(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Rain Update: रेड अलर्टमुळे पुणेकरांना घाट परिसरात न जाण्याचं आवाहन
भारतीय हवामान खात्याने (IMD) पुणे, मुंबई, रायगड आणि सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Pune Rain Update: भारतीय हवामान खात्याने (IMD) पुणे, मुंबई, रायगड आणि सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या शहरातील नागरिकांना घाट परिसरात न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
पुणे जिल्ह्यातील घाट विभागातील डोंगरमाथ्यावर आज (11जुलै) मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागात दरड कोसळल्याने पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी डोंगरमाथ्यावर जाणे टाळण्याचे, आवाहन प्रशासनाने यापूर्वीच केले होते. मात्र रविवारी (10जुलै) ला अनेक घाटावर किंवा प्रेक्षणीय स्थळी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे आता सतर्कतेचा इशारा दिला आहे.
लोणवळा, पानशेत, खडकवासला, माळशेज घाट, विसापूर किल्ला, ताम्हिणी घाटावर अनोनात गर्दी बघायला मिळाली. शहरात आणि आजुबाजूच्या परिसरात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरवर्षी अनेक अपघात होतात. मोठ्या दरडी कोसळतात. फिरण्याचा उत्साह नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. दरवर्षी अनेक पर्यटक याच उत्साहात जीव गमावतात.
पुणे, मुंबई, रायगड आणि सातारा या तीन जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात कालपासून पावसाची संततधार कायम आहे. अनेक ठिकाणी वाहून जाण्याच्या आणि झाडे पडण्याच्या घटना समोर येत आहेत. अजूनही कोणतीच जीवितहानी झाली नाही आहे. शहरातील अनेक जुने वाडे पावसाळ्यात धोकादायक आहे अशा नोटिसा नागरिकांना बजावण्यात आल्या आहे. त्यामुळे सुरक्षितता बाळगा, असं आवाहन देखील वारंवार करण्यात येत आहे.
नगर जिल्ह्यातील कळसूबाई शिखरावर गिर्यारोहणासाठी गेलेले शंभरहून अधिक पर्यटक कृष्णवंती नदीला आलेल्या पुरामुळे अडकून पडले होते. स्थानिकांनी त्यांची सुटका केली. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटकांनी काळजी घ्यावी. भीमाशंकर परिसरात काही ट्रेकर्स बेपत्ता झाले होते. त्याचा शोध लागला. त्यामुळे फार काळजी घेण्याची गरज असल्याचंही सांगण्यात येत आहे.