(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अमरावती जिल्ह्यात समृद्धी महामार्गाला लागून असलेली हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली
नागपूर-मुंबई समृद्धी द्रूतगती महामार्गामुळे अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील महामार्गाच्या लगत असलेल्या शेतातील पाण्याची निचरा होण्याची व्यवस्था कंत्राटदाराने थातुरमातुर केल्याने शेतात पाणी तुंबून शेतीचे नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
अमरावती : महाराष्ट्र समृद्धी महामार्ग भविष्यात राज्याच्या आर्थिक विकासात महत्त्वाचा प्रकल्प ठरणार असल्याचे सूतोवाच करण्यात आले होते. असे असताना नागपूर-मुंबई समृद्धी द्रूतगती महामार्ग धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दुखणे ठरत आहेत. येथे महामार्गाच्या लगत असलेल्या शेतातील पाण्याची निचरा होण्याची व्यवस्था कंत्राटदाराने थातुरमातुर केल्याने शेतात पाणी तुंबून शेतीचे नुकसान झाल्याचा आरोप इथल्या शेतकऱ्यांनी केला आहे.
46 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेला महाराष्ट्र समृद्धी महामार्ग दहा जिल्हे 26 तालुके आणि 392 गावांना जोडणार आहे. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील 17 गावाच्या शेतशिवारातून समृद्धी महामार्ग गेला आहे. यात आष्टा, चिंचोली, विटाळा, कळाशी, निंभोरा राज, निंभोरा बोडखा, झाडा, झाडगाव, तळणी, आसेगाव, सावला, नारगावंडी, मलातपुर, वाढोणा, शेंदुर्जना खुर्द, शमशेरपुर, गणेशपुर या गावांचा समावेश आहे. दरम्यान समृद्धी महामार्गामुळे कृषी, औद्योगिक, आरोग्य, शिक्षण, बांधकाम, पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र समृद्धी महामार्ग भविष्यात राज्याच्या आर्थिक विकासात महत्त्वाचा प्रकल्प ठरणार असल्याचे सूतोवाच करण्यात आले होते. नागपूर-मुंबई समृद्धी द्रूतगती महामार्ग धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दुखणे ठरत आहेत. तरीही प्रशासनाने या भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा कधीच ऐकल्या नाहीत, त्यामुळे नागपूर-मुंबई समृद्धी द्रूतगती महामार्ग शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील 17 गावातून गेलेल्या या महामार्गाच्या लगतच्या शेतातून पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याचे काम थातुरमातुर केल्याने काल गुरुवारला झालेल्या पावसामुळे शेतात पाणी तुंबले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सर्वात जास्त फटका वाढोना, शेंदूरजना, आसेगाव या तीन गावातील शेतकऱ्यांना बसला आहे. पाण्याचा निचरा योग्यरित्या होत नाही. त्यामुळे पावसाला सुरुवात होताच शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होत आहे. शेतशिवारात नुसते पाणीच पाणीच दिसुन येत असुन एक हजार एकरांहुन अधिक जमीन पाण्यामुळे खरडली गेली आणि काही शेतकऱ्यांनी पेरणी केलेले बियाणे काही ठिकाणी वाया गेले. तसेच वेळेत पाणी कमी न झाल्यास शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे मोठे नुकसान होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.
यावेळी समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, महामार्गाच्या बाजूला प्रत्येक ठिकाणी साचणाऱ्या पाण्याची विल्लेवाट लावण्यासाठी तिथून जवळच असलेल्या नाला, नदीपर्यंत पाणी जाण्याची व्यवस्था केली आहे. अद्यापही ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलं आहे. तिथे मात्र अद्यापही कोणताच अधिकारी जाऊन आला नाहीये. त्यामुळे या शेतकऱ्यांना आता पावसाळ्यात खूप मोठा फटका बसू शकतो.