BMC Election : शिवसेनेला गाठायचीय 114 ची मॅजिक फिगर! भाजपने जिंकलेल्या जागांवर शिवसेनेचा डोळा
BMC Election : मुंबई महापालिकेतून भाजपला हद्दपार करून दाखवण्याचा चंग शिवसेनेनं उचलला आहे. त्यामुळे शिवसेनेची नजर सध्या भाजपच्या जागेवर आहे त्यासाठी शिवसेनेनं आपली तयारी सुरु केली आहे.
BMC Election : निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये जुंपली आहे. याआधी देखील हे दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात दोघे उभे राहिले होते पण शिवसेना ज्या ठिकाणी दोन नंबरवर पराभूत झाली आहे तिकडे एक नंबरची जागा पटकावण्याचा प्रयत्नात आहे.
एकेकाळचे सख्खे मित्र आता पक्के वैरी झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंदुत्व, राम मंदीर, 25 वर्षांच्या युती सारख्या मुद्द्यांवरून चांगलीच जुंपली होती. शिवसेना बोलून नाही करून दाखवते या वाक्यप्रचाराचा तंतोतंत वापर करताना दिसत आहे. कारण मुंबई महापालिकेतून भाजपला हद्दपार करून दाखवण्याचा चंग शिवसेनेनं उचलला आहे. त्यामुळे शिवसेनेची नजर सध्या भाजपच्या जागेवर आहे त्यासाठी शिवसेनेनं आपली तयारी सुरु केली आहे. कारण सेनेला 114 ची मॅजिक फिगर स्वबळावर गाठायची आहे
- 2017 साली झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने 84 उमेदवार जिंकले होते तर भाजपचे 82 उमेदवार यशस्वी झाले
- भाजपच्या 82 जागांपैकी 67 जागांवर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे
- त्यामध्ये दादर माहिम मतदारसंघातली जागा अवघ्या 43 मतांनी गेली
- त्यापैकी आठ जागांवर अवघ्या 500 पेक्षा कमी मतांनी शिवसेनेचा पराभव झाला आहे तर 10 जागांवर अवघ्या हजार मतांनी पराभव झाला
- तर कितीतरी हजारपेक्षा पटीनं पराभव झालेल्या मतदारसंघात भाजपनं आपली मजबूत पकड बनवली आहे
भाजपच्या 82 नगरसेवकांच्या वॅार्डात शिवसेनेनं जंग जंग पछाडली आहे. त्यात साहेबांचा आदेश म्हटल्यावर सैनिकही भाजपच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. 82 पैकी किमान अर्ध्या जागा जिंकण्यावर शिवसेनेचा भर आहे पण हे तितकं सोपंही नसणार आहे. कारण भाजपदेखील या निवडणुकीत मोठ्या ताकदीनं उतरणार आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं उद्धव ठाकरेंनी निवडणुकीत उतरण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई महापालिकेच्या निमित्ताने पुन्हा शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण मागच्या निवडणुकीत भाजप अवघ्या दोन जागांनी मागे पडली मग शिवसेनेने अपक्ष आणि मनसेचे असे मिळून 97 चा आकडा गाठला. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री जरी असला तरी केंद्रात भाजपची सत्ता आहे. घसरलेला मराठी टक्का, गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीय मत ही या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. तेव्हा शिवसेना 114 ही मॅजिक फिगर कशी गाठणार हे लवकरच कळणार आहे,
हे देखील वाचा-
- Club House App : क्लब हाऊस अॅप प्रकरणातील आरोपीला 24 तासांच्या आत बेड्या, मुंबई पोलिसांच्या सायबर सेलची कामगिरी
- कौतुकास्पद! जर्मन नौदलाच्या अधिकाऱ्याची तब्येत अचानक खालावली, भारतीय नौदलाकडून तात्काळ मदत
- Mumbra News : पुनर्वसनाशिवाय घरांवर कारवाई होऊ देणार नाही, घरांबाबतच्या मध्य रेल्वेच्या नोटिशीनंतर खासदार शिंदेंची आक्रमक भूमिका