(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Conservation Reserve Area : वन्यजीवांच्या संवर्धनासाठी राज्यात 18 नवीन संवर्धन राखीव क्षेत्र घोषीत
राज्यात 18 नवीन आणि सात प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्र (Conservation Reserve Area) घोषीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मान्यता दिली आहे.
Conservation Reserve Area : राज्यात 18 नवीन संवर्धन राखीव क्षेत्र (Conservation Reserve Area) घोषीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मान्यता दिली आहे. तसेच सात प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्रांची देखील घोषणा केली आहे. त्यामुळं महाराष्ट्रात आता संवर्धन राखीव क्षेत्रांची संख्या 52 होणार आहे. त्यामाध्यमातून राज्यात सुमारे 13 हजार चौरस किलोमीटर क्षेत्र संरक्षित होण्यास मदत होणार आहे. अशा संवर्धन राखीव क्षेत्रातील वन्यजीवांचे संवर्धन करताना त्या भागातील ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनात अडचण येणार नाही. तसेच त्यांचं हक्क बाधीत होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मंत्रालयात मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची 19 वी बैठक झाली. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar
), वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. वाय. एल. पी. राव, वन्यजीव मंडळाचे सदस्य सचिव तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये उपस्थित होते. या बैठकीत 18 नवीन संवर्धन राखीव क्षेत्र घोषीत करण्यात आली आहेत. याचा ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी असे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात ही 18 नवीन संवर्धन राखीव क्षेत्र घोषीत
पुणे आणि रायगड जिल्ह्यातील वेल्हे-मुळशी (87.41 चौरस कि.मी.) आणि लोणावळा (121.20 चौरस कि.मी.), पुणे-ठाणे जिल्ह्यातील नानेघाट ( 98.78 चौरस कि.मी.), पुणे जिल्हा भोरगिरीगड (37.64 चौरस कि.मी.), नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी (62.10 चौरस कि.मी.) सुरगाणा (86.28 चौरस कि.मी.), ताहाराबाद (122.44 चौरस कि.मी.), नंदूरबार जिल्ह्यातील कारेघाट (97.45चौरस कि.मी.), चिंचपाडा (93.91 चौरस कि.मी.), रायगड जिल्ह्यातील घेरा माणिकगड (53.25 चौरस कि.मी.) व अलिबाग (60.03 चौरस कि.मी.), पुणे जिल्ह्यातील राजमाची (83.15 चौरस कि.मी.), ठाणे जिल्ह्यातील गुमतारा (125.50 चौरस कि.मी.), पालघर जिल्ह्यातील जव्हार (118.28 चौरस कि.मी.), धामणी (49.15चौरस कि.मी.), अशेरीगड (80.95 चौरस कि.मी.), सांगली जिल्ह्यातील आटपाडी (9.48 चौरस कि.मी.), चंद्रपूर जिल्ह्यातील एकारा (102.99 चौरस कि.मी.) यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय उद्यानालगत आणि अभयारण्यालगत किंवा दोन संरक्षित क्षेत्र जोडणाऱ्या भूप्रदेशातील प्राणी, वनस्पती यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्याच्या हेतूने संवर्धन राखीव क्षेत्र घोषीत केली जातात. प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्रांमध्ये नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गड, ठाणे जिल्ह्यातील मोरोशीचा भैरवगड, औरंगाबाद जिल्ह्यातील धारेश्वर, त्रिकुटेश्वर, कन्नड, पेडकागड तर नांदेड जिल्ह्यातील किनवटचा समावेश आहे.
वन्य जीवांच्या संवर्धनासाठी खासगी प्रकल्पांकडून दोन ऐवजी चार टक्के रक्कम घ्या
वन्य जीवांच्या संवर्धनासाठी खासगी प्रकल्पांकडून दोन ऐवजी चार टक्के रक्कम घ्यावी. तसेच राज्य वन्यजीव निधी स्थापन करावा, असे मत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं.
अभयारण्य, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र आणि व्याघ्रभ्रमण मार्गात ज्या प्रकल्पांना वन्यजीव मान्यता आवश्यक आहे, त्यांच्याकडून बाधीत क्षेत्रातील प्रकल्प किंमतीच्या दोन टक्के रक्कम वन्यजीवांच्या संवर्धनासाठी जमा केली जाते. आता खासगी प्रकल्प यंत्रणेकडून चार टक्के रक्कम घेण्याबाबतची सूचना वनमंत्री मुनगंटीवार यांनी मांडली. त्याला यावेळी मान्यता देण्यात आली. ही रक्कम जमा करण्यासाठी राज्य वन्यजीव निधी स्थापन करण्याची सूचना देखील मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर या चार टक्के रक्कमेतील एक टक्का निधी हा राज्यातील जैवविविधतेसाठी वापरण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: