(Source: ECI/ABP News/ABP Majha)
University Protest : मुंबईसह राज्यातील सर्व विद्यापीठे व कॉलेज कर्मचाऱ्यांचा उद्या लाक्षणिक बंद
गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा करून देखील प्रश्न सुटत नसल्याने विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीनं सोमवारी राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक बंद करण्यात येणार आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठासह राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या स्तरावर प्रलंबित आहेत. गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा करून देखील सदर प्रश्न सुटत नसल्याने विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीनं सोमवारी राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक बंद करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई विद्यापीठासह राज्यातील सर्व विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयाचे कामकाज ठप्प होणार आहे.
राज्यातील अकृषी विद्यापीठीय व संलग्नित महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या महासंघाच्या कृती समितीने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 16 नोव्हेंबर पासून राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून उद्या एक दिवसाचा राज्यव्यापी लाक्षणिक बंद करण्यात येत आहे.
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाची 58 महिन्याची थकबाकी अदा करावी, पाच दिवसाचा आठवडा लागू करावा, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरावीत, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला शासन निर्णय पुनर्जीवित करण्यात यावा, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार 10,20 आणि 30 वर्षाच्या सेवेनंतर तीन लाभांची सुधारित योजना लागू करावी, अकृषी विद्यापीठातील 796 पदांना सातवा वेतन आयोग त्वरित लागू करावा, विद्यापीठातील उपकुलसचिव, सहाय्यक कुलसचिव व समकक्ष पदांना युजीसीच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना लागू करण्यात यावी आदी विविध प्रलंबित मागण्यासाठी हा लाक्षणिक बंद करण्यात आला आहे.
या प्रलंबित मागण्यांसाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय व उच्चशिक्षण संचालनालयाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. मुंबई विद्यापीठातील मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघ, मुंबई विद्यापीठ मागासवर्गीय संघटना व मुंबई विद्यापीठ अधिकारी असोसिएशन या तिन्ही संघटना व एसएनडीटी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उद्याच्या एक दिवसीय बंदमध्ये सहभागी होत आहेत. यामुळे मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ व राज्यातील सर्व विद्यापीठाचे आणि वरिष्ठ महाविद्यालयाचे कामकाज विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
- Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल संस्थेत एमएमएस, एमसीएसह 17 अभ्यासक्रमास यूजीसीची परवानगी
- मुंबई विद्यापीठाच्या जागेवर अतिक्रमणाचा विळखा! विद्यापीठाची अडीच एक्कर जागा एसआरए प्रकल्पासाठी?
- तीन वर्षांत विदर्भातील दुग्धोत्पादन दुप्पट करा, नाहीतर...; नितीन गडकरींची पशू-मत्स्य विज्ञान विद्यापिठाचे शास्त्रज्ञ, प्राध्यापकांना तंबी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha