3rd December In History : भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांचा जन्म, अभिनेते देव आनंद यांचे निधन, भोपाळमधील वायू गळतीमुळे हजारो जणांचा मृत्यू; आज इतिहासात
On This Day In History : कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे आजच्याच दिवशी निधन झाले. इतिहासात आजच्या दिवशी 3 डिसेंबर 1984 रोजी भोपाळमधील युनियन कार्बाइड पेस्टिसाइड प्लांटमधून विषारी वायूची गळती झाली.
मुंबई : इतिहासात नोंदवल्या गेलेल्या प्रत्येक तारखेप्रमाणे 3 डिसेंबरच्या दिवशी देखील अनेक चांगल्या-वाईट घटना घडल्या आहेत. आजच्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबर 1984 रोजी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये अतिशय दुर्देवी घटना घडली. 3 डिसेंबर 1984 रोजी भोपाळमधील युनियन कार्बाइड पेस्टिसाइड प्लांटमधून विषारी वायूची गळती झाली. या अपघातात हजारो लोकांचा मृत्यू झाला, तर हजारो लोक जखमी झाले. या बरोबरच हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांचे 3 डिसेंबर 1979 रोजी निधन झाले. जागतिक हॉकीच्या सर्वोत्तम खेळाडूंमध्ये त्यांची गणना होते. तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे ते खेळाडू होते. याबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत जवळपास सहा दशके आपल्या कौशल्याची, अभिनयाची आणि रोमँटिसिझमची जादू प्रेक्षकांवर पसरवणारे सदाबहार अभिनेते देव आनंद यांनीही 3 डिसेंबर 2011 रोजी जगाचा निरोप घेतला. या दिवशी देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या रूपाने आपल्याला एक महान व्यक्तिमत्त्व लाभले. डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा जन्म ३ डिसेंबर 1884 रोजी झाला.
1829 : व्हाईसरॉय लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी भारतातील सती प्रथेवर बंदी घातली
व्हाईसरॉय लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी राजा राममोहन राय यांच्या मदतीने 3 डिसेंबर 1829 रोजी भारतात सती प्रथेवर बंदी घातली. पतीच्या निधनानंतर त्याच चितेवर पत्नीला देखील जिवंत जाळले जात असे. त्यामुळे बेंटिक यांनी ही क्रूर प्रथा बंद केली. बेंटिकने या प्रथेविरुद्ध कायदा बनवला आणि 1829 मध्ये कलम 17 द्वारे विधवांची सती प्रथा बेकायदेशीर असल्याचे घोषित केले.
1882 : आधुनिक भारतीय चित्रकलेचे प्रणेते नंदलाल बोस यांचा जन्म
नंदलाल बोस हे आधुनिक भारतीय चित्रकलेच्या सुरुवातीच्या कलाकारांपैकी एक होते. अबनींद्रनाथ टागोर यांचे प्रसिद्ध शिष्य असलेले भारतीय शैलीतील प्रसिद्ध चित्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. 1976 मध्ये भारत सरकारच्या संस्कृती विभागाने आणि भारतीय पुरातत्व संग्रहालयाने त्यांची चित्रकला आणि कलात्मक महत्त्व लक्षात घेऊन त्यांना एक मौल्यवान कला खजिना म्हणून घोषित केले. नंदलाल बोस यांचा जन्म बिहारमधील मुंगेर जिल्ह्यातील तारापूर येथे 3 डिसेंबर 1882 रोजी एका मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात झाला.
1884 : भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांचा जन्म
स्वातंत्र्यानंतर 1950 मध्ये आपल्या देशात राज्यघटना अस्तित्त्वात आल्यानंतर सुमारे 3 वर्षांनंतर डॉ. राजेंद्र प्रसाद यांची देशाच्या राष्ट्रपती पदावर नेमणूक झाली. ते एक राजकीय नेते आणि वकील होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी डॉ. प्रसाद हे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये सामील झाले. 3 डिसेंबर 1884 रोजी बिहारच्या सीवान जिल्ह्यात राजेंद्र प्रसाद यांचा जन्म झाला. गुलाम भारताला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी लढ्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले होते.
1889 : खुदीराम बोस यांचा जन्म
अगदी लहान वयात देशासाठी बलिदान देणाऱ्या एका नावाची देशाच्या इतिहासात नोंद आहे. ज्या वयात तरुणाईला आपल्या करिअरची आणि भविष्याची चिंता असते, त्या वयात असा क्रांतिकारी देशासाठी सुळावर चढला. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी देशासाठी बलिदान देणाऱ्या खुदीराम बोस यांना 1908 मध्ये 11 ऑगस्टलाच फाशी देण्यात आली होती. त्यांचा जन्म 3 डिसेंबर 1889 रोजी झाला.
1951 : कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचे निधन
24 ऑगस्ट 1880 रोजी बहिणाबाई चौधरी यांचा जन्म झाला. बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. निरक्षर असल्या तरी त्यांच्याकडे जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. ज्यात त्यांचे सारे आयुष्य गेले, ते शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे त्या ओव्या रचून गात असत. 3 डिसेंबर 1951 रोजी त्यांचे निधन झाले.
