डॉ. अभय बंग दारुबंदीवर ठाम; दारुमुक्तीसाठी महाआघाडी सरकारने प्रयत्न करण्याची मागणी
दारुबंदीला माझं समर्थन कालही होतं, आजही आहे आणि उद्याही राहीन, मग सत्ता कोणाचीही असो, अशी भूमिका ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी मांडली आहे.
पुणे : दारुबंदीला माझं समर्थन कालही होतं, आजही आहे आणि उद्याही राहीन, मग सत्ता कोणाचीही असो, अशी प्रतिक्रिया डॉ. अभय बंग यांनी विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांवर दिली. सत्ता बदलताच बंग यांच्या भूमिकेत बदल झाल्याचा गंभीर आरोप पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला होता. सरकार येतात-जातात, त्यानुसार मी माझ्या भूमिका बनवत नाही. भाजप सरकारच्या विरुद्धही मी बोलत राहिलेलो आहे. त्यांनी ते वाचावं, माहिती घ्यावी, असा सल्लाही अभय बंग यांनी वडेट्टीवार यांना दिला.
चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्यासंबंधी सरकार निर्णय घेणार असल्याची बातमी आली होती. त्यावर ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी निषेध नोंदवला होता. यावरुन काँग्रेस नेते आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी डॉ. अभय बंग यांच्यावर गंभीर आरोप केले. दारुचा पैसा म्हणजे पापाचा पैसा असेल तर डॉ. बंग यांचा मुलगा फडणवीस यांच्यासह सहाव्या मजल्यावर बसत असताना गप्प का होते? असा प्रश्न उपस्थित केला. सत्ता बदलताच बंग यांच्या भूमिकेत बदल झाल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी यावेळी केला.
काँग्रेस विरोधात आंदोलन करुनही सरकारने पुरस्कार दिला - डॉ. अभय बंग म्हणाले, सत्ताबदल झाल्यानंतर मी काही बोललोच नव्हतो. दुसरं म्हणजे मी पूर्णपणे अपक्ष आणि निष्पक्ष व्यक्ती आहे. काँग्रेसच्या सत्तेत मी बाल मृत्यू प्रश्न उचलला. तेव्हा त्यांनी मला महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला. भाजप सरकारच्या विरुद्धही मी बोलत राहिलेलो आहे. पण हा पक्षाचा मुद्दाच नाही. गेली 30 वर्ष झाले मी या मुद्द्यावर काम करतोय, झगडतोय. सरकार येतात आणि जातात, त्यानुसार मी माझ्या भूमिका बनवत नाही. हा कळीचा मुद्दा लोकांच्या जिव्हाळ्याचा आहे. ज्यांना महिलांबद्दल आस्था असेल तो दारुबंदी उठवण्याचा विचार करणार नाही.
डॉ. अभय बंग यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे -
- अजित पवार हे उत्तम प्रशासक मानले जातात. त्यांनी आपलं प्रशासकीय कौशल्य दारुबंदी साठी लागू करावं. असं त्यांना आणि या सरकारला जनतेकडून आवाहन करतो.
- राज्यभर दारू विक्री कमी करण्याच्या उद्देशाने या सरकारने पाच वर्षाचे धोरण आखावे. देशाचा विकासाचा दर पाच टक्के आणि दारूचा दर 14 टक्के वाढवण्याचं टार्गेट केलं जातंय. उलट आधी 50 टक्के दारू विक्री बंद करण्याचे धोरण या पाच वर्षांसाठी ठेवा आणि नंतर महाराष्ट्रात दारू बंदीच नव्हे तर दारू मुक्ती करावी.
- चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्याची बातमी ऐकून मी खूप अस्वस्थ झालो. लाखो महिलांच्या मागणीनंतर ही चंद्रपूर जिल्ह्यात 2015 मध्ये दारूबंदी सरकारने लागू केली. ही दारूबंदी लागू झाल्यानंतर अवैध दारू वाढली हा शब्दांचा खेळ आहे. कारण दारुबंदीनंतर जी उरली ती अवैधच राहणार आहे. त्यामुळे अवैध दारू वाढलेली नाही तर उरली-सुरली अवैध ठरली.
- अवैध दारूची नेमकी आकडेवारी कोणाकडेच नाही. सगळे अंदाजाने बोलतायेत. मी तुम्हाला खरी आकडेवारी सांगतो, दारुबंदी लागू होण्यापूर्वी आम्ही एक सॅम्पल सर्व्हे केला. चंद्रपूर जिल्ह्यातील लोक वर्षाला 192 कोटी रुपयांची दारू प्यायचे. ही आकडेवारी लोकांना तेही अगदी किती दारू पिता असं विचारून काढलेली आकडेवारी आहे. दारुबंदीनंतर एका वर्षात ती 90 कोटी रुपयांनी कमी झाली. म्हणजे जवळपास निम्याने दारू विक्री कमी झाली. आता हे अपयश मानायचं की यश? तर मी म्हणेन हे दारूबंदीचं अंशीक यश आणि दारुबंदी ज्यांनी लागू करायची त्या सरकारच अपयश.
- दारुबंदी असावी की नाही हा प्रश्न नाही तर ती यशस्वीरीत्या पूर्णपणे लागू कशी करावी हा आहे.
- पूर्वीच्या शासनाने घेतलेले चांगले निर्णय या शासनाने परतवू नयेत. उलट अपुरी राहिलेली योजनेची अंमलबजावणी चांगली आणि यशस्वीरीत्या राबवत, ती पुढे नेहली पाहिजे.
- गडचिरोलीत दारुबंदीसाठी जसा मुक्तीपथ पॅटर्न राबवला त्यातून धडा घ्यायला हवा. दारूतुन मिळणाऱ्या कराच्या मोहात पडू नका. कारण चंद्रपूर जिल्ह्यातून राज्याला मिळणारा कर हा उंट के मूह में जिरा अशा म्हणीप्रमाणे कण आहे. तेव्हा एवढ्याश्या करासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील चोवीस लाख लोकांचे जीव धोक्यात घालू नका.
संबंधित बातमी
दारुबंदीच्या विषयावरुन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे डॉ. अभय बंग यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाले...
Chandrapur | चंद्रपुरच्या दारुबंदीबाबत समीक्षा समिती गठीत करा : विजय वडेट्टीवार | ABP Majha