GST : केंद्र सरकारच्या GST विरोधात सर्व बाजार समित्या बंद, जाणून घ्या राज्यातील एकूण परिस्थिती
GST : केंद्र सरकारने अन्नधान्य आणि खाद्यपदार्थांवर पाच टक्के जीएसटी लागू केल्यानंतर देशभरातील व्यापाऱ्यांनी आज लाक्षणिक बंद पुकारलेला आहे. जाणून घ्या राज्यातील एकूण परिस्थिती
GST : अन्नधान्यासह काही जीवनावश्यक वस्तूंवर 5 टक्के जीएसटी लावण्याच्या निर्णयाविरोधात आज व्यापारी संघटनांनी एक दिवसाचा देशव्यापी लाक्षणिक बंद पुकारला आहे. 18 जुलैपासून पॅकिंग केलेल्या अनब्रँन्डेड अन्नधान्यासह काही वस्तूंवर जीएसटी लागू होणार आहे. त्याविरोधात आज व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे महत्त्वाच्या बाजारपेठांवर आज परिणाम होताना दिसत आहे. दरम्यान जीएसटी परिषदेच्या या निर्णयामुळे अन्नधान्य आणि दुग्धजन्य पदार्थ महागणार आहेत. 8 ते 10 टक्के दरवाढीचा बोजा ग्राहकांवरच पडणार आहे. जाणून घ्या राज्यातील एकूण परिस्थितीबाबत
पुणे - जीएसटी विरोधात बैठक, बंदमुळे पुण्यात दहा कोटींचा फटका
पुण्यात जीएसटी विरोधात आज बैठक पार पडली. यात शहरातील व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला. खाद्यान्न वर जीएसटी नकोच अशी ठाम भूमिका त्यांनी ठरवली आहे. आजच्या एका दिवसाच्या बंद मुळे केवळ पुण्यात दहा कोटींचा फटका बसला, राज्य आणि देशातील बंदचा विचार केला तर हा आकडा काही कोटीत जाणार आहे. पुढे हा आर्थिक फटका बसू द्यायचा नसेल तर सोमवारपासून लागू होणारा जीएसटीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी व्यापारी आज करत आहेत.
बुलढाणा - केंद्र सरकारच्या GST विरोधात जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कडकडीत बंद.
केंद्र सरकारने काही जीवनावश्यक वस्तूंवर 5 टक्के जीएसटी लावल्याने आज व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कडकडीत बंद आहे. या निर्णयाला विरोध म्हणून खामगाव येथील अडते - व्यापारी संघटना यांनी आज बाजार समितीतील कामकाज कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आज खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कामकाज ठप्प झालं आहे. यामुळे जिल्ह्यातील 13 ही बाजार समित्या, 100 पेक्षा जास्त दाल मिल, पीठाच्या गिरण्या आज बंद राहणार आहेत.
सोलापूरात भुसार अडत व्यापारी संघाचा एक दिवसाचा लाक्षणिक संप
जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. याचा विरोध आज देशभरामध्ये वेगवेगळ्या व्यापारी संघटना करताना दिसून येत आहेत. सोलापुरातल्या भुसार अडत व्यापारी संघाने देखील आज एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारलेला आहे. त्यामुळे सोलापुरातल्या मार्केट यार्ड परिसरातील किराणा साहित्याची दुकाने आज सकाळपासून बंद आहेत. आधीच महागाई असताना जीएसटीचा बोजा सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा नाही अशी भूमिका व्यापारी संघटनांची आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध सोलापुरातील भुसार अडत व्यापारी करत आहेत.
कोल्हापूरात लाक्षणिक बंद
अन्नधान्य आणि खाद्यपदार्थांवर पाच टक्के जीएसटी लागू केल्यानंतर देशभरातील व्यापाऱ्यांनी आज लाक्षणिक बंद पुकारलेला आहे. महाराष्ट्रात देखील याचे काटेकोरपणे पालन सुरू असून कोल्हापुरातील धान्य लाईन पूर्णपणे बंद आहे. हा निर्णय मागे घेतला नाही, तर यापेक्षा तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी यापुढे देखील तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे.
इंदापूर शहरातील व्यापाऱ्यांचा विरोध
केंद्र शासनाकडून अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर 5 % जी.एस.टी. लागू करण्यात आली आहे. त्यास इंदापूर शहरातील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला असून इंदापूर शहर किराणा व आडते व्यापारी संघटनेने आपली दुकाने बंद ठेवून शहरातून निषेध मोर्चा काढला. यात इंदापूर शहरातील शंभरहून अधिक व्यापारी सहभागी झाले होते.
