एक्स्प्लोर
वन्यजीव हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांच्या परिवाराला आता 15 लाख रुपये
वन्यजीव हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना यापूर्वी 10 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येत होती. आता मदतीत वाढ केली असून ती रुपये 15 लाख एवढी करण्यात आली आहे.
मुंबई : वाघांच्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असून वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना आता 15 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सांगितले.
अलिकडेच ठार मारलेल्या अवनी वाघीण संदर्भात सदस्य अतुल भातखळकर यांनी लक्षवेधीद्वारे प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना मुनगंटीवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, टी-1 वाघिणीने 13 जणांचा बळी घेतल्यानंतर नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. तिला पकडण्यासाठी वन विभागाने शर्थीचे प्रयत्न केले होते. परंतु ती सापडत नव्हती. मध्यप्रदेश शासनाकडून चार हत्ती बोलावण्यात आले होते. तसेच वन विभागाचे 200 अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. तसेच वन क्षेत्रामध्ये 100 ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. परंतु तरीही वाघिणीचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यानंतर पॅराग्लायडर, इटालियन कुत्रे, सुगंधीत द्रव्ये, थर्मल सेंसर ड्रोन इत्यादींचा वापर करण्यात आला. तरीही वाघिणीचा शोध लागला नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.
त्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी बोराटी-वरुड-राळेगाव रस्त्यावर गस्त करणाऱ्या वन विभागाच्या चमूला अवनी वाघीण दिसली तेव्हा तीला बेशुद्ध करुन जेरबंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वाघिणीने चमूवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यामुळे चमूतील सदस्यांकडून नरभक्षक वाघिणीस (टी-1) ठार करण्यात आले. ही सर्व कार्यवाही न्यायालयाचे आदेश आणि वन विभागाचे नियम पाळूनच करण्यात आली. वन्यजीव हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना यापूर्वी 10 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येत होती. आता मदतीत वाढ केली असून ती रुपये 15 लाख एवढी करण्यात आली आहे. वन्य प्राणी व नागरिक दोघांचाही जीव महत्वाचा असून दोघोचेही संरक्षण कसे करता येईल, तसेच वाघांच्या मृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणण्यासठी प्रयत्न करणार असून याबाबत लवकरच तोडगा काढणार आहोत, असे मुनगंटीवार म्हणाले.
लवकरच देशभरातील वनमंत्री आणि वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करणार असून त्यात वन्यजीवांचे आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत तसेच नव्याने कायदे करण्यासंदर्भात काही सूचना/शिफारशी केंद्र सरकारकडे पाठविणार आहोत. त्याचबरोबर जंगल परिसरातील कोअर सेक्टरमधल्या गावांचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्र सरकारकडे आर्थिक मदतीसाठीचा प्रस्ताव पाठविणार असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले. राज्यातील वाघांची संख्या वाढत आहे पण वाघ व माणसांमध्ये संघर्ष वाढत आहे. त्यामुळे वाघांच्या हल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना सध्या दिली जाणारी दहा लाख रुपयांची मदत वाढवून पंधरा लाखपर्यंत देण्यात येणार आहे तर वाघाच्या हल्ल्यात गाई-म्हशींचा मृत्यु झाला तर साठ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत केली.
दिल्लीतल्या वाघिणीला कधी समजावणार - जयंत पाटील यांचा मुनगंटीवारांना चिमटा
अवनीच्या हत्येनंतर केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, त्याचा धागा पकडत जयंत पाटील म्हणाले की, मुनगंटीवार यांनी मनेका गांधी यांना खासगीत समजावून सांगावे, त्यांनी नाही ऐकले तर अमितभाई शहांना सांगा. त्यांनीही ऐकले नाही तर नरेंद्र मोदींचे समाधान करा असा सल्ला देताना केंद्रीय मंत्रीमंडळातील वाघिणीला समजावयाला कधी जाणार? असा प्रश्न जयंत पाटील यांनी केला.
बफर झोनमधील गावांचे स्थलांतर करा- सुनील प्रभू
यावेळी झालेल्या चर्चेत शिवसेनेचे सुनील प्रभू यांनीही भाग घेतला. मागील तीन वर्षात वाघाच्या हल्ल्यात 51 लोकांचे मृत्यु झाले आहे. वनवासी जंगलाचे रक्षण करतात. पण वाघाच्या हल्ल्यात मनुष्याचा बळी जाऊ नये म्हणून काय उपाय योजणार असा प्रश्न त्यांनी केला. जंगतील बफर झोन व कोअर झोनमधील गावांचे पुनर्वसन करा अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली. या चर्चेत प्रशांत बंब यांनीही भाग घेतला.
50 वाघांचा मृत्यू
राज्यात 2016 ते 15 आॅक्टोबर 2018 या काळात 50 वाघांचा मृत्यू झाला. त्यापैकी 33 वाघांचा नैसर्गिक तर सहा वाघांचा अपघाताने, सात वाघांचा शेतात लावलेल्या विद्युत प्रवाहात तर तीन वाघांचा विषप्रयोगाने मृत्यु झाल्याची माहिती निवेदनात देण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement