Politics: शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार आज मतदारसंघात परतणार; भुमरे समर्थकांकडूनही शक्तिप्रदर्शन
Aurangabad News: सत्तार यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे.
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत शिवसेनेचे 35 पेक्षा अधिक आमदार सोबत नेले आहे. गेल्या आठवड्याभरापासून आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीतील एका हॉटेलमध्ये हे आमदार थांबले आहेत. दरम्यान पहिल्यांदाच या आमदारांपैकी एक आमदार आपल्या मतदारसंघात परतणार आहे. विशेष म्हणजे फक्त परतणारच नाही तर शिंदे गटात सामील झाल्याचा शक्तिप्रदर्शन सुद्धा केला जाणर आहे. सिल्लोडचे आमदार तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे हेलिकॉप्टरने आज आपल्या मतदारसंघात परतणार असल्याचा दावा तांच्या समर्थकांनी केला असून, त्यासाठी पोलिसांकडे परवानगी सुद्धा मागीतीली असल्याचे बोलले जात आहे.
सिल्लोडमध्ये भव्य रॅलीचे आयोजन....
सत्तार यांच्या समर्थकांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 10 वाजता सिल्लोड येथील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील. त्यानंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय येथून रॅलीला सुरुवात होणार आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय ते प्रियदर्शनी चौक अशी रॅली मार्गस्थ होणार असून प्रियदर्शनी चौक येथे रॅलीचे सभेत रूपांतर होवून सभे नंतर रॅलीचा समारोप होणार आहे. सत्तार यांच्या समर्थनात आणि एकनाथ शिंदे यांना पाठिंबा म्हणून ही रॅली काढण्यात येणार आहे. तर यावेळी अब्दुल सत्तार हे सुद्धा सहभागी होणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
पैठणमध्ये भूमरेंच्या समर्थनात शिवसैनिक जमणार...
सिल्लोड प्रमाणेच पैठणमध्ये सुद्धा आज सकाळी दहा वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिवसैनिकांना एकत्र येण्याचे आवाहन भुमरे समर्थकांकडून करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या भूमरे यांच्या समर्थनात आणि शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 'हा वाघ एकटा नाही,आम्ही येतोय तुम्ही पण या,' असे भावनिक आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले आहे. त्यामुळे उद्या औरंगाबादमध्ये बंडखोर आमदारांच्या समर्थनात निघणाऱ्या रॅलीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वैजापूरमध्ये आढावा बैठक...
एकीकडे अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे यांच्या समर्थनात त्यांच्या मतदारसंघात शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे, तर दुसरीकडे वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांच्या मतदारसंघात शिवसेनेकडून आढावा बैठक ठेवण्यात आली आहे. या बैठकीत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि औरंगाबादचे संपर्कप्रमुख विजय घोसाळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर तालुक्यातील प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.