सांगली - व्यापाऱ्यांचा पाठिंबा; सर्व मार्केट यार्ड मधील व्यवहार ठप्प
पॅकबंद शेतमाल व धान्यावर पाच टक्के जीएसटीच्या प्रस्तावाविरोधात व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला सांगली जिल्ह्यात देखील मोठा प्रतिसाद मिळाला. सांगली मार्केट यार्डसह जिल्ह्यातील सर्व मार्केट यार्ड बंद ठेवण्यात आलेत. यामुळे या बंदमुळे जिल्ह्यात कोट्यवधीचे व्यवहार ठप्प झालेत. अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर केंद्र व शासनाकडून पाच टक्के जीएसटी लागू होणार असल्याबाबतचा अंतिम निर्णय जीएसटी कौन्सिलमध्ये घेतला आहे. 18 जुलै 2022 पासून हा जीएसटी लागू होणार आहे. केंद्र सरकारने अन्नधान्य, खाद्यात्र व जीवनावश्यक वस्तूंवर 5 टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याचा व्यापारावर, शेतकरी आणि सामान्य नागरिकांवर मोठा परिणाम होणार आहे.
कल्याण - होलसेल मर्चंट असोसिएशन, ओम शिवम वेल्फेअर असोसिएशन बंद मध्ये सहभागी
केंद्र सरकराने जीवनावश्यक वस्तूवर पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतल्याने व्यापारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. येत्या 18 जुलै पासून हा जीएसटी लावणार असल्याने ग्रोमा म्हणजेच ग्रेन राईस अँड ऑईल सिड्स मर्चंट असोसिएशनने भारत बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. कल्याण एपीएमसी मार्केट मधील कल्याण होलसेल मर्चंट असोसिएशन आणि ओम शिवम वेल्फेअर असोसिएशनने देखील आंदोलनाला पाठिंबा दिला असून आज हे मार्केट बंद आहे. अनेक गहू, तांदूळ, डाळी यांसह अनेक अन्नधान्यावर ही जीएसटी आकारली जाणार असल्याने जीवनावश्यक वस्तूच्या किंमतीत वाढ होणार असल्याने याची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहेच, मात्र त्यामुळे नॉन ब्रॅण्डेड पॅकिंग वस्तूंचा व्यापार करणारे लाखो छोटे व्यापारी सुद्धा अडचणीत येणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. एकूणच हा निर्णय धनदांडग्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या हितासाठी घेण्यात आल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. केंद्र सरकारने जीएसटी संदर्भात व्यापाऱ्यांच्या रास्त मागण्यांकडे लक्ष द्यावे अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करू असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.
जळगाव - दोनशे ते तीनशे कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होणार
केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंसह किराणा मालावर लावलेल्या जी एस टी विरोधात जळगाव मध्ये आज व्यापाऱ्यांनी राज्य व्यापी बंद पुकारला असून या मध्ये जळगाव जिल्ह्यातील पन्नास हजार व्यापाऱ्यांनी ही कडकडीत बंद पुकारला आहे. केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंसह किराणा मालावर पाच टक्के जी एस टी लावल्याने व्यापारी, शेतकरी आणि ग्राहक यांना त्याचा फटका बसणार असून महागाई वाढणार असल्याने हा जीएसटी कर सरकारने रद्द करावा अशी मागणी व्यापारी असोसिएशनने केली आहे. केंद्र सरकारचे आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी व्यापाऱ्यांनी आजचा एक दिवसीय बंद पुकारला आहे. या मध्ये जळगाव जिल्ह्यातील पन्नास हजार व्यापारी सहभागी झाले असून आजच्या या बंदमुळे दोनशे ते तीनशे कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होणार असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटल आहे
18 जुलैपासून सर्वसामान्यांना महागाईचा मोठा धक्का
18 जुलै 2022 पासून सर्वसामान्यांना महागाईचा मोठा धक्का बसणार आहे. 28-29 जून रोजी झालेल्या GST कौन्सिलच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी 18 जुलैपासून होणार असून त्यामुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. जीएसटी कौन्सिलने सामान्य माणसांद्वारे वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तूंवरील कर दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अनेक वस्तूंसाठी उपलब्ध जीएसटी सूट काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही वस्तू अशा आहे ज्यांवर जीएसटीचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे निर्णय 18 जुलैपासून लागू होणार आहेत.
या वस्तूंवर जीएसटी भरावा लागेल
डब्यात किंवा पॅक केलेले आणि लेबल केलेले (फ्रोझन वगळता) मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सुका मखना, कोरडे सोयाबीन, मटार, गहू आणि इतर तृणधान्ये आणि तांदूळ यांसारख्या उत्पादनांवर आता 5% जीएसटी लागू होईल. आत्तापर्यंत या वस्तूंना जीएसटीमधून सूट देण्यात आली होती. बँकेकडून टेट्रा पॅक आणि चेक जारी करण्याच्या सेवेवर 18 टक्के जीएसटी भरावा लागेल. अॅटलससह नकाशे आणि तक्त्यांवर 12 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय लागू होणार आहे.
संबंधित बातम्या