(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amol Mitkari : राज ठाकरे माझ्यावरील हल्ल्याचे मास्टरमाईंड, मला संपवण्याचे त्यांचे आदेश, अमोल मिटकरींचा खळबळजनक आरोप
Akola Rada Update : राज ठाकरेंच्या आदेशानुसारच माझ्यावर हल्ला करण्यात आला. तसेच, माझ्यावरील हल्ल्याचे मुख्य मास्टरमाईंड हे राज ठाकरेच असल्याचा खळबळजनक आरोप आमदार अमोल मिटकरींनी केला आहे.
Akola Amol Mitkari vs MNS : अकोला: : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांची गाडी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्यानंतर मनसे विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद रंगला आहे. याप्रकरणी, पोलिसांनी गुन्हाही दाखल केला असून फिर्यादीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचेही (Raj Thackeray) नाव घेण्यात आलं आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यातील (Akola News) सिव्हील लाईन पोलिसांत घडलेल्या घटनेबाबत जबाब दिला आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) आदेशानुसारच माझ्यावर हल्ला करण्यात आल्याचे या दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे.
तसेच, माझ्यावरील हल्ल्याचे मुख्य मास्टरमाईंड हे राज ठाकरेच असल्याचा खळबळजनक आरोप अमोल मिटकरींनी केला आहे. मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांचा आपला जीव घेण्याचा प्रयत्न होता. शिवाय पोलीसांचे अभय असल्याशिवाय हल्लेखोर मनसेसैनिक फरार राहू शकत नाही, असंही आमदार अमोल मिटकरी म्हणाले. परिणामी या प्रकाराला पोलीस देखील जबाबदार असल्याचा गंभीर आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय.
13 कार्यकर्त्यांवर गुन्हे, तिघांना अटक
दरम्यान, अमोल मिटकरींच्या गाडी तोडफोड आणि राडा प्रकरणात आता पर्यंत 13 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर यातील तिसरा आरोपीलाही आता ताब्यात घेण्यात आले आहे. दिपक बोडखे याला अकोटमधून पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. बोडखे पोलिसांच्या ताब्यात असलेला आतापर्यंतचा तिसरा आरोपी. याआधी अकोला स्थानिक गुन्हे शाखेने मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि सौरभ भगत यांना केली अटक केलीय. सध्या दोघे प्रकृतीच्या कारणावरून अकोला जिल्हा रूग्णालयात भरती आहे. तर उर्वरित फरार असलेल्यांचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी संशयित आरोपींमध्ये मनसे (MNS) सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे, जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, राजेश काळे, सौरभ भगत, महिला जिल्हाध्यक्ष प्रशंसा अंबेरे, बार्शीटाकळी तालुकाध्यक्ष सचिन गालट यांच्यासह 13 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, मिटकरी यांनी राज ठाकरेंचं नाव घेतल्याने आता मनसे विरुद्ध राष्ट्रवादीतील हा वाद टोकाला गेल्याचा दिसून येतंय.
राज ठाकरे यांच्या आदेशावरुनच माझ्यावर जीवघेणा हल्ला
अमोल मिटकरी यांच्यावरील हल्ल्याचा प्रयत्न आणि गाडीची तोडफोड प्रकरण मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशावरून आणि प्रदेश सरचिटणीस कर्ण बाळा दुबळे यांच्या चिथावणीवरून झाल्याचा गंभीर आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. दरम्यान, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडल्याचं समर्थन करत, त्या मनसैनिकांचा आम्हाला अभिमान असल्याचं म्हटले होते. त्यानंतर, अमोल मिटकरी यांनी आरोपींच्या अटकेची मागणी करत पोलीस ठाण्यात ठिय्या घातला होता. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. मात्र, राज ठाकरे यांच्या आदेशावरुनच माझ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचं मिटकरी यांनी म्हटलं.
मनसे कार्यकर्त्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार
दरम्यान, कालच्या अकोल्यातील मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर हृदयविकाराने मरण पावलेल्या जय मालोकार या मनसे कार्यकर्त्यावर आज दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. जय याच्या निंबी मालोकार या गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. जयच्या अंत्यसंस्कारासाठी प्रदेश सरचिटणीस राजू उंबरकर आणि प्रदेश उपाध्यक्ष तसेच अकोला संपर्कप्रमुख विठ्ठल लोखंडकार उपस्थित राहणार आहेत. अकोल्यातील कार्यकर्त्यांशी मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी देखील संवाद साधल्याची माहिती पुढे आली आहे. पुढच्या काही दिवसांत अमित ठाकरे मालोकार कुटुंबियांच्या भेटीसाठी अकोल्यात येण्याचीही शक्यता आहे. सध्या जयचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला जिल्हा रूग्णालयात आहे.
हे ही वाचा