1971 : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू
आजच्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबर 1971 रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झाले. या युद्धामुळे बांगलादेशचा उदय झाला. 27 मार्च 1971 रोजी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यानी पूर्व पाकिस्तानात चालू असलेल्या बांगला देशसाठीच्या स्वातंत्र्य लढ्याला पूर्ण पाठिंबा जाहीर केला. पाठिंबा जाहीर केल्यानंतर पूर्व पाकिस्तानी जनतेला जी मदत लागेल ती पुरवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पूर्व पाकिस्तानात चाललेल्या मानवी हत्यांमुळे मोठ्या संख्येने तिकडील लोक सीमा ओलांडून भारतात आश्रयास आले. सीमेवर छावण्या उभारण्यात आल्या. अज्ञातवासातील बांगला सैनिकांनी व लष्करी अधिकाऱ्यांनी लगेचच मुक्तिवाहिनीच्या स्वयंसेवकांना तयार करण्यास सुरुवात केली. नोव्हेंबर पर्यंत घडामोडींना आणखीनच वेग आला व युद्धाची शक्यता अटळ झाली. भारताने पूर्व पाकिस्तान सीमेवर सैन्य जमा केले. पावसानंतरच्या काळात जमीन बऱ्यापैकी कोरडी झाली होती. तसेच हिमालयात थंडीमुळे चिनी आक्रमणाची शक्यता कमी झाली. 23 नोव्हेंबर 1971 रोजी पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष याह्याखान यांनी पाकिस्तानमध्ये आणीबाणी लागू केली व युद्धास तयार रहाण्याचे देशवासीयांना आवाहन केले. रविवार डिसेंबर 3 रोजी पाकिस्तानी हवाई-दलाने उत्तर भारतातील अनेक हवाईतळांवर हल्ले चढवून युद्धाची पहिली ठिणगी टाकली. भारताने त्यांना जशास तसे उत्तर दिले.
1979 : हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांचे निधन
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांनी भारताच्या क्रीडा क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान दिलं आहे. मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी झाला. एकोणिसाव्या शतकामध्ये ध्यानचंद आंतरराष्ट्रीय स्तरावर हॉकी या खेळासाठी भारत संघाचे प्रतिनिधित्व करत होते. आज ध्यानचंद यांचा जन्मदिवस भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. ध्यानचंद यांनी ऑलम्पिकमध्ये भारताला 1928 – 1964 या काळामध्ये सात सुवर्णपदक पटकावून दिली होती. ध्यानचंद हे त्यांच्या हॉकी या खेळातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विक्रमांमुळे पद्मभूषण या पुरस्काराचे मानकरी ठरले. 3 डिसेंबंर 1979 रोजी त्यांचे निधन झाले.
1992 : जागतिक दिव्यांग दिन
जागतिक दिव्यांग (अपंग) दिन (World Disability Day) दरवर्षी 3 डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघातर्फे 1992 पासून जागतिक दिव्यांग दिन जाहीर करण्यात आला. तेव्हापासून 3 डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरात जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो.
1982 : भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजचा वाढदिवस
भारतीय क्रिकेटर मिताली राजचा जन्म 3 डिसेंबर 1982 रोजी झाला. ही भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आहे. कसोटी क्रिकेट सामन्यात द्विशतक झळकावणारी ती पहिली महिला आहे. महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहा हजार धावा पूर्ण करणारी मिताली राज ही एकमेव महिला क्रिकेटपटू आहे. मिताली राज ही T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2,000 किंवा त्याहून अधिक धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. राज ही एकमेव खेळाडू आहे जिने भारताला एकापेक्षा जास्त वेला आयसीसी एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये नेले.
1984 : भोपाळ वायू दुर्घटना
मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमधील युनियन कार्बाईड या कारखान्यातून मेथिल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती झाली. यामध्ये सुमारे चौदाशे लोक मृत्युमुखी पडले. नंतरच्या काही दिवसात मृतांची एकूण संख्या सुमारे 20 हजार इतकी झाली.
2011: बॉलिवूड अभिनेते देव आनंद यांचे निधन झाले
हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध सदाबहार अभिनेते देव आनंद यांचे हृदयविकाराच्या झटक्याने लंडनमध्ये 3 डिसेंबर 2011 रोजी निधन झाले. 1946 मध्ये 'हम एक हैं' या चित्रपटातून देवानंद यांच्या करिअरची सुरुवात झाली. 1947 मध्ये 'जिद्दी' रिलीज झाला. येथूनच त्यांच्या यशाला सुरूवात झाली. 'जिद्दी' नंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. देवानंद यांनी 'पेइंग गेस्ट', 'बाजी', 'ज्वेल थीफ', 'सीआयडी', 'जॉनी मेरा नाम', 'अमीर गरीब', 'वॉरंट', 'हरे राम हरे कृष्णा' आणि यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'देस परदेस'. हिट सिनेमे दिले. भारतीय चित्रपटसृष्टीत अतुलनीय योगदान देणाऱ्या देवानंद यांना 2001 मध्ये प्रतिष्ठेच्या 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि 2002 मध्ये त्यांना 'दादा साहेब फाळके पुरस्कार' प्रदान करण्यात आला. 1949 मध्ये त्यांनी त्यांची निर्मिती संस्था 'नवकेतन इंटरनॅशनल फिल्म' स्थापन केली आणि 35 हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली.
इतर महत्त्वाच्या घटना
1796 : दुसरा बाजीराव मराठा साम्राज्याचा पेशवा बनला.
1790 : लॉर्ड कॉर्नवॉलिसने मुर्शिदाबादच्या नवाबाकडून फौजदारी न्याय प्रशासनाचे अधिकार काढून घेतले
1870 : बॉम्बे म्युच्युअल लाईफ अॅश्युअरन्स सोसायटी या भारतातील पहिल्या विमा कंपनीची स्थापना झाली.
1892 : कवी माधव केशव काटदरे यांचा जन्म