढा कायमचा सुटणार की वाढणार हे पाहावं लागेल.
मुंबई: महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात आहे. राज्यातील 48 लोकसभेच्या जागांपैकी 40 जागांवर कोणता पक्ष निवडणूक लढवणार हे जवळपास अंतिम झाल्याची माहिती आहे. तर आठ जागांवर अजूनही चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा (VBA) समावेश केल्याने पुढील बैठकीत प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) स्वतः उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे वंचितच्या एंट्रीने जागा वाटपाचा तिढा कायमचा सुटणार की वाढणार? हे पाहावं लागेल.
राज्यातील लोकसभा जागा वाटप संदर्भातील चर्चा महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये मागील काही दिवसांपासून केली जात आहे. यामध्ये जवळपास 40 जागांवर महाविकास आघाडीतील कुठला पक्ष निवडणूक लढवणार हे अंतिम झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय. यामध्ये आठ जागांसाठीचा तिढा अद्याप कायम आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीला सामावून घेतल्याचा अधिकृत पत्र मविआकडून मंगळवारी जाहीर करण्यात आलं.
वंचित एका जागेवर समाधानी राहणार का?
आता यामध्ये वंचित बहुजन आघाडीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या कोट्यातून अकोला लोकसभा मतदारसंघाची जागा सोडल्याची माहिती आहे. त्यामुळे समसमान 12-12 चा फॉर्मुला देणारा वंचित बहुजन आघाडी एका जागेवर समाधानी राहणार का? हा मुद्दा आहे.
महाविकास आघाडीच्या आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये जवळपास 40 जागांवर कुठला पक्ष कुठली जागा लढवणार यावर निर्णय झाल्याचं सांगण्यात येतंय
14 - काँग्रेस
17 - शिवसेना ठाकरे गट - (यामध्ये 15 -शिवसेना ठाकरे गट + वंचित बहुजन आघाडी 1+ स्वाभिमानी पक्ष 1)
9 - राष्ट्रवादी काँग्रेस
8 - जागेवर तिढा कायम
या जागांमध्ये रामटेक, हिंगोली, वर्धा, भिवंडी, जालना आणि शिर्डी त्यासोबतच दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई यांचा समावेश आहे. जिथे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस याच जागेवर दावा करत आहेत.
येत्या बैठकीत प्रकाश आंबेडकर भूमिका मांडणार
आता 2 फेब्रुवारीला होणाऱ्या पुढील बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडी सुद्धा आपली भूमिका मांडणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे. या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी अधिकाधिक जागांवर लढण्यास इच्छुक आहे. शिवाय 2019 निवडणुकीचा दाखला सुद्धा वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आला आहे, ज्यामध्ये अनेक जागांवर एक लाखांपेक्षा अधिक मतदान वंचित बहुजन आघाडीच्या पारड्यात पडलं आहे.
अशा कुठल्या जागा आहेत जिथे वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे आणि वंचित बहुजन आघाडी या जागांसाठी आग्रही असेल,
वंचित बहुजन आघाडीची ताकद असलेले मतदारसंघ आणि 2019 मध्ये झालेला मतदान
- अकोला - 2,78,848 मते
- बुलढाणा -1,72,626
- हिंगोली -1,74,051
- नांदेड -1,66,196
- परभणी - 1,49,946
- गडचिरोली चिमूर -1,11,468
- लातूर - 1,12,255
- सोलापूर- 1,70,007
- सांगली - 3,00,234
त्यामुळे या एकूण नऊ जागांच्या मागील लोकसभा निवडणुकीतील मतदारांची आकडेवारी पाहिली तर वंचित बहुजन आघाडीची ताकद यामध्ये दिसून येते. त्यामुळे यामध्ये फक्त एकच जागेवर वंचित बहुजन आघाडी समाधानी राहणार का? प्रकाश आंबेडकर येणाऱ्या बैठकीत वेगळी भूमिका मांडणार हे पाहावं लागेल.
त्यामुळे महाविकास आघाडीची वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत समावेशानंतर ताकद जरी वाढली असली तरी महाविकास आघाडीला आपल्या सोबत असलेल्या घटक पक्षांना समाधानी करण्याचं आणि योग्य न्याय जागा वाटपात देण्याचं एक मोठं आव्हान असणार आहे. हे जर आव्हान स्वीकारून जर योग्य पद्धतीने हे जागावाटप करण्यात महाविकास आघाडी यशस्वी झाली तर राज्यात भाजपसमोर एक मोठं आव्हान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून उभं केलं जाईल.
ही बातमी वाचा :