दोन आमदारांच्या वादात अधिकाऱ्यांचा बळी, कर्जतचे प्रांतअधिकारी आणि तहसीलदार निलंबीत
Ahmednagar News Update : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतचे प्रांतअधिकारी अजित थोरबोले आणि तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निलंबित करण्यात आले आहे. भाजपचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यातील वादातून दोन अधिकाऱ्यांचे निलंबन झाल्याचे बोलले जात आहे.
Ahmednagar News Update : नागपूरच्या अधिवेशनात कर्जतचे प्रांतअधिकारी अजित थोरबोले आणि तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्यावर झालेल्या निलंबनाच्या विरोधात कर्जतमध्ये रॅली काढून निषेध करण्यात आला. कर्जत तालुक्यातील अनधिकृत खाण आणि स्टोन क्रशरवर कारवाई करण्यात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आलाय. या दोन्ही अधिकाऱ्यांचे निलंबन करावे अशी मागणी भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित करत केली होती. त्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. या अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर राष्ट्रवादीने आमदार राम शिंदे यांच्यावर टीका केली आहे. थोरबोले आणि आगळे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांवर केवळ राजकीय सूडबुद्धीने कारवाई झाल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून (NCP) करण्यात आलाय. परंतु, दोन आमदारांच्या संघर्षातून दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालीय.
भाजप आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यातील राजकीय वाद अत्यंत टोकाचा आहे. त्यातच आमदार राम शिंदे यांची विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर हा वाद आणखी तीव्र झाला. कर्जत जामखेड मधील अधिकारी हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्यासारखेच काम करत होते, असा आरोप राम शिंदे यांनी वेळोवेळी केला. ते विधान परिषदेवर गेल्यानंतर त्यांनी कर्जतचे प्रांताधिकारी थोरबोले आणि तहसीलदार आगळे यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत लक्षवेधी मांडली. या लक्षवेधीच्या प्रश्नाला उत्तर देताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांना निलंबित केले. याबरोबरच विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्ती करून त्याचा अहवाल एक महिन्यात सादर करण्याचे आदेश मंत्री विखे यांनी दिले आहेत.
दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबीत केल्यानंतर या कारवाईचे तीव्र पडसाद कर्जत जामखेडमध्ये उमटले आहेत. प्रांतअधिकारी आणि तहसीलदार यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ आज कर्जत आणि जामखेड येथे रॅली काढण्यात आली. कर्जतच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ही रॅली सुरु झाली आणि तहसील कार्यालयात रॅलीचा समारोप झाला. ही कारवाई केवळ राजकीय सूडबुद्धीने झाली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
प्रांतअधिकारी आणि तहसीलदार यांनी सर्वसामान्य नागरिकांची भरपूर कामं केली आहेत. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करणे योग्य नसल्याच्या भावना आंदोलनातील एका वयोवृद्ध आजीने व्यक्त केल्या आहेत. दरम्यान हा मोर्चा सर्वसामान्य नागरिकांनी काढला असल्याचा दावा आंदोलकांचा असला तरी हा मोर्चा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच काढला असल्याचे म्हणत यावरून संबंधित अधिकारी राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते असल्यासारखे काम करत होते हे सिद्ध झाल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय.
अधिकारी दोषी असतील तर कारवाई झालीच पाहिजे. मात्र, केवळ राजकारण म्हणून अधिकाऱ्यांवर करावाई करणं चुकीचं असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान राम शिंदे यांची विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर कधी निधी अडवला म्हणून तर कधी विकास कामात अडथळा आणल्याचा आरोप रोहित पवार यांनी अनेकवेळा केलाय. तर आपले अपयश झाकण्यासाठी आमच्यावर आरोप होत असून कर्जत जामखेडमध्ये केवळ व्हर्च्युअल विकास होत असल्याचे प्रत्युत्तर राम शिंदे यांनी दिले आहे. आता या अधिकाऱ्यांच्या निलंबन प्रकरणानंतर दोन्ही आमदारांमध्ये पुन्हा कलगीतुरा रंगला आहे.