(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Nawale : डॉ. अजित नवले यांच्या नावाला देवेंद्र फडणवीसांचा विरोध? समितीत नवलेंचा समावेश का नाही?
Ajit Nawale : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीनं लाँग मार्च सुरु आहे. याबाबत सरकारनं एक समिती स्थापन केली आहे. मात्र, या समितीत डॉ. अजित नवलेंचा समावेश करण्यात आला नाही.
Ajit Nawale : लॉंग मार्चमधील मान्य मागण्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी सरकारच्या वतीनं एक समिती स्थापन केली आहे. या समातीत संबंधित मंत्री, मंत्रालयस्तरीय अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी असावेत अशी मागणी किसान सभेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोब झालेल्या बैठकीत केली होती. या समितीत डॉ. अजित नवले यांचाही समावेश असावा याबाबत आमदार विनोद निकोले, डॉ. अशोक ढवळे आणि कॉम्रेड जे. पी. गावित यांनी मुख्य सचिवांना सांगितले होते. मात्र, अजित नवलेंचा (Ajit Nawale) या समितीत समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे अजित नवलेंच्या नावाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोध आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अजित नवलेंचे नाव सुचवूनही त्यांचा समितीत समावेश का नाही?
किसान सभेच्या वतीने सुरु असलेला लाँग मार्च शेतकरी मागे घेणार की मुंबईच्या दिशेने येणार याची सध्या चर्चा सुरु आहे. कारण मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मागे फिरणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान, लॉंग मार्चमधील मान्य मागण्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी संबंधित मंत्री, मंत्रालयस्तरीय अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी यांची समिती बनवली जावी अशी मागणी किसान सभेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोब झालेल्या बैठकीत केली होती. किसान सभेच्या वतीने कॉम्रेड जे. पी. गावित आणि आमदार विनोद निकोले हे समितीत असावेत असे गावित यांनी सुचवले होते. मात्र, मतदारसंघातील कामांमुळे मला समितीत वेळ देता येणार नसल्याने डॉ. अजित नवले यांचा शेतकरी प्रश्नांबद्दल सातत्याने पाठपुरावा असल्याने त्यांना या समितीत घ्यावं अशी सूचना विनोद निकोले यांनी केली होती. मात्र, अजित नवलेंचा त्या समितीत समावेश केला नसल्याची माहिती समोर आली आहे.
समितीत अजित नवलेंचं नाव हवं, कार्यकर्त्यांची इच्छा
मान्य केलेल्या मागण्यांचे इतिवृत्त योग्य प्रकारे तयार व्हावं यासाठी कॉम्रेड गावित यांनी दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तेव्हा या समितीत डॉ. अजित नवले यांचे नाव नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. असे का झाले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला असता त्यांना सुसंगत उत्तर मिळाले नाही. दरम्यान, वन जमिनीच्या प्रश्नाबरोबरच, कांदा, दूध, सोयाबीन, कापूस, हरभरा, हिरडा पिकांचे घसरत असलेले भाव, मिल्कोमीटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होत असलेली लूट, कर्जमाफी, देवस्थान आणि गायरान जमीन, पीक विमा, पीक नुकसान भरपाई, पुनर्वसन, यासारख्या प्रश्नांवर बाजू मांडण्यासाठी डॉ. अजित नवले समितीत हवेत अशी किसान सभेच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. मात्र, समितीत त्यांचे नाव नसल्याचे समोर आले आहे.
मी समितीत नसलो तरी आमदार विनोद निकोले सरकारला पुरुन उरतील
दरम्यान, मागील लॉंग मार्चमधील शिष्टमंडळातही डॉ. अजित नवले यांना आणू नका असा आग्रह देवेंद्र फडणवीस यांनी लावून धरला होता. 1 जून 2017 च्या शेतकरी संपाच्या वेळी शेतकरी संपात फूट पाडण्याची खेळी उधळून लावल्यामुळे तसेच शेतकरी प्रश्न सुटेपर्यंत डॉ. नवले मुद्दा सोडत नाहीत. यामुळे कदाचित देवेंद्र फडणवीस यांना समितीत डॉ. अजित नवले नको असावेत असी चर्चा सुरु आहे. मी समितीत नसलो तरी आमदार विनोद निकोले सरकारला पुरुन उरतील आणि शेतकऱ्यांच्या मागण्या धसास लावतील असा विश्वास डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: