28th August Headlines: महाविकास आघाडीची आज मुंबईत बैठक, दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल; आज दिवसभरात
28th August Headlines: विरोधकांची आघाडी 'इंडिया'च्या मुंबईतील बैठकीसंदर्भात महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक होणार आहे. दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकालही आज लागणार आहे.
28th August Headlines: आज दिवसभरात बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. पुण्यातील गणेश मंडळांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. विरोधकांची आघाडी इंडियाच्या मुंबईतील बैठकीसंदर्भात महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक होणार आहे. दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकालही आज लागणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा आज होणार असून या अंतर्गत विविध घोषणा होण्याची शक्यता आहे.
अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यातील गणेश मंडळांची बैठक
पुण्यातील गणेश मंडळांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. पुण्याचे पालकमंत्री जरी चंद्रकांत पाटील असले तरी अजित पवार सतत बैठका घेत आहेत, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पुणे महापालिका आयुक्त अशा अनेक बैठका त्यांनी घेतल्या आहेत.
महाविकास आघाडीची आज मुंबईत बैठक
विरोधकांची आघाडी इंडियाच्या मुंबईतील बैठकीसंदर्भात महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. अंतिम तयारीसंदर्भात आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होईल. या बैठकीत अंतिम तयारीचं नियोजन केलं जाईल. त्याचसोबत राहुल गांधी यांचं मुंबईत जंगी स्वागत केलं जाणार आहे, यासाठी राहुल गांधीच्या स्वागताच्या तयारीचा ही आढावा काँग्रेस नेते घेणार आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीजची आज वार्षिक सर्वसाधारण सभा
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) आज दुपारी 2 वाजता होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची 46वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस आयपीओ शेअर बाजारात सूचिबद्ध झाल्यानंतर प्रथमच एजीएम आयोजित केली जात आहे.
पंतप्रधान नवनियुक्त व्यक्तींना देणार नियुक्ती पत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजगार मेळाव्याअंतर्गत सकाळी 10.15 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे 51 हजारांहून अधिक नवनियुक्त व्यक्तींना नियुक्ती पत्रांचं वाटप करणार आहेत, यावेळी पंतप्रधान संबोधित करणार आहेत. नागपुरात सीआरपीएफ कॅम्पमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत.
दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल
दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज जाहीर लागणार आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मुंबई कोर्टाने फटकारल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे हनुमान चालीसा प्रकरण आणि राजद्रोह प्रकरणी मुंबईच्या सेशन कोर्टात उपस्थित राहणार आहेत.
रांची - आज 29 वर्षांनंतर चारा घोटाळ्यातील 124 आरोपींविरोधात सीबीआय न्यायालयाचा निर्णय येणार आहे. आरोपींपैकी 8 कोषागार अधिकारी, 29 पशुवैद्यक, 86 पुरवठादारांविरुद्ध निकाल येणार आहे. आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव या चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत आहेत, ते सध्या प्रकृतीच्या कारणास्तव जामिनावर बाहेर आहेत.
जपान आज चंद्रावर आपली मोहीम ‘मून स्निपर’ प्रक्षेपित करणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 5.56 वाजता प्रक्षेपण होणार आहे.