Ajit Pawar: अर्थ,ऊर्जा, गृहनिर्माण खात्यावर अजित पवार गटाचा डोळा? अर्थ खातं देण्याला शिवसेनेचा विरोध : सूत्र
महाविकास आघाडीसरकारमध्ये अजित पवारांनी कोंडी केल्याची तक्रार शिंदे गटातील मंत्र्यांनी केली होती. त्यामुळे यावेळी त्यांनी सावध पवित्रा घेत विरोध केलेला पाहायला मिळतोय.
मुंबई : राष्ट्रवादीच्या (NCP) नऊ मंत्र्यांनी मंत्री पदाची शपथ घेऊन आठवडा उलटला आहे. मात्र अद्यापही ते बिन खात्याचेच मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विशिष्ठ खात्यांचा आग्रह धरला जातोय, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. म्हणजेच अर्थ, ग्रामविकास, सामाजिक न्याय, ऊर्जा, गृहनिर्माण, महिला आणि बालविकास, आणि अल्पसंख्याक खाती राष्ट्रवादीला हवी आहेत. तसंच, क्रीडा आणि शिक्षण यापैकी एका खात्यावरही अजित पवार (Ajit Pawar) गटाचा डोळा असल्याचं समजतंय. मात्र अर्थ खातं अजित पवारांना देण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अजित पवार वगळता इतर मंत्र्यांना ना खाती, ना बंगले
महाविकास आघाडीसरकारमध्ये अजित पवारांनी कोंडी केल्याची तक्रार शिंदे गटातील मंत्र्यांनी केली होती. त्यामुळे यावेळी त्यांनी सावध पवित्रा घेत विरोध केलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे अजित पवार वगळता इतर आठ मंत्र्यांना अद्याप मंत्रालयात कार्यालय किंवा निवासस्थान सुद्धा मिळालेली नाहीत. त्यामुळे मंत्रिमंडळाची बैठक वगळता हे नऊ मंत्री मंत्रालयात पाहायला मिळत नाहीत. भाजपा आणि शिंदेगटातील राहिलेला मंत्रिमंडळ विस्तार करावा आणि त्यानंतरच खाते वाटप करावा अशा प्रकारचा सूर सुद्धा भाजपा आणि शिंदे गटातील काही नेत्यांचा पाहायला मिळतोय. त्यामुळे आणखी काही दिवस हा खाते वाटपाचा प्रश्न लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
लवकरच खातेवाटप होण्याची शक्यता
साधारणतः आठवडाभरापूर्वी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबतच राष्ट्रवादीच्या इतर आठ आमदारांनीही शरद पवारांची साथ सोडत मंत्रीपदाची शपथ घेतली. पण अजुनही त्यांचं खातेवाटप झालेलं नाही. तसेच, शिंदे गटातील इतर काही आमदारही अद्याप मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत आहेत. अजित पवारांच्या शपथविधीपूर्वी शिंदे गटातील अनेक आमदारांनी मंत्रीपदाचे दावे केले होते. अशातच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या एक ते दोन दिवसांत आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. त्यानंतरच राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या मंत्र्यांचं खातेवाटप केलं जाईल.
अधिवेशनापूर्वी पावसाळी अधिवेशन?
महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून सुरू होत आहे. 17 जुलै ते 14 ऑगस्ट दरम्यान विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू राहणार आहे. अशातच पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करुन खातेवाटप करण्याचा मानस शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा आहे. त्यामुळेच येत्या एक ते दोन दिवसांतच खातेवाटप जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :
एकनाथ शिंदेंपाठोपाठ अजितदादांनाही गुवाहाटीची कामाख्या देवी पावली; कल्याणराव काळे यांनी फेडला नवस