Agriculture News : पंचनामे कधी होणार? कृषीमंत्री सत्तारांच्या जिल्ह्यातच शून्य टक्के पंचनामे
मराठवाड्यात अवकाळी पावसामुळं 62,480 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय. विशेष म्हणजे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये शून्य टक्के पंचनामे झाले आहेत.
Agriculture News : अवकाळी पावसाचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली आहेत. मराठवाड्यात या अवकाळी पावसामुळं एकूण 62,480 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. आतापर्यंत फक्त 1 हजार 384 हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये शून्य टक्के पंचनामे झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरसह धारशिव आणि बीड जिल्ह्यातील पंचनामे शून्य टक्के झाले आहेत.
शेतकऱ्यांचा संताप
जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी पुकारेल्या संपाचा मोठा फटका मराठवाड्यातील (Marathwada) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बसत आहे. कारण 1 मार्चपासून आत्तापर्यंत झालेल्या नुकसानीचे फक्त दोन टक्के पंचनामे झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महसूल विभागातील कर्मचारी संपावर असल्याने पंचनामे रखडले असल्याचे समोर आलं आहे. मात्र, यामुळं शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप पाहायला मिळत आहे. त्यामुळं संपातून निदान शेतकऱ्यांना तरी वगळा नुकसानीचे पंचनामे करा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. आधीच कापसाला भाव नाही, त्यामुळं कापूस घरात पडू आहे, कांद्यानेही शेतकऱ्यांना रडवलंय त्यातच आता अवकाळी पावसानं उभी पिकं आडवी झाली आहेत. अशा या संकटामुळं बळीराजा संकटात सापडला आहे.
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात 62,480 हेक्टर वरील पिकांचं नुकसान
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात 62,480 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झालं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 9314 शेतककऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तिथे 7762 हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान झालं आहे. मात्र, इथे पंचनामे शून्य टक्के झाल्याची माहिती समोर आली आहे.
अवकाळी पावसामुळं मराठवाड्यात सहा शेतकऱ्यांचा मृत्यू
अवकाळी पावसामुळं मराठवाड्यात आत्तापर्यंत सहा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. आर्थिक नुकसानीबरोबर जीवितहानी देखील झाली आहे. यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच मराठवाड्यात केवळ दोन टक्केच पंचनामे झाले आहेत. नुकसानीचे पंचनामे होणार कधी? असा सवाल शेतकरी करत आहेत. या नुकसानं शेतकरी हवालदिल झाला आहे. अजूनही राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे.
रब्बी पिकांसह फळबागांचे मोठं नुकसान
अवकाळी पावसामुळं गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष, आंबा, केळी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. काढणीला आलेली पिकं यामुळं वाया गेली आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळं अद्याप पंचनामे सुरु नाहीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :