(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Video : राष्ट्रवादी काँग्रेसच्या डान्स स्पर्धेत कोरोना नियमांचा फज्जा, व्हिडीओ व्हायरल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीने लातूरमधील दयानंद सभागृहात डान्स स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत कोरोना बाबतच्या नियमांना हरताळ फासल्याचे दिसून येत आहे.
लातूर : देशासह राज्यातही कोरोनाने (Corona) पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) सुद्धा राज्यातील जनतेला कोरोना नियमांचे पालन करण्याचे सतत आवाहन करत आहेत. त्यांच्या या आवाहनाचे अनेक व्हिडीओ आहेत. मात्र त्यांच्याच पक्षातील तरुण कार्यकर्त्यांनी कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवल्याचे समोर आले आहे. लातूरमध्ये आयोजित डान्स स्पर्धेत कार्यकर्त्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
जगात कोरोनासह ओमायक्रॉनच्या विषाणूचा धोका वाढत असल्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने कडक नियम घालून दिले आहेत. परंतु, राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीने लातूरमधील दयानंद सभागृहात डान्स स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत कोरोना बाबतच्या नियमांना हरताळ फासल्याचे दिसून येत आहे.
डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आलेलं दयानंद सभागृह खचाखच भरलं असून या कार्यक्रमादरम्यान स्पर्धक युवक युवतींसह अनेक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते डान्स करत जल्लोष करत आहेत. परंतु, या जल्लोषादरम्यान स्पर्धकांसह विद्यार्थ्यांच्या तोंडावर मास्कच नसल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून दिसत आहे.
दरम्यान, लातूर जिल्हा प्रशासन आता या स्पर्धेच्या आयोजकांवर आणि नियम पायदळी तुडवणाऱ्या कार्यकर्त्यांवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सर्वसामान्य नागरिकांना एक नियम आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना दुसरा नियम आहे का? असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे. कोरोनाच्या नियमांमुळे सर्वसान्य नागरिक मेटाकुटीला आले असताना कार्यकर्ते मात्र कोरोनाचे नियम पायदळी तुडवत कोरोना पसरवण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून नेटकरी सरकारला प्रश्न विचारत आहेत.
Maharashtra NCP: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विद्यार्थी आघाडीनं आयोजित केलेल्या स्पर्धेत मोठी गर्दी, पाहा व्हिडीओ
महत्वाच्या बातम्या