Maharashtra Rain : मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाच्या सरी; बळीराजाचा सगळा हंगाम मातीमोल, मराठवाड्यात कापसाच्या अक्षरशः वाती झाल्या; IMDचा अंदाज काय?
राजधानी मुंबईत पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावल्याचं दिसून आलंय. मुंबईच्या पश्चिम उपनगरात आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान, पुढील 24 तासात पावसाची तीव्रता कमी होणार असल्याचेही सांगण्यात आलंय.

Maharashtra Rain मुंबई : राज्यातील बहुतांश भागात पावसानं उघडीप दिली असली तरी काही भागात मात्र, अद्यापही पाऊस पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आजही (31 ऑक्टोबर) अनेक भागात जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहे. विशेषत: या पावसामुळं कापूस आणि सोयाबीन पिकांचं (Farmers) मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दरम्यान, राजधानी मुंबईत पहाटेपासूनच पावसाने (Rain) हजेरी लावल्याचं दिसून आलंय. मुंबईच्या पश्चिम उपनगरात आज सकाळपासून जोरदार पाऊस (Maharashtra Weather Update) सुरू आहे. पहाटेपासून पश्चिम उपनगरात ढगाळ वातावरण असून सकाळी साडेसहा वाजेपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम उपनगर अंधेरी, विलेपार्ले जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड कांदिवली बोरिवली या सर्व परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.
Maharashtra Rain : ऑक्टोबर हिटऐवजी पावसाचेच ‘चटके’, पुढील 24 तासात पावसाचा अंदाज काय?
मुंबईत सकाळपासून पावसाची संततधार सुरु असून मुंबई उपनगरातही पावसाची रिपरिप सुरु आहे. अरबी समुद्रातील डिप्रेशन आणि छत्तीसगडवरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पाऊस पडत असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. अरबी समुद्रातील डिप्रेशनमुळे कोकण किनारपट्टीवर मागील 2 ते 3 दिवसांपासून पाऊस सुरु आहे. दरम्यान, पुढील 24 तासात पावसाची तीव्रता कमी होणार असल्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय.
Marathwada Rains: 'सगळा हंगाम मातीमोल', नांदेडमध्ये अतिवृष्टीने कापूस भिजला
नांदेडमध्ये (Nanded) झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे, हातातोंडाशी आलेलं कापूस (cotton) आणि सोयाबीनचं (soybean) पीक भिजल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. "भिजलेल्या कापसाच्या अक्षरशः वाती बनल्यात," असं विदारक चित्र सध्या नांदेडमध्ये दिसत आहे. मे महिन्यापासून नांदेड जिल्ह्यात सातत्याने अतिवृष्टी होत असून, यापूर्वी उडीद (Urad) आणि मूग (Moong) यांसारखी पिकेही वाया गेली होती. आता वेचणीला आलेला कापूस पावसामुळे भिजल्याने यंदाचा संपूर्ण हंगाम मातीमोल ठरला आहे. या मोठ्या नुकसानीमुळे नांदेडमधील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, शासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसला आहे.
दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या 9 ते 10 दिवसांपासून सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गुरुवारीही विविध भागांत जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे मका, कपाशी, कांदा आदी पिके जलमय झाली आहे. खरीप हंगाम पूर्णतः उद्ध्वस्त झाला असून, रब्बीचा आधारही क्षीण झालाय. कन्नड तालुक्यातील चापानेरसह परिसरातील गावांना सलग सातव्या दिवशीही जोरदार पावसाने झोडपले. सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, शेतातून अक्षरशः पाणी वाहत आहे. शेतातील हे भयावह चित्र पाहता येत असल्याने शेतकऱ्यांनी आता शेतात जाणं देखील बंद केले आहे.
Konkan Rains : 'हातातोंडाशी आलेला घास गेला', कोकणात भातशेतीचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल
कोकणात (Konkan) कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे भातशेतीचे (Paddy Farming) मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे शेतकरी (Farmers) हवालदिल झाले आहेत. 'लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी,' अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पावसामुळे जवळपास दोन हजार आठशे सत्त्याण्णव (2,897) हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे बळीराजा संकटात सापडला असून, शासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा -
























