Mahayuti: महायुतीत मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेचे मिशन हंड्रेड प्लस! संघटनात्मक तयारीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर
Mahayuti Seat Sharing : महायुतीच्या जागा वाटपात कोणत्या पक्षाला किती जागा मिळेल, यासंदर्भात वेगवेगळे दावे समोर येत असताना शिवसेनेने सुमारे 110 मतदारसंघांवर डोळा ठेवत विशेष आहवाल तयार केला आहे.
Maharashtra Politics नागपूर : महायुतीच्या जागा वाटपात (Mahayuti Seat Sharing) कोणत्या पक्षाला किती जागा मिळेल, यासंदर्भात वेगवेगळे दावे समोर येत असताना शिवसेनेने सुमारे 110 मतदारसंघांवर डोळा ठेवत त्या मतदारसंघांचा विशेष अभ्यास करत अहवाल तयार केला आहे. तसेच हा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) सादर केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे शिवसेना महायुतीत किमान 100 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी करत असल्याचे चित्र या निमित्याने पुढे आले आहे.
काही आठवड्यांपूर्वी शिवसेनेने राज्यातील सुमारे 110 मतदारसंघात निवडणूक प्रभारी आणि निवडणूक निरीक्षकांची नेमणूक केली होती. या निवडणूक प्रभारी आणि निरीक्षकांनी संबंधित मतदारसंघाचे दोनदा दौरे करत संघटनात्मक तयारीचा आढावा घेतला आणि त्यानंतर त्या मतदारसंघाचे अभ्यासपूर्ण अहवाल तयार केले आहे. आता हे सर्व अहवाल एकनाथ शिंदेंना सादर झाले असून पुढील दोन तीन दिवसात सर्व प्रभारी आणि निरीक्षकांसोबत पक्ष नेतृत्व बैठक घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
ज्या ठिकाणी सक्षम उमेदवार,त्याच जागांवर आमचे लक्ष केंद्रित- कृपाल तुमाने
आम्ही 110 मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. म्हणूनच त्या ठिकाणी अभ्यास करून अहवाल पक्ष नेतृत्वाकडे सोपविल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि आमदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी दिली आहे. आम्ही ज्या मतदारसंघात शिवसेना यापूर्वी निवडणूक लढवत होती किंवा ज्या ठिकाणी आम्हाला अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे, अशाच मतदारसंघांवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. आम्ही कुठेही मित्रपक्षाचा आमदार असलेल्या जागेवर डोळा ठेवून नाही. ज्या ठिकाणी आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे, त्याच जागांवर आम्ही लक्ष केंद्रित केल्याचेही कृपाल तुमाने म्हणाले.
हे ही वाचा