Abp Majha Impact : एबीपी माझाच्या बातमीचा दणका! केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील 'त्या' शल्य चिकित्सकाचे निलंबन
बुलढाणा सामान्य रुग्णालय परिसर आणि रुग्णालयातील भीषण वास्तव 'एबीपी माझा' ने आपल्या बातमीत दाखवलं होतं. याची गंभीर दखल केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली आहे.
Buldhana News बुलढाणा : बुलढाणा सामान्य रुग्णालय (Buldhana District Hospital) हे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांच्या जिल्ह्यातील मुख्यालय असलेले रुग्णालय आहे. मात्र या रुग्णालयात अनेक बेवारस प्राणी फिरत असल्याने रुग्णांची सुरक्षा धोक्यात आली होती. बुलढाणा सामान्य रुग्णालय परिसरात आणि रुग्णालयातही डुक्कर, कुत्री, बकऱ्या आणि गाई फिरत असल्याचा वास्तव 'एबीपी माझा' (Abp Majha Impact) ने आपल्या बातमीत दाखवलं होतं. याची गंभीर दखल केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली आहे.
या प्रकरणी त्यांनी तात्काळ राज्याच्या आरोग्य सचिवांना यासंबंधी कारवाई करण्याचे आदेश दिले असून त्यानुसार आज बुलढाणा सामान्य रुग्णालयाचे प्रमुख आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांना निलंबित करण्यात आल आहे. त्यांच्या जागी आता उपशल्य चिकित्सक डॉ. भुसारी यांची तात्पुरती नेमणूक करण्यात आली आहे . ही सर्व माहिती राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी फोनवरून 'एबीपी माझा' ला दिली आहे.
राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या आदेशाने कारवाई
बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात (Buldhana District Hospital) अस्वच्छता आणि डुकरांच्या मुक्त संचारामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेकदा रुग्णभरती असलेल्या वार्डमध्ये डुक्कर आणि कुत्रे आराम करताना दिसत आहेत. अनेकदा तर या जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या अवतीभोवती देखील या डुकरांचा व कुत्र्यांचा अधिवास असल्याचे दिसून आले. तर रुग्णालय परिसरात इतकी अस्वच्छता आहे की, दुर्गंधीमुळे या रुग्णालयात रुग्णही यायला नकार देत आहेत. विशेष म्हणजे या रुग्णालयात पन्नासहून अधिक स्वच्छता कर्मचाऱ्यांची फौज आहे. तरीही या ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य असल्याचे पाहायला मिळत आहे.
तर दुसरीकडे केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांच्याच जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सामान्य रुग्णालयात हे भीषण वास्तव समोर आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्ते केले होते. या संपूर्ण प्रकरणाचे वास्तव 'एबीपी माझा' ने सर्वप्रथम आपल्या बातमीत दाखवलं होतं. आता याची गंभीर दखल केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली असून या प्रकरणी त्यांनी बुलढाणा सामान्य रुग्णालयाचे प्रमुख आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आहे.
रुग्णांच्या आरोग्याशी खेळ
बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यातून रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या रुग्णालयाचा दर्जा खालावत असल्याने तसेच सोयीसुविधांचा अभाव असल्याने जिल्ह्याभरातील ग्रामीण व गरीब रुग्णांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. सर्वत्र पसरलेला कचरा व दुर्गंधी यामुळे रुग्णांना त्यामुळे अनेक विकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याचे दिसून येत आहे. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक गरीब रुग्णाला सोयी सुविधेसह चांगल्या दर्जाचे उपचार मिळणं अपेक्षित असते. मात्र गरीब जनता डूकरांच्या सानिध्यात राहून उपचार घेत आहेत. अनेकदा वृद्ध रुग्णावर किंवा रुग्णाच्या नातेवाइकांवर डुकरांनी हल्ला केल्याच्याही घटना रुग्णालय परिसरात घडल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या