Ajit Pawar : जयंत पाटलांनी अमित शाहांची भेट घेतली का?; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं...
पुण्यातील दौऱ्यादरम्यान शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी अमित शहांची भेट घेतल्याची चर्चा होती. यावर आता अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Ajit Pawar : पुण्यातील दौऱ्यादरम्यान शरद पवार गटाचे जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतल्याची चर्चा होती. यावर आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. जयंत पाटील आणि अमित शाह यांची कोणतीही भेट झाली नाही. काल जयंत पाटील हे शरद पवारांसोबत होते. शाह आणि त्यांची भेट झाली असती तर आम्ही सांगितलं असतं, असं म्हणत कसलाही आधार नसलेल्या बातम्या चालवू नका, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले की, महायुती संदर्भात आमची काल थोडीशी चर्चा झाली. मुख्यमंत्री, अमित शाह, उपमुख्यमंत्री सगळे होते पण जास्त चर्चा विविध विकास प्रकल्पासंदर्भात झाली. आपल्या राज्याचा विकास करण्यासाठी, परिसराचा कायापालट करण्यासाठी सोबतच आपल्यातील प्रत्येकाचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी आणि लोकप्रतिनिधीची कामं होण्याकरता मी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
मोदींसारखा नेता नाही...
मोदी यांच्या नेतृत्वात सरकार काम करत आहे. देशपातळीवर नरेंद्र मोदींसारखा पर्याय मला दिसला नाही. अनेक लोक माझ्यावर टीका करत असतात. अजित पवार आधी टीका करायचे आणि आता मोदींचं कौतुक करतात. मात्र अनुभवातून माणसांची मतं बदलू शकतात. मोदींनी 500 रेल्वे स्टेशनचा पुनर्विकासांचं धोरण हाती घेतलं आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची घोषणा केली आहे, ते विकास करत आहेत आणि मलाही विकासच करायचा आहे, असंही अजित पवार म्हणाले. आपल्याला विमानतळ हे आंतरराष्ट्रीय करायचे आहे. विविध पुण्यात प्रकल्प आहेत मेट्रो, वाघोली रोड असेल, चांदणी चौक असेल असे अनेक प्रकल्प करायचे आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री होणार का?
अजित पवार मुख्यमंत्री होतील अशा चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहेत. त्यात आता अजित पवार अनेक कार्यक्रमांमध्ये जाहीरपणे कौतुक करताना दिसत आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांना चांगलच उधाण आलं आहे. त्यावर बोलताना अजित पवार चांगलेच भडकले होते. "आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का?", असं म्हणत ते पत्रकारांवर चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं.
राहुल गांधींना न्याय दिला...
राहुल गांधींना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली. हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. न्याय व्यवस्था ला जे योग्य वाटेल ते मान्य करावं लागतं. त्यामुळे त्यांनी राहुल गांधींना न्याय दिला आहे, असं अजित पवार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या-