Ajit Pawar: 'त्या बातम्या खोट्या....', वेश बदलून जाण्याच्या चर्चावर अजित पवारांचं स्पष्टीकरण! पुरावे असतील तर मी राजकारण सोडेन पण नसतील तर....
Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी वेशांतर करून विमानप्रवास केल्याचा मुद्दा राजकीय वादाचा विषय ठरला,याबाबत अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी वेशांतर करून विमानप्रवास केल्याचा मुद्दा राजकीय वादाचा विषय ठरला. राज्याचा हा विषय शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत उपस्थित करत सुरक्षा यंत्रणा आणि संबंधित विमान कंपनीला धारेवर धरलं. ‘‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेश आणि नाव बदलून विमान प्रवास केलाच कसा? हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असून मुंबई आणि दिल्लीत त्यांना विमान प्रवास करू देणाऱ्या विमान कंपन्यांची चौकशी झाली पाहिजे. तसेच एवढी मोठी चूक झालीच कशी? याचे उत्तर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिले पाहिजे,’’ अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली, या संपूर्ण प्रकरणावर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. याबाबत अजित पवारांनी (Ajit Pawar) स्पष्टीकरण दिलं आहे.
मी नाव आणि वेश बदलून प्रवास केल्याच्या बातम्या खोट्या आहेत. मी कधीही वेश बदलून प्रवास केला नाही. माझ्याबाबत चाललेल्या चर्चा धादांत खोट्या आहेत. याबाबत बोलताना आधी माहिती तरी घ्यावी. गेल्या ३५ वर्षात मी राज्याचा आमदार राहिलो, खासदार होतो, अनेकदा उपमुख्यमंत्री राहिलो आहे, मी राज्याचा विरोधी पक्षनेता होतो, मला माझी जबाबदारी कळते. एखाद्याने आपलं नाव बदलून जाणं हा देखील गुन्हा आहे. सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले गेले. त्यामध्ये काहीही तथ्य नाही असं आज अजित पवारांनी (Ajit Pawar) केलेल्या आरोपांवर उत्तर दिलं आहे.
सकाळचा नऊचा भोंगा वाजतो त्यांनी पण म्हटलं अजित पवारांनी (Ajit Pawar) असं केलं, मी काहीही केलं नाही. मी नाव, वेश बदलून कुठेही गेलो नाही, त्याचा पुरावा तुमच्याकडे आहे का? मला समाज ओळखतो, जर मी वेश बदलून आणि नाव बदलून गेलो ते सिध्द झालं तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन. नाही सिध्द झालं तर ज्या लोकांनी संसदेपासून राज्यापर्यंत माझ्यावर आरोप केले त्यांनी निवृत्ती घ्यावी असं आव्हान नाव न घेता अजित पवारांनी (Ajit Pawar) सुप्रिया सुळेंना केलं आहे. तर मी कोणत्या विमानातून गेलो, कोणी मला पाहिलं, मला कुठं जायचं असेल तर मी उजळ माथ्याने जाईन, मला लपून छपून राजकारण करण्याची गरज नसल्याचंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
थोरल्या पवारांची साथ सोडून भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वतःच्या महायुतीतील सहभागाबाबतचा किस्सा सांगितला. दिल्लीत पत्रकारांसोबत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे अध्यक्ष अजित पवार यांचा गप्पांचा फड रंगला होता. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना अजित पवारांनी महायुतीसोबत जाण्यापूर्वी काय-काय आणि कसं-कसं जुळवून आणलं? याबाबत अनेक खळबळजनक खुलासे केले.
अजित पवारांच्या वेशांतराची इन्साईड स्टोरी
मास्क आणि टोपी घालून वेश बदलून दिल्लीला जायचो, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) केला आहे. दिल्लीत पत्रकारांशी त्यांनी अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये कशी सहभागी झाली? याबद्दलचे खुलासे केले. महायुतीत सहभागी होण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी दहा वेळा बैठका झाल्या होत्या, असंही अजित पवार यांनी सांगितलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या.