(Source: ECI/ABP News/ABP Majha)
8th June in History: जागतिक ब्रेन ट्यूमर दिन, लोकमान्यांनी ‘गीतारहस्य' ग्रंथांचे लेखन पूर्ण केले, अभिनेत्री डिंपल कपाडिया आणि शिल्पा शेट्टीचा जन्म; आज इतिहासात...
8th June in History: सामाजिक आणि दैनंदिन जीवनात 8 जून या दिवशी अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. आज जागतिक ब्रेन ट्यूमर दिन आहे,तर प्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडिया आणि शिल्पा शेट्टी यांचा आज जन्मदिवस आहे.
8th June in History: जून महिना सुरू झाला आहे. दरम्यान, या महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. आज जागतिक ब्रेन ट्यूमर दिन, जागतिक महासागर दिन आहे. इतिहासात आजच्या दिवशी टिळकांनी ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. तर, प्रख्यात अभिनेत्री डिंपल कपाडिया आणि शिल्पा शेट्टीचा जन्म देखील आजच्या दिवशी झाला. चला तर मग जाणून घेऊयात 8 जूनचे इतरही दिनविशेष.
जागतिक ब्रेन ट्यूमर दिन (World Brain Tumor Day)
जगभरात आज जागतिक ब्रेन ट्यूमर दिन साजरा केला जात आहे. या दिवशी लोकांना ब्रेन ट्युमर या आजाराबाबत जागरूक केले जाते. दरवर्षी 8 जून रोजी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस हा प्रथम 8 जून 2000 रोजी जर्मन ब्रेन ट्यूमर असोसिएशन द्वारे साजरा करण्यात आला, ही ब्रेन ट्यूमर रूग्णांची सेवा आणि मदत करणारी एक संस्था आहे. ब्रेन ट्यूमरच्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना या आजाराविषयी जागरु करणे, हे त्यांचे उद्देश होते.
जागतिक महासागर दिन (World Oceans Day)
जागतिक महासागर दिन जगभर 8 जून रोजी पाळला जातो. 2008 सालापासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस अधिकृतरीत्या पाळण्याचे ठरवले. त्यापूर्वी 1982 सालापासून कॅनडामध्ये तो साजरा होत असे. कॅनडा स्थित आंतरराष्ट्रीय संस्था महासागरांच्या संरक्षणासाठी कार्यरत आहे, या संस्थेच्या पुढाकाराने सर्वप्रथम या दिवसाची सुरुवात झाली. वर्ल्ड ओशन नेटवर्क सारख्या विविध संस्था, मत्सयालये, प्राणिशास्त्र विषयात काम करत असलेल्या संस्था; अशा महत्त्वाच्या संस्था यासाठी एकत्रितपणे योगदान दर्शवतात.
1915: टिळकांनी मंडाले तुरुंगात ‘गीतारहस्य’ ग्रंथ लिहून पूर्ण केला.
मंडालेच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना लोकमान्य टिळकांनी 1910-11 च्या हिवाळ्यात 'गीतारहस्य' हा ग्रंथ लिहिला. आजच्या दिवशी 1915 साली हा ग्रंथ त्यांनी लिहून पूर्ण केला आणि त्यानंतर लगेच तो प्रसिद्ध करण्यात आला. या ग्रंथाचे ‘गायकवाड वाड्यात’ प्रकाशन झाले.
1957 : चित्रपट अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा जन्म.
डिंपल चुन्नीभाई कपाडिया या भारतीय चित्रपट अभिनेत्री आहेत. वयाच्या 16व्या वर्षी राज कपूर यांच्या 'बॉबी' (1973) चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्याच वर्षी त्यांचा राजेश खन्ना यांच्याशी विवाह झाला. मादक सौंदर्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या डिंपल यांनी आपल्या अभिनयातील विविधता सिद्ध करण्यासाठी आपल्या चित्रपट निवडीत अधिक चोखंदळता दाखवली.
1975 : भारतीय अभिनेत्री आणि निर्माता शिल्पा शेट्टीचा जन्म.
शिल्पा शेट्टी-कुंद्रा ही भारतीय अभिनेत्री आहे. 1993 साली 'बाजीगर' या हिंदी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यापासून हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांमधील 40 चित्रपटांहून अधिक चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला आहे.
इतर महत्त्वाच्या घटना:
632 ई.पुर्व: इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांचे निधन.
1658: मुघल शासक औरंगजेब यांनी आग्र्याचा किल्ला काबीज केला.
1670 : पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी परत जिंकून घेतला.
1707 : औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि आझमशाह या त्याच्या दोन मुलांमधे दिल्लीच्या तख्तासाठी युद्ध झाले. यात मुअज्जमने आझमशाहला ठार करुन दिल्लीची गादी बळकावली.
1915: भारतीय पत्रकार, लेखक आणि कवी काययार सिंहनाथ राय यांचा जन्म. (मृत्यू: 9 ऑगस्ट 2015)
1917: भावगीत गायक आणि संगीतकार गजाननराव वाटवे यांचा जन्म. (मृत्यू: 2 एप्रिल 2009)
1948 : एअर इंडियाची मुंबई-लंडन विमानसेवा सुरू झाली.
1995: रंगभूमी कलावंत एकपात्री प्रयोगकार राम नगरकर यांचे निधन.
2009: लोकप्रिय भारतीय उर्दू-हिंदी नाटककार, चित्रपट दिग्दर्शक, कवी आणि अभिनेता हबीब तनवीर यांचे निधन.