एक्स्प्लोर
5 वर्षानंतरही मंत्रालयात आगीत जळालेल्या फाईल्सचा नेमका आकडा अस्पष्ट

नागपूर : मंत्रालयाला लागलेल्या आगीला कालच बुधवारी पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. या आगीत ज्या फाईल्स जळाल्या त्यांचे आजचं स्थिती काय हा स्वाभाविक प्रश्न आहे. मात्र ही स्थिती अजूनही नकारात्मकच म्हणावी लागेल. कारण या आगीत 23,333 फाईल्स जळाल्या होत्या. त्यातील फक्त 7094 फाईल्सची पुनर्बांधणी होऊ शकली आहे. महत्वाचं म्हणजे ही माहिती जरी आरटीआय मधून मिळाली असली तरी जळालेल्या फाईल्सचा आकडाच मुळात वेगवेगळ्या आरटीआय मध्ये वेगवेगळा देण्यात आला आहे. आगीत नेमक्या किती फाईल्स जळाल्या हा प्रश्न गुलदस्त्यात आहे. महाराष्ट्राच्या मंत्रालयाला लागलेल्या आगीत ज्या फाईल्स जळल्या त्यांची पुनर्बांधणी होणार होती. पण पाच वर्षांनंतरची स्थिती ही अत्यंत निराशाजनक आहे. पन्नास टक्के फाईल्सची सुद्धा पुनर्बांधणी होऊ शकली नाही. 21 जून 2012 याच दिवशी महाराष्ट्राच्या मंत्रालयाच्या बिल्डिंगला आग लागली. यात अनेकांचा मृत्यू झाला. अनेक जखमी होते आणि हजारो हजारो अतीसंवेदनशील फाईल्स या आगीत नष्ट झाल्या होत्या. काल बुधवारी या आगीला पाच वर्षं पूर्ण झाली. या आगीत गेलेले जीव परत येऊ शकत नसले, तरी जळालेल्या फाईल्सची पुनर्बांधणी होऊ शकते. मात्र ती तरी खरंच कधी पूर्ण होईल का हा एक मोठा प्रश्नच आहे.
- जळलेल्या फाईल्स : 23333
- पुनर्बांधणी झालेल्या फाईल्स : 7094
- पुनर्बांधणी करणे आवश्यक नसलेल्या फाईल्स : 3623
- 5 वर्षांनंतर पुनर्बांधणी न झालेल्या फाईल्स : 12616
आणखी वाचा























