Nashik Leopard : बिबट्यासह इतर वन्यप्राण्यांना माहेरघरीच सासुरवास, वन्यप्राणी उपचार केंद्राच्या प्रतीक्षेत
Nashik Leopard : नाशिकमध्ये (Nashik) सुसज्ज असे वन्यप्राणी उपचार केंद्राचे (Transit Treatement Center) काम प्रगतीपथावर असून हे बिबट्याला माहेरघरी होणारा सासुरवास थांबणार आहे.
Nashik Leopard : नाशिक (Nashik) शहर परिसरासह जिल्ह्यातील काही भागात बिबट्याच्या (Leopard) वावर वाढला असून अशातच बिबट्याच्या अपघाती मृत्यूचे (Accident Death) प्रमाणही वाढले आहे. विशेष म्हणजे नाशिकमध्ये सुसज्ज असे वन्यप्राणी उपचार केंद्राचे (Transit Treatement Center) काम प्रगतीपथावर असून हे काम लवकरात लवकर झाल्यास बिबट्याला माहेरघरी होणारा सासुरवास थांबण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हे उपचार केंद्र लवकर सुरु होणे महत्वाचे आहे.
नाशिक आणि बिबट्या हे जणू समीकरणच झाले आहे. दर आड दिसाला नाशिक शहर परिसरात कुठे ना कुठे बिबट्याचा हल्ला, किंवा बिबट्याचे दर्शन नित्याचे झाले आहे. बिबट्याच्या दर्शनाबरोबर अपघात होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. त्याचबरोबर तरस, कोल्हा, गिधाड, मोर आदीसह इतर वन्यप्राणी अपघातात जखमी तसेच मृत्यू झाल्याच्या घटना समोर आले आहेत. अनेकदा भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या तसेच इतर वन्यप्राणी शेतांतील विहरीत पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर काहीवेळा रस्ता ओलांडताना अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
दरम्यान नाशिकमध्ये असलेल्या तसेच इतर वनविभागाच्या ठिकाणी असलेल्या पशु वैद्यकीय रुग्णालयात या वन्यप्राण्यांवर उपचार करण्यात येतात. वनविभागाच्या कर्मचारी तसेच नाशिकच्या इको एको यांच्या माध्यमातून संबधित जखमी वन्यप्राण्यावर योग्य उपचार करण्याचे काम करण्यात येते. मात्र अनेकदा सुसज्ज साधनांच्या अभावी वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दुर्मिळ पक्षी, असो किंवा इतर वन्य प्राणी असो त्यांना नाशिकमध्ये सुसज्ज उपचार केंद्राची आवश्यकता होती. त्यासाठी 1998 पासून वनविभागाच्या माध्यमातून सुरु असलेल्या प्रयत्नांना यश आल्याने नाशिकच्या म्हसरूळ परिसरात सुसज्ज असे वन्यप्राणी उपचार केंद्र सुरु होत आहे. हे उपचार केंद्र लवकरात लवकर सुरु होऊन वन्यप्राण्यांना संपणार असल्याचे दिसते.
काही महिन्यापूर्वी भूमिपूजन
काही महिन्यापूर्वी नाशिकच्या म्हसरूळ परिसरात जागतिक वन्यजीव सप्ताहानिमित्त पहिल्या वन्यजीव उपचार केंद्राच्या (ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर) बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. सद्यस्थितीत हे काम 70 टक्के पूर्ण झाले असून लवकरच उपचार केंद्र सेवेत दाखल होणार आहे. उपचार केंद्र हे 02 एकर जागेत उपचार केंद्र उभारले जात असून चार कोटी 92 लाख 86 हजार रुपये निधी प्रस्तावित आहे. केंद्रात निरीक्षण, ऑपरेशन थिएटर, आयसीयू, शवविच्छेदन, एक्स-रे असे स्वतंत्र कक्ष असतील. मेडिकल अँड फूड स्टोअरेज, उपचार व बचाव साहित्यासाठी कक्ष असतील. मृत वन्यजीवांच्या अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र व्यवस्था असेल. या केंद्रात बिबट्यांसाठी आठ स्वतंत्र कक्षांसह वाघांसाठी दोन स्वतंत्र कक्ष असतील. विविध प्रजातीच्या पक्ष्यांसाठी सात कक्ष असतील. शाकाहारी प्राण्यांसाठी सहा कक्ष असतील. केंद्रात पूर्ण वेळ पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्यात येईल.
वन्यप्राणी उपचार केंद्र गरजेचे
सध्या जखमी वन्यप्राण्यांवर उपचार सुरु आहेत. वनविभाग तसेच इको एको च्या माध्यमातून सर्वोतोपरी प्रयत्न करून वन्यप्राण्यांवर उपचार केले जातात. मात्र अनेकदा वेळीच उपचार न मिळाल्याने प्राणी दगावतात. मात्र उपचार केंद्र सर्व सुविधांनी सुसज्ज असणार असल्याने प्रत्येक वन्यप्राण्याला स्वतंत्र उपचार सुविधा मिळणार आहे. सह्याद्री, सातमाळांची पर्वतरांग, गोदावरी, दारणा व गिरणा यांसारख्या नद्यांचे खोरे असल्याने वन्यजीवांची संख्याही अधिक आहे. पण, योग्य उपचारांअभावी अनेक वन्यजीवांचा गेल्या काही वर्षांत मृत्यू झाला आहे. बिबट्यांना उपचारांसाठी पुणे, चंद्रपूर, जुन्नर, औरंगाबाद येथील केंद्रांमध्ये न्यावे लागायचे, मात्र आता नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील बिबट्यांसह मुक्ताईनगर, जळगाव, यावलसह सातपुड्यातील वाघांना नाशिकमध्ये उपचार घेता येतील. त्यामुळे अलीकडच्या वर्षात नाशिक शहर परिसरासह जिल्ह्यातील काही भागात झालेल्या बिबट्यासह इतर वन्यप्राण्यांचा मृत्यू ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे नाशिकचे वन्यप्राणी उपचार केंद्र किती महत्वाचे आहे हे , यावरून स्पष्ट होते.
दरम्यान नाशिकच्या वन्यप्राणी उपचार केंद्राचे काम लवकरच पूर्ण होणार असून बिबट्यासह इतर वन्यप्राण्यांवर उपचार करणे अधिक सुलभ होणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक प्राण्यांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येत असल्याने प्रत्येक प्राण्यांवर स्वतंत्र पद्धतीने उपचार करणे सोयीस्कर होणार आहे. परिणामी मृत्यूंच्या संख्येत निश्चितच घट होणार आहे. त्याशिवाय केंद्रात निरीक्षण, ऑपरेशन थिएटर, आयसीयू, शवविच्छेदन, एक्स-रे असे स्वतंत्र कक्ष असतील. मेडिकल अँड फूड स्टोअरेज, उपचार व बचाव साहित्यासाठी कक्ष असल्याने नाशिकच्या वन्य प्राण्यांसाठी महत्वाचे ठरणार असल्याचे मत इको एकोचे अभिजित महाले यांनी दिली.