Cyclone Tauktae : तोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग अंधारात, 447 घरांचे नुकसान तर 144 नागरिकांचं स्थलांतर
तोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्हा अंधारात गेला आहे. याशिवाय 447 घरांचे नुकसान झालं असून 144 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. याशिवाय मोबाईल नेटवर्क, इंटरनेट सुविधा खंडित झाली आहे.
सिंधुदुर्ग : तोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्हा अंधारात गेला आहे. जिल्ह्यातील बहुतांशी भागात विजेच्या खांबांवर झाडं कोसल्यामुळे विद्युत पुरवठा ठिकठिकाणी खंडित झाला आहे. जिल्ह्यातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी दोन दिवस जाऊ शकतात. तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील रस्त्यावर झाडं कोसळली आहेत. त्यामुळे बहुतांशी रस्ते बंद आहेत. स्थानिक नागरिक त्या त्या ठिकाणी झाडं तोडून मार्ग सुखकर करण्याचा प्रयत्न करत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे 447 घरांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली आहे. तसंच 37 गोठ्यांचे नुकसान झालं आहे. 143 ठिकाणी झाडे पडली असून 3 शाळांचे, 10 शेडचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नुकसान झालेल्या शेडमध्ये एका स्मशान शेडचाही समावेश आहे. त्याशिवाय 14 शासकीय इमारतीचे आणि 23 विद्युत पोल पडले असून 2 विद्युत वाहिन्यांचेही नुकसान झाले आहे.
वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले असून तिथे 160 घरांचे नुकसान झाले आहे. 15 गोठ्यांचे, 2 शाळांच्या नुकसानीची माहिती आहे. विजेचे खांबही पडले आहेत. कणकवली तालुक्यात 90 घरांचे, 10 गोठ्यांचे, एका शाळेचे, 4 शासकीय इमारतींचे, एका शेडचे नुकसान झाले आहे. तसंच 6 विजेच्या खांबांचंही नुकसान झालं आहे. 6 ठिकाणी झाडं कोसळण्याची घटना घडली आहे. सावंतवाडी तालुक्यात 57 घरांचे, 3 गोठ्यांचे, 3 शेडचे आणि विद्युत खांबांचं नुकसान झालं आहे. तसंच अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत. कुडाळ तालुक्यात 43 घरांचे, 3 गोठ्यांचे, 4 शेडचे आणि 3 शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे. तालुक्यात 12 ठिकाणी विजेच्या खांबाचे नुकसान झालं आहे. 53 ठिकाणी झाडे कोसळली आहेत. वेंगुर्ला तालुक्यात 40 घरांचे, 2 गोठ्यांचे आणि 6 शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे. तर 5 ठिकाणी झाडे पडली आहेत. मालवण तालुक्यात 34 घरांचे, एका गोठ्याचे, एका शेडचे नुकसान आणि 3 ठिकाणी झाडे पडली आहेत. तर एका विद्युत वाहिनीचे नुकसान झालं आहे. देवगड तालुक्यात 22 घरांचे, 3 गोठ्यांचे आणि एका शासकीय इमारतीचे नुकसान झालं आहे. एका विद्युत वाहिनीचे नुकसानीबरोबरच 6 ठिकाणी झाडं पडली आहेत. दोडामार्ग तालुक्यात एका घराचं नुकसान झालं आहे तर 8 ठिकाणी झाडं पडली आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 144 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. त्यामध्ये वेंगुर्ला तालुक्यातील खवणे इथल्या 35 व्यक्ती, निवती मेंढा इथले 23 व्यक्ती, देवगड तालुक्यातील आनंदवाडी-तारामुंबरी इथले 44 व्यक्ती आणि देवगड इथले 7 व्यक्ती, मालवण तालुक्यातील देवबाग इथल्या 35 व्यक्तींचा समावेश आहे.
तोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्हा अंधारात गेला आहे. जिल्ह्यात सर्वत्र वीज वाहिन्या तुटल्याने संपूर्ण जिल्ह्यातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे कोविड सेंटरला धोका उद्भवण्याची शक्यता आहे. मोबाईल नेटवर्क, इंटरनेट सुविधा खंडित झाली आहे. जिल्ह्यातील अजूनही वाऱ्याचा वेग मंदावला नाही, सोसाट्याच्या वाऱ्यासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यात ताशी 60 ते 70 किमी वेगाने वारे वाहत आहेत.