(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Agriculture : पावसाची ओढ, राज्यात आत्तापर्यंत 47 टक्के पेरण्या पूर्ण; कडधान्यांच्या लागवडीला फटका बसण्याची शक्यता
Agriculture News : राज्यातील अनेक भागात खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. राज्यात आतापर्यंत 47 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
Agriculture News : सध्या राज्याच्या काही भागात पाऊस (Rain) पडत आहे. तर अनेक भागात पावसानं दडी मारली आहे. त्यामुळं राज्यातील बळीराजा चिंतेत आहे. मोसमी पावसाने ओढ दिल्याने राज्यातील अनेक भागात खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. राज्यात आतापर्यंत 47 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. चालू आठवड्याअखेर पाऊस न झाल्यास कडधान्यांच्या लागवडीला फटका बसण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यातील कोकण सोडल्यास इतर भागात सर्वत्र सारखीच परिस्थिती असल्याचा चित्र राज्यभरात आहे. यावर्षी हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आणि अल निनोच्या प्रभावामुळं मान्सून कमी असण्याची शक्यता निर्माण करण्यात आली आहे. अशातच उशिराने आलेल्या मान्सूनमुळं राज्यभरातील पेरण्यात खोळंबल्या आहेत. राज्यात आतापर्यंत फक्त 47 टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या असल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे.
कोणत्या पिकाची किती पेरणी?
ज्वारी 15 टक्के
बाजरी 10 टक्के
मक्याची 38 टक्क्यांवर पेरणी झाली आहे
खरिपातील तृणधान्यांची पेरणी एकूण 18 टक्क्यांवर गेली आहे.
कापसाची पेरणी 67 टक्के क्षेत्रावर झाली आहे
तूर वगळता कडधान्यांची पेरणीही रखडली आहे.
तुरीची 44 टक्के, मुगाची 16 टक्के, उडदाची 14 टक्के.
तर अन्य कडधान्यांची पेरणी फक्त पाच टक्क्यांवर झाली आहे.
कडधान्यांची पेरणी जास्तीत- जास्त 20 जुलैपर्यंतच करता येणार
यावर्षी उशिराने आलेल्या पावसामुळं तूर वगळता अन्य कडधान्यांची पेरणी जास्तीत- जास्त 20 जुलैपर्यंतच करता येणार आहे. त्यानंतर केलेली कडधान्यांची पेरणी फायदेशीर ठरणार नाही. आगामी काही दिवसात जर चांगल्या प्रकारचा पाऊस राज्यात झाला नाही तर यामुळं मात्र कडधान्यांच्या पेरणीला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळं कडधान्यांच्या उत्पादनावरही मोठा परिणाम होण्याची भीती आता व्यक्त होत आहे.
बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत 43 टक्केच पेरणी
यावर्षी खरीप हंगामात बुलढाणा जिल्ह्यातील साडेआठ लाख हेक्टर वरील खरीप हंगामाची पेरणी रखडली आहे. तर बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत 43 टक्केच पेरणी झालेली आहे. यासह संपूर्ण महाराष्ट्रात फक्त 47 टक्के पेरणी झाल्यामुळं यावर्षी खरीप हंगाम हा लांबण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) सरासरीच्या 23 टक्के कमी पाऊस
सध्या राज्यातील काही भागात पाऊस (Rain) पडत आहे, तर काही भागात पावसानं दडी मारली आहे. पावसानं ओढ दिल्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुासर महाराष्ट्रात (Maharashtra) सरासरीच्या 23 टक्के कमी पाऊस झाला आहे. मराठवाड्यातही गंभीर परिस्थिती असून, तिथं सरासरीच्या 38 टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळं राज्यात आणखी चांगल्या पावसाची गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Maharashtra Rain : महाराष्ट्रात सरासरीच्या 23 टक्के कमी पाऊस, मराठवाड्यात गंभीर स्थिती; वाचा कोणत्या विभागात किती पाऊस?