तंबूचा बांबू गेल्यावर त्यांना भाजपची अन् सरकारची ताकद कळेल; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे संजय राऊतांना जोरदार प्रतिउत्तर
Radhakrushna Vikhe Patil: राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊतांच्या टीकेला जोरदार प्रतिउत्तर देत बोचरी टीका केली आहे.
Radhakrushna Vikhe Patil अहमदनगर : शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे कायम वैफल्यातून टिका करतात. किंबहुना तंबू ठोकल्याचे त्यांना अतिशय दुःख झाले आहे. हाच तंबूचा बांबू त्यांच्यात गेल्यावर त्यांना भाजपची अन् सरकारची ताकद कळेल, अशी बोचरी टीका करत राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी संजय राऊतांच्या टीकेला जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. ते शिर्डी येथे बोलत होते.
उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना कायम औरंगजेबाचे उदात्तीकरण झाले आहे. कबरीवर फुले वाहिली गेली, हे जनता विसरलेली नाही. आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक सक्षम नेते आहेत. ते अभिमन्यू प्रमाणे कोणतेही चक्रव्यूह छेदन्याची त्यांची क्षमता आहे. आमच्या नेत्यात ताकद आहे. त्यामुळेच विरोधक त्यांना घाबरतात. असे म्हणत संजय राऊत यांच्या टीकेलाही मंत्री विखे पाटलांनी प्रतिउत्तर दिले आहे.
....त्यावेळी त्यांना कुणी रोखल होतं?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आलंय. आमच्या बहिणींनी योजनेला प्रचंड प्रतिसाद दिलाय. बहिणींना सक्षम करण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे. तसेच ही योजना यशस्वी झाली याचा अतिशय आनंद आहे. मात्र विरोधक लाडकी बहिण योजनेवरूनही टीका करत आहेत. टिका करणे हा विरोधकांचा धंदा झालाय.
त्यांची सत्ता असताना ते लाडक्या बहिणीला विसरले होते. महाविकास आघाडीने अडीच वर्षे फक्त भ्रष्टाचार केला. आमच्या सारखी एकही योजना राज्यातील जनतेला देण्याचे त्यांना सुचले नाही. विरोधक आज फक्त टीका करताय. मात्र, मविआ सरकारच्या काळात अशा योजना आणण्यासाठी त्यांना कुणी रोखल होतं? आता सुरू असलेल्या चांगल्या योजना त्यांच्या पचनी पडेना. मात्र जनतेने आमच्या योजनांना प्रचंड प्रतिसाद दिलाय. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत महायुतीला भरघोस यश मिळेल. असा विश्वासही मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.
...मात्र विरोधकांचे डोके मात्र रिकामे झाले आहे
विरोधक राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगत टीका करत आहेत. मात्र विरोधकांनी आमची चिंता करू नये. आमच्या तिजोऱ्या भरलेल्या आहेत. मात्र विरोधकांचे डोके मात्र रिकामे झाले आहे, अशी टीका ही राधाकृष्ण विखे पाटलांनी यावेळी केली. आगामी 1 ऑक्टबरपासून 5 रुपयांऐवजी 7 रुपये अनुदान आम्ही शेतकऱ्यांना देतोय. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केलंय, असेही ते यावेळी म्हणाले.
हे ही वाचा