8th August In History : मराठी सिनेसृष्टीचे सुपरस्टार दादा कोंडके यांचा जन्म; आज इतिहासात...
8th August In History : स्वराज्याच्या पहिल्या लढाईत फत्तेहखानाच्या फौजेचा शिवाजीराजांनी पराभव केला. मुंबईतील काँग्रेसच्या अधिवेशनात 'ब्रिटिश चले जाव' चळवळीचा ठराव आजच्या दिवशी मंजूर झाला होता.
8th August In History : इतिहासात प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. आजच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घडामोडी झाल्या आहेत. स्वराज्याच्या पहिल्या लढाईत फत्तेहखानाच्या फौजेचा शिवाजीराजांनी पराभव केला. मुंबईतील काँग्रेसच्या अधिवेशनात 'ब्रिटिश चले जाव' चळवळीचा ठराव आजच्या दिवशी मंजूर झाला होता. तर, मराठी सिनेसृष्टीचे सुपरस्टार दादा कोंडके यांचा जन्मही आजच्या दिवशी झाला.
1648 : स्वराज्याच्या पहिल्या लढाईत फत्तेहखानाच्या फौजेचा शिवाजीराजांनी पराभव केला
1648 च्या सुरुवातीला आदिलशाहीचे पुरंदर आणि सिंहगड असे मात्तबर किल्ले शिवाजी राजांनी ताब्यात घेतले. अखेर शिवाजी महाराजांच्या वाढत्या कारवाया लक्षात घेउन आदिलशाहने जुलै 1648 मध्ये शिवाजी राजांवर हल्ला करण्याचे ठरवले. खुद्द शहाजी राजांची साथ असल्याशिवाय शिवाजी हे धाडस करणार नहीं अशी खात्री असल्याने आदिलशहाने शहाजी राजांना 25 जुलै 1648 रोजी कपटाने कैद केले आणि शहाजीराजांच्या बंगळूर प्रांतात आदिलशाही सैन्य धाडले. तर फौजेची एक तुकडी पुण्याच्या दिशेने चालून आली. पुणे-सातारा मार्गावर असणाऱ्या खळत-बैलसर येथे स्वराज्याची पहिली मोठी लढाई झाली. ही लढाई 8 ऑगस्ट 1648 रोजी झाली. आदिलशाही सरदार फत्तेखानाच्या फौजेचा 18 वर्षांच्या शिवाजी राजांनी सपशेल पराभव केला. फत्तेखानाच्या 3000 फौजेविरुद्ध खुद्द शिवाजीराजे चालून गेले. ह्या लढाईमध्ये फत्तेखान जबर जखमी होउन पसार झाला. तर पुरंदर-सासवड येथे आदिलशाही सरदार हैबतराव याच्याशी दुसऱ्या एका लढाईत 'बाजी पासलकर' यांना वीरमरण आले. स्वराज्यावरील पुढील धोका टाळण्यासाठी आणि शहाजी राजेंची कैदेतून सुटका करण्यासाठी शिवाजी महाराजांनी सिंहगड आदिलशाहीला परत केला.
1932 : सुपरस्टार दादा कोंडके यांचा जन्म
आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप उमटवणारे अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते दादा कोंडके यांचा आज जन्मदिन. कृष्णा खंडेराव कोंडके असे नाव असलेल्या या अवलिया कलाकाराने रुपेरी पडद्यावर दादागिरी केली. त्यांचे सलग सात चित्रपट हे सिल्वर ज्युबिली ठरले.
बॅंड पथकातून सुरुवात करून हळूहळू वगनाट्ये, नाटके ह्यांनी सुरुवात केलेल्या दादांचे चित्रपट जीवन मेहनतीने साकारले गेले. दादा कोंडके हे सेवा दलात सक्रीय होते. त्यांनी सेवा दलात सांस्कृतिक आघाडीवर कार्यरत राहिले. नाटकांच्या निमित्ताने केलेल्या राज्यभराच्या दौऱ्यांनी दादांना सर्वसामान्यांसाठी करमणुकीचे महत्त्व व कोसा-कोसांवर बदलत जाणारी रसिकता कळली व हेच पुढे त्यांच्या यशाचे गमक सिद्ध झाले.
विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस-लिखित वगनाट्यामुळे दादा कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. 1969 साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. सोंगाड्या (1971), आंधळा मारतो डोळा (1973), पांडू हवालदार (1975), राम राम गंगाराम (1977), बोट लावीन तिथे गुदगुल्या (1978) हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होते.
द्वि-अर्थी, विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. पण काही चित्रपटातील आशयही दुर्लक्ष करण्यासारखा नव्हता. दादांनी आपल्या चित्रपटातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. काही वेळेस तत्कालीन परिस्थितीवर भाष्य केले. दादा कोंडके यांचे चित्रपट हे खऱ्या अर्थाने 'मास'चे (समूहाचे) होते. व्हाईट कॉलर्ड (पांढरपेशा) वर्गाला त्यांच्या कमरेखालच्या विनोदांनी त्यांच्या सिनेमांपासून दूरच ठेवले. पण सामान्य प्रेक्षकांने त्यांना उचलून धरले. चित्रपटातील संवादामुळे अनेकदा त्यांचे सेन्सॉर बोर्डाशी खटके उडाले. दादा कोंडके यांनी मराठीच नव्हे तर हिंदी आणि गुजरातीमध्येही चित्रपट निर्मिती केली.
1942 : मुंबईतील काँग्रेस अधिवेशनात 'चले जाव'चा ठराव मंजूर
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांति मैदान) झालेल्या अधिवेशनात 'चले जाव'चा ठराव मंजूर केला. याप्रसंगी महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला. ही चळवळ भारतातील ब्रिटीश सत्तेचा अंत करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल ठरले. 9 ऑगस्ट पासून ही चळवळ सुरू होणार होती. मात्र, ब्रिटिशांनी 8 ऑगस्ट रोजीच महात्मा गांधी यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांना अटक केली. त्याशिवाय, जवळपास 14 हजार नागरिकांनादेखील अटक केली. भारत छोडो चळवळ 8 ऑगस्ट 1942 रोजी दुसऱ्या महायुद्धादरम्यान सुरू करण्यात आली होती. ही चळवळ भारतातून ब्रिटीश साम्राज्य संपवण्याच्या उद्देशाने होती. भारताला ब्रिटिशांपासून मुक्त करण्यासाठी हे देशव्यापी सविनय कायदेभंग आंदोलन होते. या चळवळीचा भाग म्हणून देशातील अनेक ठिकाणी स्वतंत्र सरकार, प्रति सरकार स्थापन झाले होते. महाराष्ट्रातील सातारामध्ये कॉम्रेड नाना सिंह पाटील यांच्या नेतृत्वात प्रति सरकार स्थापन झाले होते.
इतर महत्त्वाच्या घटना:
1926: साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि बालभारती चे संपादक शंकर पाटील यांचा जन्म.
1940: क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचा जन्म.
1985: भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ध्रुव ही भारताची सहावी व आतापर्यंतची सर्वात मोठी फास्ट ब्रीडर संशोधनपर अणुभट्टी कार्यान्वित झाली.
1994: पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय (Dr. Bhanuben Nanavati College of Architecture for Women) सुरू केले.
1998: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या.
2008: चीनमधील बिंजिंग येथे येथे २९ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.