अराजकता! कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडताना पाहणं धक्कादायक; अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
Abhishek Ghosalkar Firing Case : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असून, त्यानंतर आदित्य यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली.
Abhishek Ghosalkar Firing Case : महाराष्ट्राने ह्यापूर्वी कधीच अशी अराजकता पाहिली नव्हती. कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडताना पाहणं धक्कादायक आणि सुन्नं करणारं आहे. सामान्य माणसाच्या रक्षणासाठी यंत्रणा अस्तित्वात तरी आहे का? कायद्याचा धाक उरलाय का? प्रशासन आणि व्यवस्था संपूर्णपणे ढासळलीये! हे भीषण आहे, असल्याचं आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) म्हटले आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची (Abhishek Ghosalkar)गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असून, त्यानंतर आदित्य यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली.
पुढे आपल्या ट्वीटमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले की, "अभिषेक घोसाळकर ह्यांची निर्दयीपणे झालेली हत्या धक्कादायक आणि चीड आणणारी आहे. शिवसेनेचे नगरसेवक आणि कडवट शिवसैनिक म्हणून त्यांनी केलेले कार्य विसरता येणार नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! घोसाळकर कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. देव त्यांना ह्या प्रचंड दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो.
माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि मुंबईतील दहिसर भागातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मॉरिस नोरोन्हा (Morris Noronha) नावाच्या व्यक्तीने हा गोळीबार करत अभिषेक यांची हत्या केली आहे. विशेष म्हणजे गोळीबार करणाऱ्या मॉरिस नोरोन्हानं नंतर स्वतःवर गोळीबार करून आत्महत्या केली. यावर आता ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांची देखील प्रतिक्रिया आली आहे.
अभिषेक घोसाळकर ह्यांची निर्दयीपणे झालेली हत्या धक्कादायक आणि चीड आणणारी आहे. शिवसेनेचे नगरसेवक आणि कडवट शिवसैनिक म्हणून त्यांनी केलेले कार्य विसरता येणार नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! घोसाळकर कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. देव त्यांना ह्या प्रचंड दुःखातून…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 8, 2024
उद्धव ठाकरे दहिसरला जाणार...
कट्टर शिवसैनिक म्हणून घोसाळकर कुटुंबाची ओळख आहे. अभिषेक घोसाळकरांवर झालेल्या हल्ल्यानंतर आता उद्धव ठाकरेंसह त्याचं कुटुंब आज दहिसरला जाणार आहेत. तर, घोसाळकर कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहेत.
आज अंत्यसंस्कार होणार...
रात्री अभिषेक यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, रात्री जे जे रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर जे जे रुग्णालयातून 5.45 दरम्यान मृतदेह दहीसरच्या दिशेने रवाना झाला. आज अभिषेक यांच्यावर दहीसरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त असण्याची शक्यता आहे.
अभिषेक घोसाळकर यांचे शेवटचे शब्द काय?
मी या आधी खूप काही बोललोय, आता जास्त काही बोलणार नाही, कारण बाहेर लोक वाट पाहताहेत. काही दिवसांपूर्वी आमच्या दोघांमध्ये गैरसमज झाला होता, आमच्या कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज झाला होता. आता हा गैरसमज दूर झाला असून एका चांगल्या कामासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत. पुढे जाऊन आम्हाला खूप काम करायचं आहे. ही सुरूवात आहे. या नव्या सुरुवातीला आम्ही गरजू आणि गरीब लोकांना मदत करत आहोत. असंच काम करत राहू. गॉड ब्लेस यू.
इतर महत्वाच्या बातम्या: