तब्बल आठ महिन्यानंतर देव भक्ताला भेटणार; पंढरीत फटाक्यांची आतषबाजी
कोरोनाच्या संकटामुळे 17 मार्च रोजी बंद झालेले विठ्ठल मंदिर दिवाळीच्या पाडव्याला उघडणार आहे. तब्बल आठ महिन्यानंतर देव भक्ताला भेटणार असल्याने भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.

पंढरपूर : कोरोनाच्या संकटामुळे 17 मार्च रोजी बंद झालेले विठ्ठल मंदिर दिवाळीच्या पाडव्याला उघडणार आहे. मंदिर उघडणार असल्याचे समजताचं पंढरपूरमध्ये वारकरी संप्रदाय, व्यापारी संघटना, वंचित आणि मनसे यांनी शहरात तुफानी फटाक्यांची आतषबाजी करीत ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला. कोरोनाचे संकट सुरु झाल्यानंतर तब्बल 8 महिन्यानंतर देव आपल्या लाडक्या भक्तांना भेटणार असून भाविकांनाही आता सावळ्या विठुरायाचे मुखकमल बघण्याची ओढ असह्य झाली आहे.
मंदिर बंद असूनही रोज हजारोंच्या संख्येने भाविक मंदिराजवळ येऊन नामदेव पायरीचे दर्शन घेऊन जात होते. मंदिर उघडण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी अनेक आंदोलने केली. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधत मंदिर उघडण्यास परवानगी दिल्याने वारकरी संप्रदायातून याचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे.
आज विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीजवळ प्रकाश आंबेडकर यांच्या अनुयायांनी हा निर्णय येताच फटाक्यांची अताषबाजीला सुरुवात केली. यानंतर व्यापारी संघटना, मनसे आणि वारकरी संप्रदायांनी पेढे वाटून आणि फटाके उडवून जल्लोष केला. मंदिराच्या पश्चिम द्वार व्यापारी संघटनांनी विठूरायाची मूर्ती आणून तिला हार घालीत पेढे वाटले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचे वारकरी संप्रदायाने स्वागत करताना आता मर्यादित संख्येत कोरोनाचे नियम पाळून भजन कीर्तनासही परवानगी देण्याची मागणी केली.
दरम्यान मंदिर समितीने शासनाच्या मार्गदर्शक सूचना मिळताच भाविकांच्या दर्शन व्यवस्थेसाठी आम्ही सज्ज असून आमची तयारी यापूर्वीच झाल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले. मंदिरात येणाऱ्या भाविकाला मास्क बंधनकारक केला जाणार असून दर्शन रांगेत सोशल डिस्टन्सचे नियम पाळण्यासाठी मात्र रोज दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या संख्येवर मर्यादा येणार आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी रोज 70 ते 80 हजार भाविक येत असतात. आता मात्र काही दिवस दीड ते दोन हजार भाविकांची दर्शन व्यवस्था करणे मंदिर प्रशासनाला शक्य होणार आहे. याचसोबत सुरुवातीला काही दिवस विठुरायाचे दुरून दर्शन घ्यावे लागणार असून याबाबत राज्य सरकारच्या सूचना मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे पुदलवाड यांनी सांगितले.
Temple Reopen | मंदिरं उघडण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत; मुंबई, ठाण्यातील भाविकांच्या प्रतिक्रिया
























