Maharashtra Political Crisis : शरद पवार विरुद्ध अजित पवार; बारामतीच्या होम पीचवर रंगणार संघर्ष?
राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर म्हणजे जवळपास दोन महिन्यांनी पहिल्यांदा अजित पवार बारामतीत येणार आहेत. त्यामुळे शरद पवार विरुद्ध अजित पवार हा संघर्ष बारामतीच्या होम पीचवर पहायला मिळणार आहे.
पुणे : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर म्हणजे जवळपास दोन महिन्यांनी पहिल्यांदा अजित पवार बारामतीत येणार आहेत. शनिवारी (26 सप्टेंबर) बारामतीत अजित पवारांची जंगी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर नागरी सत्काराचे देखील आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्तानं बारामतीत अजित पवारांच जोरदार शक्तिप्रदर्शन पहायला मिळणार आहे. त्यामुळे शरद पवार विरुद्ध अजित पवार हा संघर्ष बारामतीच्या होम पीचवर पहायला मिळणार आहे.
पुतणे अजित पवार यांनी काका शरद पवारांना आव्हान दिल्यानंतर अनेक ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. मात्र आता पवारांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या बारामतीत अजित पवारांकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. शिंदे- फडणवीस सरकारमधे सामील होऊन पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री बनल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच शनिवारी बारामतीत येणार आहेत. मोरगावच्या गणपतीला अभिषेक करुन दुपारी बारामतीत पोहचणार आहेत आणि त्यानंतर संपूर्ण बारामती शहरातून अजित पवारांची जंगी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
अख्ख कुटुंब होणार सहभागी...
त्यानंतर बारामतीच्या शारदा प्रांगणात अजित पवारांचा बारामतीकरांकडून जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार, भाऊ श्रीनिवास पवार , पार्थ आणि जय या दोन मुलांसह अजित पवारांच कुटुंब उपस्थित असणार आहे. या कार्यक्रमाची जोरदार तयारी सध्या बारामतीत सुरु आहे.
शरद पवार विरुद्ध अजित पवार?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष पाहायला मिळाला. बारामतीत मात्र आतापर्यंत हा संघर्ष दोन्ही गटाकडून टाळण्यात आला आहे. परंतू या नागरी सत्काराच्या निमित्ताने अजित पवार पवारांकडून बारामती जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे आणि ते शरद पवारांना बारामतीच्या मैदानात दिलेलं आव्हान मानले जाणार आहे. शारदा प्रांगणमध्ये पवार कुटुंबीयांनी आतापर्यंत अनेक कार्यक्रम घेतले आहेत. मात्र शनिवारी होणारा अजित पवारांच्या नागरी सत्काराचा कार्यक्रम म्हणूनच वेगळा ठरणार आहे.
कशी असेल मिरवणूक?
बारामतीच्या कारभारी चौकातून अजित पवारांच्या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. बारामतीतील सर्व प्रमुख रस्त्यांवरून ही मिरवणूक जाणार असल्यान ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यास सांगण्यात आलं आहे. अनेक ठिकाणी अजित पवारांवर जे सी बी च्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
कुटुंबात फूट पडलेली नाही...
राष्ट्रवादीत फूट पडली असली तरी कुटुंबात फूट पडलेली नाही असं सांगण्याचा शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे वारंवार प्रयत्न करत आहेत. मात्र बारामतीतील अजित पवारांच्या शक्तिप्रदर्शनाने पवार कुटुंब दुभंगल्याचा संदेश बारामतीच्या नागरिकांपर्यंत जाणार आहे. याचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीवर आणि पर्यायाने सुप्रिया सुळेंवर होणार का? असा प्रश्न दबक्या आवाजात विचारला जातोय. कारण बारामती तालुक्यावर अजित पवारांची एकहाती पकड आहे.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांनी विरोधी गटातील अनेक नेत्यांच्या मतदारसंघात सभा घेण्याचा सपाटा लावलाय. राष्ट्रवादीचे हे दोन्ही गट एकमेकांविरुद्ध संघर्षांसाठी उभे ठाकल्याच चित्र यातून निर्माण झालं आहे. मात्र बारामतीत अजूनही अजित पवारांसोबत असलेले पक्षाचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि इतर पदाधिकारी सुप्रिया सुळेंसोबत दौरे करताना दिसत आहेत. अजित पवारांच्या बारामतीतील शक्तिप्रदर्शनाकडे म्हणूनच बारामतीकर उत्सुकतेनं आणि काहीशा संशयाने देखील पाहत आहेत.
अजित पवारांचा कौतुक सोहळा ठरण्याची शक्यता
पवार कुटुंबातील नेते आधी राष्ट्रवादी पक्ष हा एक कुटुंब असल्याचं सांगायचे. आता पक्षात फूट पडली असली तरी कुटुंबात फूट पडलेली नाही, असं म्हणत आहेत आणि म्हणूनच बारामतीतील पक्षाचे कार्यकर्ते एकाचवेळी अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांबरोबर दिसत आहेत. त्यामुळंच बारामतीतील अजित पवारांच शक्तिप्रदर्शन वरकरणी शरद पवारांना आव्हान वाटत असलं तरी तो कौतुक सोहळा ठरण्याची शक्यता आहे. बाहेर काहीही चित्र असलं तरी बारामतीत दोन्ही गट एकत्र दिसत आहेत. बारामतीच्या राजकारणाचे गहिरे रंग यानिमित्तानं पहायला मिळणार आहेत.
हे ही वाचा :