(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात एकाच तासात सहा जणांचा मृत्यू, ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
नाशिक ऑक्सिजन गळतीची घटना ताजी असतानाच बीड जिल्ह्यातील आंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात एकाच तासात सहा जणांचा मृत्यू झाले आहेत. हे मृत्यू ऑक्सिजनअभावी झाले असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
बीड : नाशिकच्या ऑक्सिजन गळतीच्या घटनेनंतर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातून धक्कादायक घटना समोर येत आहे. या रुग्णालयांमध्ये कोविड वार्डातील ऑक्सिजन संपल्याने अर्धा तास ऑक्सिजन बंद राहिला आणि त्या दरम्यान सहा जणांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.
स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील कोविड वार्डात आज दुपारी एकाच तासात सहा जणांचे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तर दिवसभरात 11 जणांचे मृत्यू झाले आहेत. दुपारी एका तासात सहा जणांचे झालेले मृत्यू हे ऑक्सिजन अभावीच झाले आहेत, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तर झालेले मृत्यू हे गंभीर आजाराचे व ज्यास्त वयाचे रुग्ण असल्याने झाला, असा दावा प्रसासनाने केला आहे. मात्र, सहा जणांचा मृत्यू एका तासात झाला कसा? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज दिवभरात 11 कोरोनाच्या रुग्णांचे निधन झाले आहे. तर दुपारी 1 ते 2 या वेळेत एकाच तासात सहा जणांचे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. कोरोना कक्षाच्या अतिदक्षता विभागातील तीन, तर वार्ड क्रमांक तीन मधील तीन अशा सहा रुग्णांचा तासाभरात मृत्यू झाला.
झालेले मृत्यू हे ऑक्सिजन अभावी झाले आहेत, असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन मिळवण्यासाठी रोज प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. आज मात्र ऑक्सिजनाचा संपला का अशी भीती व्यक्त केली जात आहे.
यासंदर्भात एबीपी माझाशी बोलताना स्वाराती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी असा ऑक्सिजन बंद न झाल्याचा निर्वाळा दिला आहे. या रुग्णांचा मृत्यू झाला त्या रुग्णाला यापूर्वीच कुठले तरी गंभीर स्वरुपाचे आजार होते आणि या आजारामुळे मृत्यू झाला असल्याचे सांगितले आहे.