एक्स्प्लोर
स्कूल बस चालकाच्या चुकीमुळे विद्यार्थ्याचा उजवा पाय आयुष्यभरासाठी निकामी
चालकाने विद्यार्थ्याला रस्त्यावरील शेळ्या हाकलण्यासाठी खाली उतरवलं आणि नंतर तो बसमध्ये चढत असतानाच बस पुढे घेतली. त्यावेळी रस्त्यावर कोसळलेल्या विद्यार्थ्याच्या पायावरून चाक गेले. त्यामुळे हा अपघात झाला.
![स्कूल बस चालकाच्या चुकीमुळे विद्यार्थ्याचा उजवा पाय आयुष्यभरासाठी निकामी 15 years old student loss his leg due to mistake of school bus driver स्कूल बस चालकाच्या चुकीमुळे विद्यार्थ्याचा उजवा पाय आयुष्यभरासाठी निकामी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/24210230/aurangabad-student.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
औरंगाबाद : स्कूल बस चालकाच्या चुकीमुळे 15 वर्षीय विद्यार्थ्याचा उजवा पाय निकामी झाल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली. चालकाने विद्यार्थ्याला रस्त्यावरील शेळ्या हाकलण्यासाठी खाली उतरवलं आणि नंतर तो बसमध्ये चढत असतानाच बस पुढे घेतली. त्यावेळी रस्त्यावर कोसळलेल्या विद्यार्थ्याच्या पायावरून चाक गेले. त्यामुळे हा अपघात झाला.
औरंगाबादपासून काही अंतरावर असलेल्या गांधेलीजवळ शुक्रवारी सकाळी हा अपघात घडला. या प्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओम भाऊसाहेब वाघ असं 15 वर्षीय (आडगाव बु., ता. औरंगाबाद) असं जखमी विद्यार्थ्याचं नाव असून तो शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयात नववीत शिकतो. बसचालकाचं नाव नवनाथ भुजंगराव घोडके (40, रा. एकोड-पाचोड) असं आहे.
ओम झाल्टा येथील शिवछत्रपती विद्यालयात दोन वर्षांपासून शिकतो. तो नियमित स्कूल बसने ये-जा करतो. गावातील इतर विद्यार्थीही त्याच्यासोबत असतात. शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता स्कूल बस विद्यार्थ्यांना घेऊन आडगाव येथून निघाली. बस सकाळी सात वाजता गांधेली रोडने झाल्टा येथे जात होती. गांधेलीजवळ बससमोर शेळ्या आल्या. त्यामुळे चालक नवनाथ घोडके याने ओमला याला खाली उतरून शेळ्या हाकलण्यास सांगितलं. ओमनेही खाली उतरून शेळ्या हाकलल्या. त्यानंतर तो बसमध्ये चढत असताना चालकाने लगेचच बस पुढे घेतली. त्यामुळे हेलपाटून ओम खाली कोसळला. यावेळी बसचं एक चाक ओमच्या पायावरुन गेलं, ज्यामुळे त्याचा पाय आयुष्यभरासाठी निकामी झाला.
या स्कूलबसमध्ये ओमसह त्याची चुलत बहीणदेखील होती. अपघातानंतर चालक घोडके याने दोघांना तेथे सोडून दवाखान्यास जाण्यास सांगितलं. त्यानंतर विद्यार्थ्यांनी नातेवाईकांना फोन करून अपघाताची माहिती दिली. ओमच्या वडिलांनी यांनी तत्काळ गांधेली येथे धाव घेऊन ओमला बीड बायपासवरील रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी लाखो रुपये खर्च सांगितला आहे.
झाल्टा येथे शिवछत्रपती विद्यालय आहे. या शाळेत परिसरातील विविध गावचे विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळेने करार करून खासगी बस भाड्याने लावल्या आहेत. पण, शाळेने बसमध्ये केअर टेकर ठेवलेला नाही. शिवछत्रपती विद्यालयाचा हा निष्काळजीपणा एका विद्यार्थ्याला आयुष्यभरासाठी जखमी करून गेला. विशेष म्हणजे, त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने कुठलीही माणुसकी दाखवली नाही, असा आरोप करण्यात येत आहे.
शाळा मुख्याध्यापक आणि स्कूलबस मालक, चालक यांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. केअर टेकर ठेवणे शाळेची जबाबदारी असते. चालकानेही विद्यार्थ्याचा जीव धोक्यात घातला आहे. हा अतिशय गंभीर प्रकार आहे. गुन्हा दाखल असून त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)