Abp Majha : एबीपी माझाच्या दिवाळी अंकाचं प्रकाशन संपन्न, सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव
Majha Diwali Ank : एबीपी माझाच्या माझा दिवाळी अंकाचं आज मुंबईत प्रकाशन झालं. अनेक लेखकांनी आपल्या लेखणीतून हा दिवाळी अंक संपन्न केला आहे.
मुंबई: पहिल्या वर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर एबीपी माझाचा दुसरा दिवाळी अंक दाखल झालाय. आज या अंकाचं मुंबईत प्रकाशन झालं. जीवन विद्या मिशनचे प्रमुख प्रल्हाद पै यांच्या हस्ते माझा दिवाळी अंकाचं प्रकाशन झालं. ग्रंथाली प्रकाशनाच्या प्रतिभांगणात हा कार्यक्रम पार पडला.
एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी यावेळी दिवाळी अंकाबद्दल माहिती दिली. एबीपी माझाच्या दिवाळी अंकाला युनिक फीचर्स आणि ग्रंथाली प्रकाशनाचे सहकार्य लाभलं आहे. यावेळी एबीपी माझाच्या एक्झिक्युटिव्ह एडिटर सरिता कौशिक उपस्थित होत्या.
समाजातील सज्जनशक्तीची पाठराखण करावी आणि समाजहिताला नख लागण्याची शक्यता निर्माण होत असेल त्यावेळी पूर्ण ताकदीने त्याला विरोध करावा हे एबीपी माझाचं आजवरचं आचरण आणि ध्येयधोरण. वाचकांना माहिती देणं, त्यांचं प्रबोधन करणं, त्यांना सजग बनवणं, त्यांचं रंजन करणं, त्याचबरोबर समाजात चांगुलपणाची पेरणी करणं या भावनेतून माझाने दिवाळी अंकाच्या दुनियेत पाऊल ठेवलं. यंदाच्या दिवाळी अकांचं हे दुसरं वर्ष.
काय आहे अंकात?
देशातील अग्रगण्य असलेल्या महाराष्ट्राची प्रगती झाली, पण ती काहीशी असमान अशी झाली. ती का झाली आणि ती स्थिती कशी बदलता येईल याचं विश्लेषण नामवंत अर्थतज्ज्ञ मंगेश सोमण यांनी या अंकात केलं आहे. त्याच विचारांना पुढे घेऊन जाणारी मांडणी ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांनी केली आहे. आपल्या लिहिण्यानं, अभिनयानं आणि दिग्दर्शन कौशल्याने प्रेक्षकांचा लाडका बनलेला प्रवीण तरडे अस्सल शेतकरी आहे. शेतातून दिसणारे सहा ऋतू त्याने या दिवाळी अंकाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडले आहेत.
सुप्रसिद्ध अभिनेता आणि सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांचा 'होम मिनिस्टर' हा कार्यक्रम वर्षानुवर्ष लोकप्रियतेच्या शिखरावर राहिला आहे. या कार्यक्रमामुळे मनोरंजनातून नाती जपण्याचा मंत्र त्यांना कसा गवसला हे या अंकात वाचायला मिळेल. मराठीतून विनोद हद्दपार होतो की काय, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून उभ्या महाराष्ट्राच्या घराघरांत कधी खळाळणारे तर कधी गडगडाटी हास्याचे स्फोट ऐकायला सध्या मिळत आहेत. त्या मालिकेतील लेखक आणि अभिनेते समीर चौघुले यांचा विनोदी लेख आणि मंदार भारदे यांचा फर्मास लेख ही या अंकाची मोठी उपलब्धी मानावी लागेल.
दिग्गज कथाकार राजेंद्र बनहट्टी, भारत सासणे, मिलिंद बोकील यांच्या बरोबरच समीर कुलकर्णी आणि प्राजक्त देशमुख अशा ज्येष्ठ आणि नव्या दमाच्या लेखकांच्या कथा अंकात समाविष्ट आहेत. ख्यातनाम साहित्यिक विश्वास पाटील यांनी स्वतःच्या लेखनात आलेल्या स्त्रियांच्या प्रतिमांचा घेतलेला शोध, डिजिटल क्रांतीनंतर तुकड्यातुकड्यांत आयुष्य जगणाऱ्या आणि समग्रतेचा अभाव असलेल्या आजच्या पिढीचा ढांडोळा घेण्याचा आसाराम लोमटे यांनी केलेला प्रयत्न आणि मनोज बोरगावकर यांनी कोजागिरीच्या रात्रीच्या गोदावरीशी केलेली रुजुवात वाचकांना समृद्ध करतील यात शंका नाही.
टोमण्यांबद्दल उगाचच बदनाम झालेल्या पुणेकरांच्या खाण्याच्या बाबतीतील दिलदारीबद्दल अंबर यांचा आणि पिकासोला समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरणारा सुहास जोशी यांचा लेख या अंकात आहे. र. धों. कर्वे यांनी कुटुंबनियोजन आणि लैंगिक समस्यांचं निराकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्याला नुकतीच शंभर वर्षे झाली. डॉ. ऊर्जिता कुलकर्णी यांच्यासारखी एक तरुण डॉक्टर पुण्यामध्ये याच विषयात आज काम करते तेव्हा तिचे अनुभव कर्वे यांच्यापेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत, की कर्वे यांच्या वाट्याला आलेल्या अवहेलनांचा सामना आजही करावा लागतोय, याविषयीचे डॉ. कुलकर्णी यांचे अनुभव वाचकांना विचार करायला लावणारे आहेत. याशिवाय, वसंत गुर्जर, दासू वैद्य, संजय कृष्णाजी पाटील, सौमित्र, संदीप खरे, प्रफुल्ल शिलेदार, किरण येले आणि श्रीराम गोविंद गव्हाणे यांच्या कविता या अंकाची श्रीमंती वाढवणाऱ्या आहेत.