(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar Baramati Visit : पोलीस ठाण्यात कुणालाच यायची गरज पडू नये, आदरयुक्त दबदबा असला पाहिजे; अजित पवारांच्या पोलिसांना सूचना
पोलीस ठाण्यात कुणालाच यायची गरज पडू नये. यासाठी पोलिसांनी लक्ष दिले पाहिजे. बारामती तालुक्यात कुणी वेडेवाकडे धंदे करीत असतील तर त्यांच्यावर कारवाई करा, अशा सूचना अजित पवारांनी पोलिसांना दिल्या आहेत.
बारामती, पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)आज बारामती दौऱ्यावर आहे. सत्तानाट्यानंतर ते दोन महिन्यांनी बारामतील हजेरी लावत आहे. त्यापूर्वी त्यांनी बारामती तालुक्यातील सुपे गावातील पोलीस ठाण्याचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. आपल्याच बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच येत असल्याने त्यांना उद्घाटनावेळी अनेकांनी निवेदनंदेखील दिली.
यावेळी बोलताना त्यांनी नागरिकांना आणि पोलिसांना अनेक सूचनादेखील केल्या. ते म्हणाले की, पोलीस ठाण्यात कुणालाच यायची गरज पडू नये. यासाठी पोलिसांनी लक्ष दिले पाहिजे. बारामती तालुक्यात कुणी वेडेवाकडे धंदे करीत असतील तर त्यांच्यावर कारवाई करा. चांगले काम करा. पोलिसांचा आदरयुक्त दबदबा असला पाहिजे. गुन्हेगारांनाही पोलिसांची भीती वाटलीच पाहिजे.
राज्यात पावसानं पाठ फिरवली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधव चिंतेत आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली जात आहे. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, आम्ही काहीजण चिंतेत आहोत पावसानं ओढ दिली आहे. धरणात पाणी कमी आहे. मी तुमच्यासोबत आहे. पाऊस चांगला पडावा अशी इच्छा आहे. पाचव्यांदा मला उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. त्यातून माझा जिल्हा, तालुका कुठे मागे राहू नये यासाठी प्रयत्न करील.
अजित पवारांचा बारामतीत भव्य सत्कार होणार...
अजित पवारांचा बारामतीत भव्य सत्कार होणार आहे. अजित पवारांच्या नागरी सत्काराचे आमंत्रण सर्व पवार कुटुंबातील सदस्यांना देण्यात आलं आहे. जेव्हा अजित पवारांचा बतमतीत सत्कार झाला तेव्हा सर्व पवार कुटुंबातील सदस्यांना आमंत्रण दिले होते आजही सर्व कुटुंबातील सदस्यांना आमंत्रण दिले असल्याचे अजित पवारांचे निकटवर्तीय सचिन सातव यांनी सांगितलं आहे. आता या नागरी सरकारसाठी नेमके कोण कोण उपस्थित राहणार? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. दोन महिन्यांनंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामतीत येणार आहेत. अजित पवार राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बारामतीत आलेच नाहीत. अखेर आज अजित पवार बारामतीत येणार आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी केली आहे.
जंगी स्वागत होणार...
बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावात अजित पवारांवर जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी आणि क्रेनच्या साहाय्याने हार घातला जाईल. मोरगावच्या गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर बारामतीकडे जाताना वाटेत अजित पवारांवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. अजित पवार बारामतीत येणार असल्यानं कार्यकर्त्यांमोठे मोठी उत्सुकता दिसत आहे.
इतर महत्वाची बातमी-
Maharashtra Political Crisis : शरद पवार विरुद्ध अजित पवार; बारामतीच्या होम पीचवर रंगणार संघर्ष?