धक्कादायक! फक्त दोन टक्के नुकसानीचे पंचनामे; संपाचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना फटका
Marathwada News : महसूल विभागातील कर्मचारी संपावर असल्याने पंचनामे रखडले असल्याचे समोर आले.
Marathwada News : जुनी पेन्शनच्या योजनेच्या (Old Pension Scheme) मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारेल्या संपाचा मोठा फटका मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना (Farmers) बसताना पाहायला मिळत आहे. कारण 1 मार्च पासून आजपर्यंत झालेल्या नुकसानीचे फक्त दोन टक्के पंचनामे झाले असल्याची धक्कादायक माहितीसमोर आली आहे. मराठवाड्यात एकूण 62 हजार 480 हेक्टरचे नुकसान झाले असून, आतापर्यंत फक्त 1 हजार 384 हेक्टरचे पंचनामे झाले आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड जिल्ह्यात तर पंचनामे झालेच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महसूल विभागातील कर्मचारी संपावर असल्याने पंचनामे रखडले असल्याचे समोर आले. मात्र यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर संताप पाहायला मिळत आहे. तर जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कोणतेही नुकसान झाला नसल्याचे अहवाल देण्यात आला आहे.
संपाचा फटका...
जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यभरातील शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. मराठवाडा विभागातील जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, धाराशिव, लातूर जिल्ह्यातील महापालिका वगळून सुमारे 80 हजार शासकीय कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. यात महसूल विभागातील कर्मचारी देखील सहभागी झाले होते. त्यामुळे याचा परिणाम आता नुकसानीच्या पंचनाम्यावर होत आहे. कारण मार्च महिन्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होत नाहीत. महसूल विभागातील कर्मचारी संपावर असल्याने शेतकऱ्यांच्या बांधावर पंचनामे करण्यासाठी कोण जाणार असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.
मराठवाडा पंचनामे आकडेवारी (1 ते 19 मार्च)
- 1 मार्च ते 19 मार्च दरम्यान मराठवाड्यात एकूण 62 हजार 480 हेक्टरचे नुकसान झाले आहे.
- ज्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झाल्याचे पाहायला मिळत आहे.
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 9 हजार 314 शेतकऱ्यांचे एकूण 7 हजार 762.50 हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. मात्र अजून एकही पंचनामा झालेला नाही.
- परभणी जिल्ह्यातील 4 हजार 500 शे तकऱ्यांचे एकूण 2 हजार 400 हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. मात्र परभणीत देखील एकही पंचनामा झालेला नाही.
- हिंगोली जिल्ह्यातील 13 हजार 286 शेतकऱ्यांचे एकूण 5 हजार 604 हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. तर यापैकी 310 हेक्टरचे पंचनामे झाले असून, ज्याची टक्केवारी 5.53 टक्के आहे.
- सर्वाधिक नुकसान झालेल्या नांदेड जिल्ह्यातील 19 हजार 899 शेतकऱ्यांचे एकूण 23 हजार 554 हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. पण पंचनामे फक्त 698 हेक्टरवर पीकांचे झाले असून, त्याची टक्केवारी 2.96 आहेत.
- बीड जिल्ह्यातील 21 हजार 459 शेतकऱ्यांचे एकूण 11 हजार 365 हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. तर बीड जिल्ह्यात देखील एकही पंचनामा झालेला नाही.
- लातूर जिल्ह्यातील 16 हजार 842 शेतकऱ्यांचे एकूण 11 हजार 794 हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. मात्र पंचनामे फक्त 3. 19 टक्के झाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :