(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नागपुरात एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या आजीसह भावाची हत्या करणाऱ्या आरोपीची आत्महत्या
एकतर्फी प्रेमातून माथेफिरुने कथित प्रेयसीच्या वृद्ध आजी आणि 10 वर्षांच्या भावाचा जीव घेतला. दिवसाढवळ्या 65 वर्षीय लक्ष्मीबाई धुर्वे आणि 10 वर्षाच्या यश धुर्वेच्या हत्येने नागपुरात खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपीने काल रात्री आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
नागपूर : एकतर्फी प्रेम किती घातक वळणावर जाऊ शकते आणि वेळीच मुलींना होणाऱ्या त्रासाची पोलिसांकडे तक्रार केली नाही, तर किती भयावह परिणाम होऊ शकतात याची प्रचिती काल नागपुरात आली आहे. एकतर्फी प्रेमातून माथेफिरुने कथित प्रेयसीच्या वृद्ध आजी आणि 10 वर्षांच्या भावाचा जीव घेतला. दिवसा ढवळ्या 65 वर्षीय लक्ष्मीबाई धुर्वे आणि 10 वर्षाच्या यश धुर्वेच्या हत्येने नागपुरात खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपीने काल रात्री आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. हा आरोपी अल्पवयीन होता. त्याने मनकापुर परिसरात रेलवे ट्रॅक वर रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली.
काल दुपारी दोघांची हत्या केल्यानंतर आरोपी एक्टिव्हाने मानकापूर परिसरात गेला. तिथे रात्री 9 वाजून 26 मिनिटांनी जाणाऱ्या केरळ एक्स्प्रेस समोर उडी घेऊन आत्महत्या केली. केरळ एक्स्प्रेसच्या ड्रायवरने रेल्वे एकाने रेल्वे समोर आत्महत्या केल्याची कंट्रोल रूमला माहिती दिली.रेल्वे कंट्रोल रूम ने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली, त्यांनतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यावर दुहेरी हत्याकांडाच्या आरोपीने आत्महत्या केल्याची स्पष्ट झाले.
एकतर्फी प्रेमातून भरदिवसा आजीसह चिमुकल्या भावाचा खून, दुहेरी हत्याकांडाने नागपूर हादरलं
हजारीपहाड परिसरातल्या कृष्णनगरमध्ये काल दुपारी धुर्वे कुटुंबातील मुलीच्या ( हत्या झालेल्या यशची मोठी बहीण ) मागे लागलेल्या माथेफिरुने धारधार हत्याराने आधी लक्ष्मीबाई आणि नंतर चिमुकला यशची हत्या केली. मिळालेल्या माहितीप्रमाणे गांधीबाग परिसरातला हा तरुण अनेक दिवसांपासून धुर्वे कुटुंबातील तरुण मुलीच्या मागे लागला होता. मेहनत करून कुटुंब चालवणाऱ्या धुर्वे कुटुंबियांनी आपल्या मुलीला समजूत घातली. त्यानंतर तिने त्या तरुणासोबत सर्व संपर्क तोडले होते. तरीही तो तरुण सतत धुर्वे कुटुंब राहत असलेल्या कृष्णानगर भागात यायचा. त्यामुळे ना इलाजाने धुर्वे कुटुंबियांनी आपल्या मुलीला नागपुरातच दुसऱ्या परिसरात राहणाऱ्या मामाच्या घरी पाठवले होते.
आज दुपारी धुर्वे दाम्पत्य आपल्या कामावर गेल्यानंतर घरी लक्ष्मीबाई आणि चिमुकला यश हे दोघेच होते. त्याच वेळी तो तरुण त्या ठिकाणी आला आणि त्याने आपल्या हातातील धारधार शस्त्राने लक्ष्मीबाई आणि यशचा खून केला. शेजाऱ्यांनी धुर्वे यांच्या घरातून आलेल्या आवाजानंतर तिथे जाऊन पाहिले असता दुहेरी हत्याकांडाची ही घटना उघडकीस आली. लगेच घटनेची माहिती धुर्वे दाम्पत्याने पोलिसांना दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, हत्या केल्यानंतर तरुण फरार झाला. त्यानंतर आरोपीने काल रात्री आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. हा आरोपी अल्पवयीन होता. त्याने मनकापुर परिसरात रेलवे ट्रॅक वर रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली.