5 फूट उंच, 5 फूट लांब, वजन दीडशे किलो; भंडाऱ्यात विशालकाय 'पुष्पा' बोकडाचा बोलबाला
चांदोरी ग्रामपंचायतचे सदस्य देवाजी हातझाडे यांच्याकडे 25 महिने वयाचा पुष्पा नामक बोकड आहे. तब्बल दीडशे किलो वजनाचा. 5 फूट उंच आणि पाच फूट लांबीचा हा बोकड पाहिल्यावर भल्याभल्यांचा थरकाप उडतो.
भंडारा : भंडारा जिल्ह्यात आहे तब्बल दीडशे किलो वजनाचा पुष्पा नामक बोकड. होय हे ऐकून तुमच्या कानावर विश्वास बसला नसेल पण हे खरं आहे. भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील चांदोरी या गावात तब्बल दीडशे किलो वजनाचा विशालकाय पाच फूट उंच आणि पाच फूट लांबीचा पुष्पा नामक बोकड आहे. याची अंगकाठी बघता जिल्ह्यात इतक्या मोठ्या वजनाचा एकमेव बोकड भंडारा जिल्ह्यात आहे. ज्याप्रमाणे पुष्पा नामक सिनेमा फेमस झाला त्याचप्रमाणे भंडाऱ्यातील हा पुष्पा बोकडही फेमस झाला आहे. त्यामुळे त्याला खरेदी करण्यासाठी एकच झुंबड चांदोरी गावात उडाली आहे.
साकोली तालुक्याच्या चांदोरी ग्रामपंचायतचे सदस्य देवाजी हातझाडे यांच्याकडे 25 महिने वयाचा पुष्पा नामक बोकड आहे. तब्बल दीडशे किलो वजनाचा. 5 फूट उंच आणि पाच फूट लांबीचा हा बोकड पाहिल्यावर भल्याभल्यांचा थरकाप उडतो. या पुष्पाला पाहिल्यावर तो नेमकं खातो तरी काय असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. तर याला रोज खाण्यासाठी कुडवाभर तांदूळ आणि कुडवाभर गहू लागतो. त्याला रोज फिरल्यानंतर मसाजही लागतो.
पुष्पा घराबाहेर पडून रस्त्याने चालू लागला तर त्याची अंगकाठी पाहून चांगलेचांगले थरथर कापत त्याला वाट मोकळी करुन देतात. त्याचा हा रुबाब बघता पुष्पा नामक दाक्षिणात्य चित्रपटातील अल्लू अर्जुनप्रमाणे त्याचाही दरारा भंडाऱ्यात पाहायला मिळत आहे. आता त्याची चर्चा पंचक्रोशीत पसरली असून या पुष्पाला खरेदी करण्यासाठी चांदोरी गावात झुंबड उडाली आहे. आता या पुष्पाचा तोरा बघता त्याच्या मालकाने किंमत 2 लाख रुपये ठेवली आहे. मात्र व्यापाऱ्यांनी लावलेली बोली लक्षात घेता मालक देवाजी हातझाडे 'झुकेगा नही साला' म्हणत किंमत सोडायला तयार नाही. त्यामुळे लाखोची बोली असलेल्या पुष्पाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात लागू लागली आहे.
पाच फूट, लांब पाच फूट उंच असलेल्या भंडारा जिल्ह्यातील एकमेव असलेल्या बोकडाला बघण्यासाठी हातझाडे यांच्या घरी बघ्यांची गर्दी दररोज पाहायला मिळत आहे. त्यामुळे एका सेलिब्रेटीप्रमाणे असलेला पुष्पा आता भंडारा जिल्ह्यात फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर देखील दिसायला लागला आहे. संपूर्ण देशात फेमस असलेल्या पुष्पा चित्रपटाप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील हा पुष्पा देखील फेमस झाला आहे.