VIDEO Sudhir Mungantiwar : माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर?
Sudhir Mungantiwar Majha Katta : बाहेरून आलेल्यांना संधी मिळते आणि मूळच्या लोकांना बाजूला काढलं जातं ही भावना कार्यकर्त्यांमध्ये वाढू नये याची काळजी पक्षाने घ्यायला हवी असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
Sudhir Mungantiwar Majha Katta : मला मंत्रिपद का मिळालं नाही याची निश्चित माहिती नाही. पण ज्याला कुणाला माझं मंत्रिपद काढून घेण्यात आनंद वाटला त्याला नंतर खंत वाटेल असं काम करण्यासाठी मी मेहनत घेणार असा विश्वास भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. पक्षाचा मूळ विचार कायम ठेवण्यासाठी काही जणांना बलिदान द्यावं लागतं. मलाही तेच करावं लागलं. पण सत्तेचं संगमरवरी स्मारक बांधताना मूळ विचारांची कबर विसरू नये असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर संवाद साधताना सुधीर मुनगंटीवारांनी हे मत व्यक्त केलं.
विचार कायम राहावं यासाठी बलिदान द्यावं लागतं
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "42 पैकी 9 शुद्ध भाजपचे आहेत, मग तुम्हाला संधी मिळायला हवी होती असं काही लोक सांगायचे. तशी भावना यापुढे कार्यकर्त्यांमध्ये वाढू नये याची काळजी ही पक्षाने घ्यायली हवी. शेवटी पक्षाचा त्यामागे काहीतरी विचार असतो. पक्षाचा योग्य पद्धतीने विस्तार होईल आणि पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इतर पक्षातील लोकांना जोडायला हवं. ज्या विचारांसाठी आम्ही सत्तेचं संगमरवरी स्मारक बनवतो त्यासाठी कबर हटवणे योग्य नाही. मूळ विचार हा कायम राहिला पाहिजे हे पाहावं लागेल."
विचार कायम राहावं यासाठी कुणालातरी बलिदान द्यावं लागतं आणि तो त्यांनी द्यावा असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
पराभव झाल्यानंतर खडसेंबद्दल आत्मियता वाढली नाही. पण मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं. त्यामुळे त्यांचे स्मरण करणे गरजेचं आहे असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. गोपीनाथ मुंडेंचा जर अपघात झाला नसता तर वेगळी परिस्थिती असती असंही मुनगंटीवार म्हणाले.
आर आर पाटलांनी मंत्रिपदाची ऑफर दिली
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "आर आर पाटील यांचे आणि माझे संबंध खूप चांगले होते. त्यांनी मला घरी जेवायला बोलावले. माझ्या पक्षात ये, मी उद्या तुला मंत्री करतो असं ते म्हणाले. पण मी तसा विचार केला नाही. 'जिना यहा, मरणा यहा' असा माझा भाजपमध्ये विचार आहे."
प्रमोद महाजनांमुळे पुन्हा राजकारणात सक्रिय
पहिल्यांदा पराभव झाल्यानंतर राजकारण सोडण्याचा विचार केला. पण प्रमोद महाजनांमुळे पुन्हा सक्रिय झाल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. ते म्हणाले की, "प्रमोद महाजनांनी 1989 मध्ये पराभव झालेल्या उमेदवारांची बैठक बोलावली होती. त्यावेळी विनोबा भावेंचा दाखला देत राजकारण सोडण्याचा विचार बोलून दिला. हजारो गोड पाण्याच्या नद्या समुद्राला मिळतात, पण समुद्र गोड होत नाही. पण तरीही नद्या वाहायच्या थांबत नाहीत. समुद्राच्या पाण्याचे बाष्पिभवन होऊन गोड पाणी मिळतं असं प्रमोद महाजन म्हणाले. त्यानंतर मी पुन्हा राजकारणात सक्रिय झालो."
गडचिरोलीचे पालकमंत्रिपद कुणाला?
गडचिरोलीचे पालकमंत्रिपद देवेंद्र फडणवीस घेणार अशी चर्चा आहे. त्यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आजपर्यंत मुख्यमंत्री हे एका जिल्ह्याचे पालकमंत्री झाले नाहीत. मुख्यमंत्री हे संपूर्ण राज्याचे पालकमंत्री असतात.
बीडच्या पालकमंत्रिपदावरही त्यांनी वक्तव्य केलं. मी स्वतःच मंत्री नसल्याने बीडच्या पालकमंत्रिपदावर कसं काय बोलणार असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
ही बातमी वाचा;