12th March In History : यशवंतराव चव्हाण यांची जयंती, मुंबईत 1993 मध्ये साखळी बॉम्बस्फोट; आज इतिहासात
12th March In History : महाराष्ट्राचे शिल्पकार समजले जाणारे यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती आहे. तर, मुंबईसह जगाला हादरवून सोडणाऱ्या मुंबई बॉम्बस्फोट घटनेचा दिवस आहे.
12th March In History : 12 मार्च रोजी इतिहासात अनेक घटना घडल्या. महाराष्ट्राचे शिल्पकार समजले जाणारे यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती आहे. तर, मुंबईसह जगाला हादरवून सोडणाऱ्या मुंबई बॉम्बस्फोट आजच्या दिवशी 1993 मध्ये झाला होता. याशिवाय इतिहासात आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत.
1838 : ब्रिटीश रसायनशास्त्रज्ञ सर विलियम हेनरी पर्किन यांचा जन्मदिन
टेक्सटाइल इंडस्ट्रीत नवीन ट्रेंड प्रस्थापित करणारे सर विलियम हेनरी पर्किन यांचा जन्मदिन. पर्किन यांनी आपल्या घरातील प्रयोगशाळेमध्ये काही प्रयोग केले आणि या प्रयोगामध्ये अनपेक्षितपणे ॲनालीन या पदार्थाचा शोध लागला. हा पदार्थ शुद्ध केल्यानंतर त्यांना गडद जांभळा रंग मिळाला. या प्रयोगातून त्यांना माउव्हीन (mauveine) या जांभळ्या रंगाच्या पदार्थाचा शोध लागला आणि त्यांनी त्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात करण्याचे ठरवले. वयाच्या 18 वर्षीच त्यांनी हा शोध लावला होता. कपड्यांना रंग लावण्यासाठी रसायनाचा वापर या शोधानंतर होऊ लागला.
1911 : कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांच्या संगीत मानापमानाचा पहिला प्रयोग
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी संगीत मानापमान नाटक लिहले. मुंबईच्या रिपन थिएटरमध्ये १२ मार्च १९११ रोजी मानापमान नाटकाचा प्रथम प्रयोग ‘किलोस्कर संगीत मंडळींकडून’ सादर करण्यात आला. या नाटकात बालगंधर्व यांनी काम केले होते.
1913 : यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिवस
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे माजी उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज जन्मदिवस. महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्त्व इत्यादीशी निगडीत आहेत. यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते. म्हणून विकास योजना आखताना अविकसित विभागांचा आधी विचार केला पाहिजे. ग्रामीण औद्योगिकीकरणाबाबत ते म्हणतात की, ग्रामीण भागात उद्योग सुरू करून शेती आणि उद्योगांची सांगड घातली जावी. शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची सांगड घालून शहरांकडे धाव घेणारा श्रमिकांचा लोंढा थोपविता येईल. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. “युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”, “कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” ही त्यांची साहित्यसंपदा आहे.
1930 : महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेस सुरुवात
ब्रिटिश सरकारने भारतात तयार केलेल्या मिठावर बसवलेल्या अन्यायकारक करामुळे महात्मा गांधी यांनी 200 मैलाच्या दांडीयात्रेला सुरूवात केली. ही यात्रा ब्रिटीशांविरुद्ध निषेधाचं प्रतीक ठरली. महात्मा गांधी यांनी आपल्या 79 सहकाऱ्यांसोबत 240 मैल म्हणजे 386 किलोमीटर लांबचा प्रवास करुन नवसारी जिल्ह्यातील छोटेसे गाव दांडीमध्ये पोहचले. जिथे त्यांनी समुद्र किनाऱ्यावर जाऊन हाताने मिठागरातील मीठ हाताने उचलून सार्वजनिक रुपाने मिठाचा कायदा मोडला.
1968 : मॉरिशस इंग्लंडपासून स्वतंत्र
हिंदी महासागरातील महत्त्वाचा देश अशी ओळख असलेल्या मॉरिशसचा आज स्वतंत्र दिन. मॉरिशस हा प्रजासत्ताक देश असून राजकीय व्यवस्था ही ब्रिटनच्या संसदीय प्रणालीवर आधारीत आहे. ब्रिटिश वसाहतीचा भाग असल्याने या देशात भारतीय वंशाच्या नागरिकांची मोठी संख्या आढळते. सामरिकदृष्ट्या हा महत्त्वाचा देश आहे.
1993 : मुंबईत 12 बॉम्बस्फोट, 257 ठार, 1400 हून अधिक जखमी
मुंबईच्या इतिहासात काळं पान असलेले साखळी बॉम्बस्फोट 12 मार्च रोजी झाले. या बॉम्बस्फोटाने फक्त महाराष्ट्रच नव्हे तर जगाला हादवरले. बाबरी मशिदी पाडल्यानंतर देशभरात धार्मिक दंगली झाल्या. या दंगलीची झळ मुंबईलादेखील बसली. या दंगलीचा सूड उगवण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, टायगर मेमनने कट आखून मुंबईत 12 ठिकाणी बॉम्बस्फोट केले. मुंबई पोलिसांनी या स्फोटाच्या तपासासाठी 150 हून अधिक पथके स्थापन केली होती.
1984 : गायिका श्रेया घोषाल हिचा जन्मदिवस
हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची पार्श्वगायिका श्रेया घोषाल हिचा आज वाढदिवस. मराठी, कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू, बंगाली, आसामी इत्यादी प्रादेशिक भाषांमधूनही पार्श्वगायन केले आहे. श्रेया घोषालला 4 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 5 फिल्मफेअर पुरस्कार व 7 दक्षिणेमधील फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.