13th May In History: लेखक आर. के. नारायण, नाटककार बादल सरकार यांचे निधन; आज इतिहासात
13th May In History: आजच्या दिवशी 1952 मध्ये स्वतंत्र भारतातील संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले होते. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
![13th May In History: लेखक आर. के. नारायण, नाटककार बादल सरकार यांचे निधन; आज इतिहासात 13th May In History on this day writer R K Narayan Badal Sircar death anniversary music director anand modak Pokharan Test 2 13th May In History: लेखक आर. के. नारायण, नाटककार बादल सरकार यांचे निधन; आज इतिहासात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/12/b2473a0d901b148195b3bc8bcb6c4cec1683915880324290_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
13th May In History: आज इतिहासात अनेक घडामोडी घडल्या आहेत. आजच्या दिवशी सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक पटलावर दखल घेण्याजोग्या घटना घडल्या आहेत. आजच्या दिवशी 1952 मध्ये स्वतंत्र भारतातील संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले होते. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याशिवाय इतरही महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत.
1925 : दलित साहित्याचे मर्मग्राही समीक्षक डॉ. भालचंद्र दिनकर फडके यांचा जन्म.
डॉ. भालचंद्र दिनकर फडके मराठीतील ख्यातनाम समीक्षक होते. त्यांची समीक्षेवरील अनेक पुस्तके आहेत, त्यांपैकी ‘कथाकार खानोलकर’ (1969), ‘दलित साहित्य: वेदना आणि विद्रोह’ (1977), ‘मराठी लेखिका: चिंता आणि चिंतन’ (1980) ही काही प्रसिद्ध पुस्तके आहेत. त्यांची समीक्षा मर्मग्राही, सामाजिक भान जागे करणारी आणि प्रेरणा देणारी होती. दलित साहित्याचा त्यांनी वेळोवेळी घेतलेला धांडोळा साक्षेपी समीक्षेचा एक चांगला प्रकार होता.
1950: पुरातत्त्वशास्त्रज्ञ देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांचे निधन
प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कतीचे अभ्यासक आणि पुरातत्त्वशास्त्रज्ञ देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांचे आजच्या दिवशी निधन झाले. इतिहास संशोधक रा.गो. भांडारकर हे यांचे वडील होत.प्राचीन बांधकामे, नाणेशास्त्र, राजकारण यांचा त्यांनी विशेष अभ्यास केला होता
1951: संगीतकार आनंद मोडक यांचा जन्म
आनंद मोडक हे भारतातील एक बहुमुखी, लोकप्रिय आणि दिग्गज संगीत दिग्दर्शक होते. त्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांसह अनेक चित्रपटांना संगीत दिले. आनंद मोडक हे आपल्या संगीतातील प्रायोगिक शैलीसाठी प्रसिद्ध होते. लपंडाव (1993), चौकट राजा (1991), तू तिथे मी (1998), नातीगोती (2006), हरिश्चंद्राची फॅक्टरी (2009), समांतर (2009) आणि डँबिस (2011) आदी चित्रपटातील गीतांना त्यांनी संगीतबद्ध केले होते. महानिर्वाण, महापूर, खेळीया, रायगडाला जेव्हा जाग येते आदी नाटकांचे त्यांनी संगीत दिग्दर्शन केले होते.
1962 : भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना भारतरत्न पुरस्कार
डॉ. राजेंद्रप्रसाद हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर नेते तसेच भारतीय प्रजासत्ताकचे पहिले राष्ट्रपती होते. भारत सरकारने 1962 साली भारतरत्न हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार देऊन त्यांच्या देशसेवेचा बहुमान केला. महात्मा गांधींचे समर्थक असलेल्या राजेंद्रप्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने 1931 मधील मिठाचा सत्याग्रह आणि 1942 मधील भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्रप्रसादांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते 12 वर्षे राहिले.
भारताचे राष्ट्रपती या नात्याने, प्रसाद यांनी राज्यघटनेच्या आवश्यकतेनुसार कार्य केले आणि ते कोणत्याही राजकीय पक्षापासून स्वतंत्र होते. त्यांनी भारताचे राजदूत म्हणून जगभर प्रवास केला, परदेशी राष्ट्रांशी राजनैतिक संबंध निर्माण केले. "चंपारण येथील सत्याग्रह" (1922), "भारत विभाजित" (1946), त्यांचे आत्मचरित्र " आत्मकथा” (1946), “महात्मा गांधी आणि बिहार, काही आठवणी” (1949), आणि “बापू के कदमों में” (1954) आदी साहित्य त्यांच्या नावावर आहे.
