धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न
राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात आहेत. एका बाजुला सोयाबीनला मिळणारा कमी दर आणि दुसऱ्या बाजुला सरकारी खरेदी केंद्रावर सोयाबीनची खऱेदी करण्यासाठी होणारा विलंब. यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
Buldhana Farmers : सध्या राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात आहेत. एका बाजुला सोयाबीनला मिळणारा कमी दर आणि दुसऱ्या बाजुला सरकारी खरेदी केंद्रावर सोयाबीनची खऱेदी करण्यासाठी होणारा विलंब. या दोन्ही कारणामुळं शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, अशातच बुलढाणा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सोयाबीन खरेदी रखडलेली असल्याने संतप्त शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल घेऊन केला आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.
बारदाना अभावी सोयाबीन खरेदी रखडली
चिखली तालुक्यातील सोमठाना खरेदी केंद्रावरील प्रकार शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर सावळे रा. डोंगरशेवली अस शेतकऱ्याच नाव आहे. जिल्ह्यात जवळपास सर्वच खरेदी केंद्रावर बारदाना अभावी सोयाबीन खरेदी रखडल्याने शेतकरी त्रस्त आहेत.
सोयाबीन खरेदी नोंदणीची मुदत 6 जानेवारीपर्यंत वाढवली
राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी, लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता सोयाबीन खरेदी नोंदणीची मुदत 6 जानेवारी 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या निर्णयानुसार ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत होती. आता सोयाबीनच्या खरेदीसाठी 6 जानेवारीपर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे. तसेच नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी नाफेड आणि एनसीसीएफ यांच्यामार्फत 12 जानेवारीपर्यंत केली जाणार आहे, अशी महिती देखील पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत राज्यात सोयाबीनची खरेदी 4 हजार 892 रुपये प्रति क्विंटल या हमीभावाने सुरू आहे. आतापर्यंत सोयाबीनची तीन लाख 34 हजार 331 मेट्रिक टन एव्हढी विक्रमी खरेदी झाली आहे. मागील वर्षी केवळ 7 हजार 400 क्विंटल एवढी खरेदी झाली होती. यावर्षी शेतकऱ्यांना एक हजार कोटी रुपये मोबदला देण्यात आला आहे. राज्यात सध्या 561 खरेदी केंद्र सुरू असून आतापर्यंत 6 लाख 69 हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
गेल्या वर्षभरापासून सोयाबीन हमीभावावरून नाराज शेतकऱ्यांना आता खरेदी केंद्रांवरही अडचणीच असल्याचं समोर येतंय. बरदाना तुटवड्याने राज्यातील अनेक सरकारी सोयाबीन खरेदी केंद्रच (Soybean)ठप्प असून शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र चालकांनाही ही खरेदी पूर्वपदावर कधी येणार याबाबत कल्पना नसल्याचे समोर आले आहे. सरकारी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र गेल्या 12 दिवसांपासून बंद असून राज्यभरातील अनेक खरेदी केंद्रांवर शुकशुकाट पाहायला मिळतोय.राज्यात नाफेड आणि एनसीसीएफ सोयाबीनची खरेदी करत आहेत. राज्यभरात 585 केंद्रांना सोयाबीन खरेदीची परवानगी असली तरी प्रत्यक्ष खरेदी मात्र केवळ 561 केंद्रांनी सुरू केली होती. त्यातही अडचणी असून प्रत्यक्ष खरेदी सुरू असलेल्या केंद्रांमध्ये बारदान्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने खरेदी केंद्रच बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे .