Maharashtra Weather: दिवाळीतही हलक्या पावसाच्या सरी कोसळणार; पुढील आठवडाभर कसं असेल हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातून पावसाची तीव्रता कमी झाली असली तरीही आगामी काळात अर्थात दिवाळीतही पावसाच्या सरी कोसळणार असण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Maharashtra Weather Update : दिवाळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दरम्यान या दिवसांच्या कालावधीत थंडीची देखील चाहुल लागत असते. असे असले तरी परतीच्या पावसाने (Maharashtra Rain) अद्याप मात्र राज्याची पाठ सोडली नसल्याचे चित्र आहे. कारण महाराष्ट्रातून पावसाची तीव्रता कमी झाली असली तरीही आगामी काळात अर्थात दिवाळीतही पावसाच्या सरी कोसळणार असण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त (Weather Alert) करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर ओसरणार असल्याचा इशारा दिला आहे. तर काही जिल्ह्यात मात्र पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, मान्सून महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून माघारी फिरला असून तो सध्या पूर्व विदर्भातील केवळ गडचिरोलीच्या काही भागामध्ये तो कायम आहे. या भागातूनही पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून माघारी फिरेल, असा अंदाज आहे. मात्र मान्सून परतला, तरी राज्यात दिवाळीच्या आगमनाच्या वेळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या बुधवारी,15 ऑक्टोबर ते सोमवार, 20 ऑक्टोबर म्हणजे नरक चतुर्दशीपर्यंत राज्यात ठिकठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, अशी शक्यता आहे. तर मुंबईत 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी हलक्या सरींचीही शक्यता आहे.
मान्सूनच्या परतीच्या पावसाची सध्य:स्थिती काय? (Maharashtra Rain)
मान्सूनने आज त्याच्या परतीच्या प्रवासात यू. पी., एम पी, बिहार, झारखंड, ओरिसा, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि गोवा ओलांडून कर्नाटक तेलंगणा प. बंगाल व पूर्वोत्तर राज्यात प्रवेश केला आहे. त्याची आजची सीमा रेषा कारवार कलबुर्गी निझामाबाद कांकर केओंझघर सागर आयलंड गुवाहटी शहरातून जात असुन देशाच्या एकूण परतीच्या क्षेत्रापैकी 85 टक्के भागातून मान्सून परतलेला आहे. दरवर्षी मान्सून साधारणत: देशातून सरासरी 15 ऑक्टोबर च्या दरम्यान बाहेर पडतो. येत्या दोन ते तीन दिवसात देशाच्या उर्वरित 15 टक्के भुभागावरून मान्सून परतेल, असे वाटते. अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली.
Latur Farmer Land Loss : पूर ओसरला; मात्र शेतकऱ्यांच्या आयुष्याची आशा वाहून गेली
लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीकाठचं गौर गाव आज उद्ध्वस्त झालं आहे. सात वेळा आलेल्या पुराने या गावचं स्वरूपच बदलून टाकलं आहे. नदीपात्र बदललं, शेतं वाहून गेली आणि दोनशे एकर सुपीक जमिनीचं वाळवंटात रूपांतर झालं. पावसाने अखेर उसंत घेतली. प्रकल्पातील विसर्ग थांबला. नद्यांना आलेला पूर ओसरला. पण त्यानंतर समोर आलं भयावह वास्तव. शेतकऱ्यांचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं आहे. मांजरा नदीच्या काठी वसलेलं, सहाशे घरांचं आणि साडेपाच हजार लोकसंख्येचं गौर गाव गेल्या दीड महिन्यात सात वेळा पाण्याखाली गेलं. पाचशे एकर शेती पुराच्या पाण्यात बुडाली आणि त्यापैकी दोनशे एकर शेती आता वाळूखाली गाडली गेली आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोरच त्यांची स्वप्नं वाहून गेली. काहींच्या उसाच्या शेतीत अजूनही पाणी साचलेलं आहे. तर काहींच्या शेतात वाळूची बेटं तयार झाली आहेत.
महत्वाच्या बातम्या:
