1998: पोखरणमध्ये अण्वस्त्र चाचणी
भारताने 11 मे 1998 नंतर पुन्हा पोखरणमध्ये अण्वस्त्र चाचणी केली. आजच्या दिवशी भारताने दोन अण्वस्त्रांची चाचणी घेत जगाला धक्का दिला होता. त्याआधी 11 मे रोजी झालेल्या अण्वस्त्र चाचणी जगाला धक्का दिला होता.
2001 : भारतीय साहित्य लेखक आर. के. नारायण यांचे निधन
आर. के. नारायण यांचे खरे नाव रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी असे होते. स्वामी अँड फ्रेंड्स (1935) ही त्यांची पहिली कादंबरी. त्यानंतर 'द बॅचलर ऑफ आर्ट्स' (1937), 'द डार्क रूम' (1938), 'द इंग्लिश टीचर' (1946), 'वेटिंग फॉर द महात्मा' (1955), 'द गाइड' (1958), 'मॅनईटर ऑफ मालगुडी' (1962), 'द व्हेंडॉर ऑफ स्वीट्स' (1967) ह्यांसारख्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. ‘मालगुडी’ नावाचे एक दक्षिण भारतीय गाव कल्पून त्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या कथा-कादंबऱ्या रचिल्या आहेत. साधी लिखाणशैली आणि हलक्या-फुलक्या विनोदामुळे नारायण यांची तुलना प्रसिद्ध रशियन लेखक आंतोन चेखव यांच्याशी केली जाते. त्यांचे लिखाण जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
नारायण यांना वाचनाची प्रचंड आवड होती. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी इंग्लिश लेखक डिकिन्स, आर्थर कॅनन डायल आणि थॉमस हार्डी यांच्या लेखनाचे वाचन केले.
स्वामी ॲन्ड फ्रेन्ड्स या नावाची आपली पहिली कथामालिका लिहिली. त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहॅम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथामालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले. त्यानंतर नारायण यांनी एका पाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या. त्यांच्या बऱ्याच कथा मालगुडी नावाच्या गावाभोवती घडतात. या गोष्टी वाचतांना वाचक त्यात हरवून जातात. हे गाव पूर्णपणे काल्पनिक आहे यावर अनेकांचा विश्वास बसत नाही, इतके वास्तववादी चित्रण नारायण यांनी आपल्या कथांमधून उभे केले आहे. या गावातीलच एक गोष्ट 'दि गाईड' यावर गाईड नावाचा हिंदी चित्रपट निघाला होता.
2011: भारतीय नाटककार आणि नाट्य दिग्दर्शक बादल सरकार यांचे निधन
बादल सरकार हे प्रभावी भारतीय बंगाली नाटककार व नाट्य दिग्दर्शक होते. बादल सरकार यांनी भारतातील सामाजिक परिस्थिती प्रकट करण्यासाठी नाटयलेखन आणि प्रयोग केले. बंगाली भाषेतील त्यांच्या प्रसिद्ध नाटकांमध्ये बोरो पशिमा, राम श्याम जादू आणि इबोंग इंद्रजित यांचा समावेश आहे.भारतीय रंगभूमीवरील त्यांचे योगदान अतुलनीय आहे. आधुनिक भारतीय नाट्यलेखनात जे काम मराठीतील विजय तेंडुलकर, हिंदीतील मोहन प्रकाश आणि कन्नडमधील गिरीश कर्नाड आदींनी केले, तेच काम, योगदान बादल सरकार यांनी बंगाली रंगभूमीवर केले.
सरकार यांना 1971 मध्ये प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू फेलोशिप, भारत सरकारकडून 1972 मध्ये पद्मश्री, 1968 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित केले गेले. परफॉर्मिंग आर्ट्समधील सर्वोच्च सन्मान समजला जाणारा संगीत नाटक अकादमी फेलोशिप- रत्ना सदस्य या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. 2010 मध्ये त्यांना पद्मभूषण देण्याची घोषणा झाली होती. मात्र, त्यांनी हा पुरस्कार साहित्य अकादमीचे फेलो असल्याचे सांगत प्रांजळपणे नाकारला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)