Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
विखे पाटील यांनी आज माझा कट्टा कार्यक्रमात विविध राज्यासह काँग्रेस पक्ष, भाजप आणि अहमदनगर जिल्ह्यातील स्थानिक राजकारणावरही भाष्य केलं.
मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या 5 वर्षात अनेक धक्के महाराष्ट्राने पाहिले आहेत. तत्पूर्वी 2019 च्या विधानसभा व लोकसभा निडणुकांपूर्वीही अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्षाला राम राम करत भाजपचे कमळ हाती घेतले होते. त्यामध्ये, पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते आणि माजी खासदार सुजय विखे यांचाही समावेश आहे. सुजय विखेंनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यानंतर, लोकसभेची निवडणूक लढवून ते खासदारही बनले. मात्र, सुजय विखेंच्या प्रवेशामागची स्टोरी मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna vikhe patil) यांनी माझा कट्टा या कार्यक्रमात बोलताना उलगडली. यावेळी, त्यांनी मोठा गौप्यस्फोट करत काँग्रसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हेच सुजय विखेंच्या भाजप प्रवेशासाठी कारणीभूत असल्याचं म्हटलं. अहमदनगरच्या दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादाचा गुंता न सुटल्याने अखेर सुजय विखेंनी भाजपचे कमळ हाती घेतल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं.
विखे पाटील यांनी आज माझा कट्टा कार्यक्रमात विविध राज्यासह काँग्रेस पक्ष, भाजप आणि अहमदनगर जिल्ह्यातील स्थानिक राजकारणावरही भाष्य केलं. यावेळी, सुजय विखेंच्या भाजप प्रवेशामागील स्टोरही सांगितली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील जागावाटपात अहमदनगर दक्षिणच्या जागेवरुन संघर्ष होता. औरंगाबादमध्ये काँग्रेस सलग 12 वेळा हरलेली आहे. तर, अहमदनगर दक्षिणमध्ये सगल तीनवेळा राष्ट्रवादी काँग्रेस पराभूत झालेली आहे. त्यामुळे, येथील जागांची अदलाबदली करा असे आम्ही म्हणत होतो. मी शरद पवारांनाही अनेकदा याबाबत बोललो होतो. पण, कार्यकर्ते माझं ऐकत नाहीत, असं पवारसाहेबांनी म्हटलं. आता, कार्यकर्ते त्यांचं ऐकत नाही हे तुम्हाला तरी पटेल का, असे राधाकृष्ण पाटील यांनी म्हटले. तसेच, याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी मी राहुल गांधींना भेटलो, तेव्हा मल्लिकार्जुन खर्गेही होते. त्यावेळी, अहमद पटेल यांच्याशी फोनवर बोलणं झाल्यानंतर राहुल गांधी स्वत:च मला म्हटले की, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस का जॉईन करत नाहीत. कारण, आघाडीमध्ये ही जागा त्यांच्या वाटेला गेली आहे, असा गौप्यस्फोट राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. जर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षच मला दुसऱ्या पक्षात जाण्याचा सल्ला देत असतील तर, मी नमस्कार केला आणि आभार मानले, असा किस्सा विखे पाटील यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलताना सांगितला. तर, खर्गेसाहेबांनी माझी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, असेही ते म्हणाले.
राजकीय आत्महत्या का करावी?
दरम्यान, जिथं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शरद पवारांचं ऐकत नाहीत, तिथं मी तिकीट घेऊन राजकीय आत्महत्या करायची का, असा सवालही राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित करत आपली त्यावेळची राजकीय भूमिका स्पष्ट केली.