मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री, तर शिंदे-अजितदादा उपमुख्यमंत्री; सूत्रांची माहिती
Maharashtra New CM : मुख्यमंत्रिपदावरून एकनाथ शिंदेंची असलेली नाराजी दूर करण्यासाठी दिल्लीतून प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. शिवसेनेला केंद्रात मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.
![मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री, तर शिंदे-अजितदादा उपमुख्यमंत्री; सूत्रांची माहिती devendra fadnavis to be next cm of maharashtra eknath shinde ajit pawar will be deputy cm Maharashtra Assembly Election result news मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री, तर शिंदे-अजितदादा उपमुख्यमंत्री; सूत्रांची माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/26/d7c9cf0d9c15937e5b514b0e70729caf173262223631193_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : निकाल लागल्यापासून राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. आता त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असून भाजपचे देवेंद्र फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री असणार अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या दोन दिवसात याची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. तर नाराज एकनाथ शिंदेंची समजूतही काढण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यात महायुतीने सव्वादोनशेचा आकडा पार केल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू होती. गेल्या दोन दिवसांपासून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा संधी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न केल्याचं दिसून आलं. लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे आणि शिंदेंच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवल्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी शिवसेनेचे आमदार आक्रमक होते. तर दुसरीकडे एकट्या भाजपने 132 जागांवर विजय मिळवल्यामुळे देवेंद्र फडणवीसांना पुन्हा संधी मिळावी यासाठी भाजपचे नेते प्रयत्नशील होते.
दोन दिवसांच्या चर्चेनंतर आता राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा प्रश्न सुटला असून देवेंद्र फडणवीसांच्या नावावर दिल्लीतील नेत्यांनी शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री असतील अशीही माहिती आहे.
शिंदेंची नाराजी दूर करण्याचे दिल्लीतून प्रयत्न
भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यांतर मुख्यमंत्रिपद भाजपकडेच जाणार हे जवळपास निश्चित होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही जोरदार प्रयत्न केले. पण आता देवेंद्र फडणवीसांच्या नावाला दिल्लीतून पसंती मिळाल्याने एकनाथ शिंदे नाराज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदेंची ही नाराजी दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून दूर केली जात आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला केंद्रात मोठी जबाबदारी
मुख्यमंत्रिपद भाजपला गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केंद्रात मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. तर राज्यातही महत्त्वाची खाती शिंदेंकडे देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
राज्यातील विधानसभा निवडणूक ही नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावर लढल्याने भाजपला एवढं मोठं यश मिळाल्याचं मत दिल्लीतील भाजप नेत्यांचं आहे. देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या कामाचा फायदा भाजपला झाला असून त्यामुळेच एकट्या भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्याचंही भाजप नेत्यांचं मत आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)