(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Devendra Fadnavis : पंतप्रधानांनी नऊ वर्षात सिंचनासाठी 30 हजार कोटी दिले : देवेंद्र फडणवीस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षाच्या काळात महाराष्ट्रात सिंचनासाठी 30 हजार कोटी रुपये दिल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षाच्या काळात महाराष्ट्रात सिंचनासाठी 30 हजार कोटी रुपये दिले आहे. त्यामुळं महाराष्ट्रात आम्ही सिचंनाची कामे पूर्ण करु शकलो असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. निळवंडेसारखा प्रकल्प सुरु होत आहे. माझ्या जन्माच्या पूर्वी हा प्रकल्प सुरु करण्यात आला होता. आज त्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे याचा आनंद असल्याचे फडणवीस म्हणाले.
साई भूमितील विकासकामांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे याचा आनंद आहे. जगभरातून साईभक्त सातत्यानं या ठिकाणी येतात. याठिकाणी विविध उपक्रम येत आहेत. निळवंडे सारखा प्रकल्प सुरु होत आहे. माझ्या जन्माच्या पूर्वी हा प्रकल्प सुरु करण्यात आला होता. आज त्याचे उद्घाटन तुमच्या हस्ते होत आहे याचा आनंद असल्याचे फडणवीस म्हणाले.
PM किसानच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु
केंद्र सरकार दरवर्षी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करते. हे पैसे तीन हफ्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार देखील दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. याचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होत आहे. आज अन्य अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होत असल्याचे फडणवीस म्हणाले.
पश्चिमी वाहिनी असणाऱ्या नद्यांचे पाणी गोदावरीत नेण्याचे काम करणार
महाराष्ट्रातील 50 टक्के भाग हा दुष्काळग्रस्त आहे. या भागात जास्त प्रमाणात पाऊस पडत नाही. त्यामुळं त्या ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळं या भागाला पाणी मिळालं पाहिजे. जोपर्यंत या ठिकाणी पाणी मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्राला मागच्या 50 वर्षात लागलेला आत्महत्येचा कलंक समाप्त करु शकणार नसल्याचे फडणवीस म्हणाले. हे काम पंतप्रदान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातच पूर्ण होऊ शकते असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पश्चिमी वाहिनी असणाऱ्या नद्यांचे जे पाणी समुद्रात जात आहे, ते पाणी गोदावरी नदीत घेऊन अहमदनगर, नाशिकसह संपूर्ण मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करु शकतो असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. याची पूर्ण व्यवस्था, याचे पूर्ण स्ट्रक्चर आम्ही तयार केल्याचे फडणवीस म्हणाले. विदर्भात असणाऱ्या वैनगंगा नदीचे वाया जाणारे पाणी देखील विदर्भातील दुष्काळी भागात नेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे फडणवीस म्हणाले.
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हे तिन्ही भाग कायम दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हे तिन्ही भाग कायम दुष्काळमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशिर्वादाची गरज असल्याचे फडणवीस म्हणाले. यापूर्वी तुम्ही आम्हाला कायम मदत केली आहे. पुढच्या काळातही केंद्र सरकार मदत करेल. दरम्यान, येणाऱ्या काळात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहावा लागणार नसल्याचा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. आजच्या या कार्यक्रमाला पंतप्रदान आल्याबद्दल फडणवीसांनी त्यांचे आभार मानले.
महत्त्वाच्या बातम्या:
PM Modi In Shirdi : 53 वर्षांची प्रतीक्षा, कोटींचा खर्च, पीएम नरेंद्र मोदींच्या हस्ते जलपूजन, काय आहे निळवंडे धरणाचा इतिहास?